इतिहास हा बदलत नसतो, या वाक्याची अनुभूती पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने दिली असली, तरी त्याच गोष्टीला छेद देत दक्षिण आफ्रिकेला रविवारी भारताने निरुत्तर केले. आतापर्यंतच्या विश्वचषकात भारताने आफ्रिकेवर एकदाही विजय मिळवला नव्हता. पण या सामन्यात भारताने द. आफ्रिकेला तब्बल १३० धावांनी पराभूत करत चारही मुंडय़ा चीत केले आणि नवीन इतिहास रचला. शिखर धवनचे दमदार शतक आणि अजिंक्य रहाणेच्या मिळालेल्या सुयोग्य साथीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ३०७ धावा फटकावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेचा डाव १७७ धावांमध्ये संपुष्टात आला.

शिखर धवनने लाजवाब फलंदाजी केली. जेव्हा गरज होती, तेव्हाच तो मोठे फटके खेळला. पाक आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांविरुद्धचे सामने आमच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे हे दोन्ही विजय खडतर प्रयत्नांनिशी मिळवलेले आहेत. आम्ही हे दोन्ही सामने फलंदाजांच्या कर्तृत्वाच्या बळावर जिंकलो आहोत.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार