शब्दांकन : नीतिन आरेकर

ज्या दिवशी  (११ एप्रिलला) सुनीलजींची सद्भावना पदयात्रा अमृतसरला पोहोचली त्या दिवशी अमृतसरच्या वेशीवर मी आमच्या काही सहकाऱ्यांसह त्यांच्या स्वागताला हजर होतो. लाखो पंजाबी भगिनी आणि बांधव त्यांच्या स्वागतासाठी जमले होते.  अचानक एक वयोवृद्ध स्त्री सुनीलजींना सामोरी आली. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. ती जमिनीवर बसली. तिने तिचा तळहात जमिनीवर पसरला आणि सुनीलजींना म्हणाली, ‘‘बेटा, तुम्हारा पाँव मेरे हाथपर रखना.’’

सुनीलजी नर्गिसजींना कायम ‘मिसेस दत्त’ अशी हाक मारत, तर नर्गिसजी त्यांना ‘मि. दत्त’ अशी हाक मारत. ही हाक इथं वाचताना वरकरणी औपचारिक वाटली तरी त्यामागचं प्रेम ती हाक ऐकणाऱ्यांना जाणवत असे. दोघंही परस्परांत सायसाखरेसारखे मिसळून गेले होते.

सुनील दत्तसाहेब हे मूळचे खुर्द गावचे. हे गाव तत्कालीन पंजाबातील झेलम जिल्ह्यात होतं. आता हा भाग पाकिस्तानात गेला आहे. सुनीलजी खुर्दच्या आठवणी कधी काढत नसत. त्या गावात त्यांना फक्त दु:ख मिळालं. ते सहा वर्षांचे असताना त्यांचे वडील निवर्तले. त्यांची थोडीफार शेतीभाती होती, ती सोडून त्यांना फाळणीच्या वेळी भारतात यावं लागलं. ते आधी पंजाबमध्ये काही काळ राहिले, त्यानंतर मुंबईत चेंबूर परिसरात एका झोपडपट्टीत राहिले. तिथूनच त्यांनी जयिहद महाविद्यालयातून बी. ए.ची पदवी मिळवली. नंतर ‘बेस्ट’ कंपनीत कारकुनाची नोकरी केली. कॉलेजच्या एका कार्यक्रमाचं निवेदन करताना त्यांना रेडिओ सिलोनमधील एका अधिकाऱ्यानं ऐकलं व थेट अनाउन्सरची- म्हणजे आजच्या भाषेत ‘रेडिओ जॉकी’ची नोकरी दिली. त्यांचा हा सारा प्रवास म्हणजे एका कष्टसिद्धाची कहाणी आहे. ही कहाणी सुनीलजी फार क्वचित नॉस्टॅल्जिक होत, तेव्हा त्यांनी मला सांगितलेली आहे. ते आठवणींत कधी रमत नसत. परंतु जगलेल्या जीवनातून मिळालेला संदेश ते कधीही विसरत नसत.

नर्गिसजींचंही आयुष्य कष्टदायक होतं. त्या नेहमी दुसऱ्यांसाठी झटत आल्या होत्या. त्यांनी स्वत:चा फारसा कधी विचार केला नाही. त्यांची आणि माझी पहिली भेट झाली ती ‘प्रीतम’मध्येच. पंजाब नॅशनल बँकेत त्यांनी खातं उघडल्यावर बँकेचे मॅनेजर त्यांना घेऊन चहासाठी आमच्याकडे आले आणि नर्गिसजी आमच्या परिवारातल्या झाल्या. मला स्पष्टपणे त्यांची पहिली भेट आठवतेय. त्या आलेल्या असताना माझी छोटी मुलगी डॉली तिथं आली होती. नर्गिसजींना ती खूप आवडली. त्यांनी त्यांच्या कपडय़ांचा, अभिनेत्री म्हणून असलेल्या आपल्या स्टारपदाचा विचार न करता तिला उचलून कडेवर घेतलं आणि तिचे खूप लाड केले.

लग्नानंतर त्यांनी स्वत:ला संसारात पूर्णपणे झोकून दिलं. त्या उत्तम गृहिणी बनल्या. सुनीलजींच्या घरी मी अधूनमधून काही कामानिमित्त जायचो. कधी पंजाब असोसिएशनचं काम असायचं, तर कधी चित्रपटासंबंधी, किंवा कधी नुसतंच गप्पा मारायला. कधीही गेलो तरी त्याच प्रसन्न मुद्रेनं दार उघडायच्या. घरात नोकरचाकर असले तरीही त्या स्वत:च आस्थेनं विचारपूस करायच्या. स्वत: चहापाणी आणून द्यायच्या आणि मग आम्हा मित्रांना गप्पा मारायला सोडून त्या घरात निघून जायच्या. अत्यंत सुसंस्कृत संसार होता त्यांचा.

नर्गिसजींशी विवाह केल्यानंतर सुनीलजींचं नशीब पालटलं. त्यांचे चित्रपट चालायला लागले, ते मोठे स्टार झाले. मग त्यांनी स्वत:ची ‘अजंता आर्ट्स’ ही निर्मिती संस्था काढली. अजंताच्या माध्यमातून सुनीलजी व नर्गिसजींनी नवनव्या अभिनेत्यांना संधी दिली. ‘रेश्मा और शेरा’मधून त्यांनी अमिताभ बच्चनना संधी दिली. त्यांनी जे चित्रपट निर्माण केले, ते सर्व चित्रपट सामाजिक समस्यांना हात घालणारे होते. परिणामी त्यांना प्रत्येक वेळी आर्थिक यश लाभलंच असं नाही. पण एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे ते चित्रपट काढत असत. नर्गिसजी त्या चित्रपटांचे आणि अजंता आर्ट्स या संस्थेचे सारे हिशेब सांभाळत. सुनीलजी नेहमी सांगत, ‘‘मिसेस दत्त सब संभालती है।’’ त्यांचे सारे पशाचे व्यवहार आमच्या समोरच्या पंजाब नॅशनल बँकेतून होत असत. बँकेत त्या आल्या की ‘प्रीतम’ची फेरी नक्की असायची. सुनीलजी आणि नर्गिसजींच्या खाण्यापिण्याच्या काहीच कटकटी नव्हत्या. जे ताटात पडेल ते खायचं अशी त्यांची सवय होती. चविष्ट अन्न असेल तर त्यांची तबियत खूश व्हायची. तंदूरचे सगळे पदार्थ त्यांना आवडत. नर्गिसजी या सुनीलजींची प्रेरणा होत्या. सुनीलजी जे काही करत ते त्यांच्याशी सल्लामसलत करूनच करत असत. नर्गिसजींची दुसरी इिनग समाजसेवेची होती. दोघेही पंजाब असोसिएशनच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत. मिसेस दत्त यांच्या सामाजिक कार्याचा मोठा बोलबाला होता. खुद्द इंदिरा गांधी यांच्या त्या जवळच्या होत्या. त्यांनी मिसेस दत्तना सरकारनियुक्त खासदार केले. िहदी चित्रपटसृष्टीतून खासदार होणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री. सुनीलजींना त्यांचा सार्थ अभिमान होता. मिसेस दत्तचा शपथग्रहण सोहळा त्यांनी राज्यसभेच्या गॅलरीतून पाहिला. मुंबईत आल्यावर मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, किती अभिमानास्पद गोष्ट आहे मिसेस दत्तची! त्या खासदार झाल्या.’’

काही महिने लोटले. अचानक नर्गिसजींच्या आजाराची खबर पेपरमध्ये वाचली. मी सुनीलजींना भेटायला गेलो. ते खचून गेले होते. त्यांनी मिसेस दत्तच्या आजाराचं स्वरूप कोणालाही सांगितलं नव्हतं. मला हलक्या आवाजात ते म्हणाले, ‘‘कुलवंतजी, काय करू मी? मिसेस दत्त आजारी आहेत. खूप आजारी आहेत. त्यांना कॅन्सर झालाय. मी हे दु:ख कोणाशी बोलूही शकत नाही. मुलं हादरतील. संजूचा पहिला चित्रपट येतोय. सारा खेळ..’’ ते बोलता बोलता थांबले. मला भरून आलं होतं. मी फक्त त्यांच्या पाठीवर हात ठेवला. त्यांना म्हणालो, ‘‘वाचतील त्या. तू प्रयत्न करतो आहेस ना? देव साथ देईल.’’ मी पहिल्यांदा सुनीलजींना ‘अरे-तुरे’त बोललो त्या दिवशी.

पण खूप प्रयत्न केले तरी त्या गेल्याच! सुनीलजी अक्षरश: एकटे पडले. त्या एकाकी अवस्थेत मी त्यांच्या सांत्वनासाठी घरी गेलो होतो. माझे हात हाती धरून दत्तसाहेब बोलले, ‘‘कुलवंतजी, मैं मिसेस दत्त को बचा नहीं पाया. उस सुबह छह बजे ब्रीच कँडी अस्पतालसे फोन आया- मिसेस दत्त की तबियत और बिगड गयी है। मैं सब को जगा कर भागते भागते ब्रीच कँडी पहूँचा। उनके पास गया। मिसेस दत्त बेहोश पडी थी। मैं चूपचाप उनके पास बठा। कुछ पलों बाद मैंने उनको आवाज दिया, ‘मिसेस दत्त..’ उन्होंने आँखे खोली। मेरी तरफ देखा। कुछ बोलना चाहती थी। लेकीन.. बस एक सिसकी निकली। मैंने उनको फिर से आवाज़्‍ा दी। उन्होंने आँखे नहीं खोली.. आँखे नहीं खोली।’’

त्यांचं घर विस्कळीत झालं. नंतर कधीतरी एका संध्याकाळी मी त्यांच्या घरी सहजच गेलो होतो. त्यांनी संजयला बोलवलं. त्याला म्हणाले, ‘‘संजूबाबा, यह कुलवंतजी है। मंने उनका बहोत सारा नमक खाया है। इनके पापाने मुझे जिना सिखाया है। इनकी वजह से हम लोग मुंबई में एस्टॅब्लिश हुए है।’’ (हे काही फारसं खरं नव्हतं. सुनीलजी त्यांच्याच कर्तृत्वानं महान झाले होते. पापाजींचा किस्सा हे एक कारण बनलं, इतकंच.) संजयने ते ऐकलं, पण तो त्याच्या मूडमध्ये होता. त्यानं नमस्कार केला व निघून गेला.

दत्तसाहेब खूप निराश झाले होते नर्गिसजींच्या निधनानंतर. पण हळूहळू काळानं त्यांना सावरलं. त्यांना महाराष्ट्र सरकारनं आधी मुंबईचे शेरीफ केलं. नंतर ते लोकसभेची निवडणूक लढवून खासदार झाले. रजिंदर (राजेंद्रकुमार) त्यांच्या प्रचारसभांना जात असे. इंदिराजींच्या हत्येनंतर मुंबईत आम्ही जी शांतता सभा बोलावली होती त्या सभेत ते स्वत: बोलले. त्यांनी आपलं अंत:करण मोकळं केलं. पण नंतर देशभर जे दंगे उफाळले, त्यांनी त्यांचं कविमन व्यथित झालं. काही मित्रांची एक छोटीशी बठक त्यांनी बोलावली. मीही त्या बठकीत होतो. त्यांनी मुंबई ते अमृतसर अशी सद्भावना पदयात्रा काढण्याचा निश्चय त्यात व्यक्त केला. आम्हाला सर्वाना त्यांची खूप काळजी वाटली. याचं कारण म्हणजे त्यांच्या जिवाला निर्माण होऊ शकणारा धोका. ते म्हणाले, ‘‘काही काळजी करू नका. भारतीय माणसाच्या सद्भावनेला आपण साद घालतोय. तो त्या हाकेला नक्की प्रतिसाद देईल.’’ सुनीलजींच्या विलक्षण आत्मविश्वासानं आम्ही भारून गेलो. एकदा का ध्येयपूर्तीचा निश्चय केला की ध्येयवेडय़ा माणसाला फक्त त्याचं ध्येय दिसतं. मग आम्ही साऱ्यांनी त्यांच्या ध्येयाचा एक भाग व्हायचं ठरवलं. सुनीलजींनी बारकाईनं प्रत्येक टप्पा आखला, पदयात्रा कशी कशी जाईल याची आखणी केली. बलदेव खोसा हे तेव्हा एक अभिनेता होते. त्यांनी या पदयात्रेत सुनीलजींना खूप मदत केली. ते नंतर आमदारही झाले. त्यावेळी मी पंजाब असोसिएशनचा अध्यक्ष होतो. पण हॉटेल व्यावसायिकही होतो. मी त्यांना सांगितलं, ‘‘या पदयात्रेत संपूर्ण वेळ मला येता येणार नाही. पण पहिल्या दिवशी पहिल्या मुक्कामापर्यंत मी येईन आणि बसाखीच्या दोन दिवस आधी ही पदयात्रा अमृतसरला पोहोचेल तेव्हा तुमचं स्वागत करायला मी तिथं येईन.’’ मी त्यांच्याबरोबर पदयात्रेत ठाण्यापर्यंत चालत गेलो. नंतर दररोज आम्ही मुंबईतली मंडळी एकत्र येऊन त्या दिवसाचा आढावा घ्यायचो. दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पुढली व्यवस्था करायचो. भारतीय जनतेने ठिकठिकाणी सुनीलजींच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. ठरल्याप्रमाणे मी त्यांचं स्वागत करायला अमृतसरला गेलो. माझी आई बीजी ही माझी खूप काळजी करत होती. खरं तर ती मला पाठवायलाच तयार नव्हती. पण, ‘जर सुनीलजी शांततेसाठी जिवाची पर्वा न करता एवढी थोरली पदयात्रा करत आहेत, तर माझीही काही सामाजिक जबाबदारी आहे की नाही?,’ अशी मी तिची समजूत काढली. ज्या दिवशी  (११ एप्रिलला) सुनीलजींची पदयात्रा अमृतसरला पोहोचली त्या दिवशी अमृतसरच्या वेशीवर मी आमच्या काही सहकाऱ्यांसह त्यांच्या स्वागताला हजर होतो. लाखो पंजाबी भगिनी आणि बांधव त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. मला पाहून त्यांना मनस्वी आनंद झाला. आम्ही पवित्र सुवर्णमंदिराच्या जवळ आलो. सुवर्णमंदिर लाखो भाविकांनी भरून गेलं होतं. एका अद्भुत अनुभवाला ते सारे सामोरे जात होते. अचानक एक वयोवृद्ध स्त्री सुनीलजींच्या सामोरी आली. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. ती जमिनीवर बसली. तिने तिचा तळहात जमिनीवर पसरला आणि सुनीलजींना म्हणाली, ‘‘बेटा, तुम्हारा पाँव मेरे हाथपर रखना.’’ हजारो किलोमीटरचं अंतर चालून आलेल्या सुनीलजींच्या पायावर ओरखडे होते. ते भेगाळलेले होते. आपल्यापेक्षा वयानं मोठी असलेली एक माता अशी विनंती करते आहे, हे पाहून ते गहिवरले. त्यांच्याही डोळ्यांतून आसवांचा पूर लोटला. ते खाली बसले. त्या स्त्रीचे हात त्यांनी नम्रपणे हातरुमालानं पुसले. पण ती माता ऐकेना. ती म्हणाली, ‘‘बेटा, अख्खा िहदुस्थान चालून तू आलास.. संतांसारखं काम केलंस. या पवित्र मंदिरात जाताना तुझे पाय माझ्या हातांवर ठेव आणि मगच आत जा. तुझ्या पावलांची ही धूळ साऱ्या भारताला एकत्र ठेवील.’’ सुनीलजींनी कशीबशी तिची इच्छा पूर्ण केली. त्या मातेला वात्सल्यानं आिलगन दिलं. तिचे आशीर्वाद घेतले आणि मग ते पवित्र सुवर्णमंदिरात शिरले. त्यानंतर त्या वृद्ध स्त्रीला मी शोधत होतो, पण ती कुठेही दिसली नाही. अवघा माहौल त्यावेळी हळवा झाला होता. गुरूंच्या जयजयकारानं आसमंत भारला होता. त्यानंतर ‘गुरुग्रंथसाहेबा’चा अखंडपाठ झाला. त्या विलक्षण अनुभवाचा साक्षीदार होण्याचं भाग्य नियतीनं मला दिलं होतं. या पदयात्रेनं सुनीलजींचं व्यक्तिमत्त्व झळाळून उठलं. ते सातत्यानं निवडणुका जिंकत गेले.

मुंबई आणि मुंबईकर हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. मुंबईनं आपल्याला रोजीरोटी दिली, आयुष्य दिलं. तिच्या ऋणात राहणंच त्यांना आवडत असे. नव्वदच्या दशकात मुंबईत जे बॉम्बहल्ले झाले, जे दंगे उसळले त्यामुळे ते हादरून गेले. पण त्यावेळी त्यांनी मुंबईला पूर्ववत करण्यासाठी जे कष्ट घेतले त्यांची नोंद केली नाही तर ते अन्यायकारक ठरेल. त्यावेळी दिल्लीतून अनेक मंत्री, सचिव दर्जाची मंडळी मुंबईत येत. अनेकदा राजेश पायलटजी, गुलाम नबी आजादजी, कमलनाथजी असे महत्त्वाचे मंत्रिमहोदय मुंबईत आले की कित्येकदा सुनीलजी त्यांना प्रीतममध्ये घेऊन येत. माझ्या कार्यालयात त्यांच्या गाठीभेटी होत. अनेक चर्चा होत. सुनीलजींचा माझ्यावर जो विश्वास होता त्यातून हे घडत गेलं. त्यावेळच्या सर्वच राजकीय नेत्यांच्या धोरणीपणामुळे आणि कार्यक्षमतेमुळे मुंबई मूळ पदावर येत गेली. ही गोष्ट मी आजवर कुठेही सांगितली नाही. आज त्याचे संदर्भ संपल्यामुळे सांगतो आहे, इतकंच. सुनीलजींची मुलगी प्रिया दत्त हीदेखील त्यांचं काम उत्तमरीत्या पुढे नेते आहे, हे फार आनंदाचे आहे. नर्गिसजी आणि सुनीलजी यांचा आत्मा तिचं काम बघून संतुष्ट होत असेल.

सुनीलजी नम्र होते. साधे होते. आरस्पानी होते. और एक बात.. वह सच्चे इन्सान थे।

ksk@pritamhotels.com