बाद फेरीत बांगलादेशशी भिडताना विराट कोहली फक्त तीन धावांवर बाद झाला आणि त्याचा पारा चढला. शिव्यांची उधळण करीतच तो मदानातून निघाला. तो स्वत:वरच वैतागतोय, त्याला बाद करणाऱ्या गोलंदाज रुबेल हुसेनवर की त्याचा झेल पकडणाऱ्या मुशफिकरवर हे कळायला मार्ग नव्हता. न जाणो आपण समोर दिसलो तर संतापलेल्या विराटचा ज्वालामुखी आपल्यावरच फुटायचा या धास्तीने सारे क्रीडा पत्रकार लपून बसले. विराट ड्रेसिंग रूममध्ये शिरला तोच आदळआपट करीत. ‘‘मी यायला निघालेय आणि आता तुझा असा खेळ. पुन्हा सारे खापर माझ्यावरच फुटू देत,’’ असेच काहीतरी अनुष्का आपल्याला सुनावणार म्हणून त्याचे दडपण वाढत होते. त्याने हातातले ग्लोव्हज आणि पॅड िभतीवर आपटले.
ड्रेसिंग रूममधल्या टीव्हीवर मॅच सुरू होती. आता तो टीव्हीच उचलून फोडणार इतक्यात रवी शास्त्रीने त्याला जरबेने थांबवले आणि विचारले, ‘‘अरे तू काय, रिकी पाँटिंगचा कित्ता गिरवायचे ठरवले आहेस का?’’
‘‘मी स्वयंभू आहे. मी कुणासारखाच नाही. माझ्यासारखा कुणीही नाही. रिकीने टिव्ही फोडला असेल तर मी दुसरे काहीतरी फोडेन,’’ असे ओरडत विराटने टीव्ही शेजारीच ठेवलेला मोबाइल उचलला आणि जमिनीवर आपटला. मोबाइलची शकले शकले झाली. ड्रेसिंगरूममध्ये एकच पळापळ झाली. ‘‘दोन दिवस झाले अनुष्काचा फोनसुद्धा आला नाही. म्हणून राग काढला फोनवर’’.. आवाज रवींद्र जडेजाचा होता. तसा विराट चिडला. ‘‘फक्त मिशा वाढवून कुणी शिखर धवन होत नाही. त्यासाठी कामगिरीसुद्धा करावी लागते. फलंदाजी नाही, गोलंदाजी नाही. तुझ्यामुळे फुकट युवराजला डच्चू मिळाला,’’ विराटने जडेजाला जोरदार टोमणा मारला. मुद्दय़ालाच हात घातलेला पाहून जडेजा काकुळतीला आला. ‘‘पण मी काय केले तुझे? माझ्यावर का चिडतोयस? जडेजाने विचारले. ‘‘आता काय बोललास तू अनुष्कावरून?’’ विराटने रवींद्रला खडसावले. ‘‘स्वत:च्या कामगिरीमुळे आधीच मी निराश आहे, त्यात तू का माझे डोके फिरवतोयस?’’ जडेजाने तोंड वाईट करीत विचारले. ‘‘बॉिलगला फटके पडल्यानंतर जाडेजा एकही शब्द बोललेला नाही,’’ धोनीने जडेजाची बाजू घेतली.  ‘‘धोनी, प्लीज तू गप्प बस. प्रत्येक वेळी याला पाठीशी घालायची तुला गरज नाहीय!’’ असे विराट म्हणाला. मग धोनीने संयम ठेवत विराटच्या दोन्ही खांद्यांना हलवले. ‘‘विराट, भानावर ये त्या दिवशी तू एका पत्रकाराचा राग भलत्याच पत्रकारावर काढलास. आता जड्ड तुला काहीच बोलला नसताना उगाच त्याला त्रास देतोयस्? काय चाललेय तुझे? जाडेजा अनुष्कावरून काय म्हणाला ते मी स्वत:च्या कानांनी ऐकले आहे.’’
धोनी विराटला हात जोडत म्हणाला, ‘‘शांत हो, तू नाही खेळलास तरी मॅच जिंकलोय आपण.’’ मग धोनीने सर्वाना ड्रेसिंग रूममधून बाहेर काढले. विराटला एकटय़ाला ठेवून सर्वजण बाहेर पडले. ‘‘मी झेलबाद झालो तो पंचाने नो बॉल दिला, म्हणूनच मला पुढे शतक मारता आले असेच विराटला वाटले असणार. मला सूर गवसलाय, तेच पोटात दुखले असणार त्याच्या. स्वत: बाद होतो, तेव्हा कधीच नो बॉल नसतो ना? म्हणूनच त्याचा जळफळाट झालाय. नक्कीच!’’ रोहितने केलेले वक्तव्य विराटला ऐकू आले. विराटला असह्य़ होऊ लागले. त्याचे डोके गरम झाले. इतक्यात शिखर मिशा पिळत चिंताग्रस्त अवस्थेत ड्रेसिंग रूममध्ये आला. खाली मान घालून तो कपडे बदलत असताना विराटने त्याच्याकडे पाहिले. ‘‘वेळ आली की रोहितही मोठी खेळी करेल असे धोनीने टिकाकारांना सुनावले होते. ते रोहितने खरे करून दाखवले. रोहित शानदार खेळू लागलाय आणि मी मात्र चाचपडायला लागलोय. कुणाची तरी नष्टर लागली आहे मला!’’ शिखर बोलला नव्हता, पण त्याच्या मनातला आवाज विराटने स्पष्ट ऐकला होता. ‘‘काय म्हणालास?’’ विराटने विचारताच अधिकच मिशा पिळत शिखर रागाने बघू लागला. ‘‘मी काहीही बोललेलो नाही. तू उगाच मला त्रास देऊ नकोस. पाकिस्तानसोबतच्या मॅचमध्ये तू मला धावचीत केलेस ते मी अजून विसरलेलो नाही. तेव्हा माझ्या नादाला लागू नकोस!’’ असे बोलून शिखर रागारागात तिथून निघून गेला.
‘‘माझे कान वाजतायत की काय?’’ विराटला विश्वासच बसत नव्हता. खरे खोटे करण्यासाठी तो ड्रेसिंग रूमबाहेर आला. जडेजा रोहितकडे पाहिल्यानंतर ‘‘मन्नू तेरा हुआ, अब मेरा कब होगा’’ हेच गाणे मनातल्या मनात गुणगुणत होता.
‘‘अश्विनला उगाचच चढवून ठेवलेय. वेळ पडल्यास तेवढी चांगली गोलंदाजी तर मीही करतो,’’ असे सुरेश रैनाला वाटत होते. ‘‘सचिनला विश्वचषक जिंकून निरोप दिला. आता हे सगळे जण विश्वचषक जिंकून मलाही शानदार निरोप देतील ना?,’’ कॅप्टन कुल धोनी बाहेरून कितीही शांत दिसला तरी त्याच्या मनात हलकल्लोळ सुरू होता. रवी शास्त्री प्रशिक्षक डंकन फ्लेचरसमोर बसले होते. ‘‘मला सगळीकडून पद्धतशीरपणे गायब केले आहे शास्त्रीने. विश्वचषक संपला की आपल्याला निरोप देण्याच्या तयारीतच असणार हा!’’.. डंकनच्या मनातला आवाज विराटने ऐकला.
शमी, यादव, मोहित हे वेगवान त्रिकूट गप्पागोष्टीत रमले होते. उमेश तिथून उठला. ‘‘मी वेगाचा उच्चांक गाठतो आहे, पण मुख्य गोलंदाज कोण? तर म्हणे शमी. कितीही यशस्वी झालो तरी भाव खातो कोण? शमीच!’’ उमेश वैतागला होता. मनातले भाव मनातच गिळत तो जेवणाकडे वळला. पण विराटने त्याच्या मनाला टिपले होते. ‘‘पाकिस्तानचा मोहम्मद इरफान जायबंदी होऊन माघारी परतला, तसा या तिकडीतला कुणीतरी..?’’ भुवनेश्वर मनात काय मांडे खातोय, तेही विराटला ऐकू गेले.
‘‘हे सगळे खरेच असा विचार करतायत की आपल्याच मनाचे हे खेळ? चांगली कामगिरी करण्याच्या अतिकाळजीने कित्येक रात्र नीट झोपलो नाही. त्याचाच हा परिणाम नसेल ना?’’ विराटच्या मनावर प्रचंड ताण आला. ‘‘अनुष्का का नाही आली अजून? तिच्या मनात काय चाललेय हे आपण अजून ओळखू शकलेलो नाहीय आणि नको त्यांच्या मनातले ऐकू येतेय.’’ विराट चिंताग्रस्त झाला. ‘‘उपांत्य फेरीच्या दिवशी विरोधी संघाच्या खेळाडूंच्या मनात काय चाललेय ते ऐकू आलं तर..?’’ विराटने मनातला विचार मनातच झटकला आणि आणखी कुणाचे भलतेसलते ऐकू येण्याच्या आधीच तो निद्राधीन झाला.
(ही सारी गोष्ट काल्पनिक आहे, हे सुज्ञांना सांगायला नकोच!)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Virat kohli vs bangladesh
First published on: 21-03-2015 at 05:52 IST