कुलवंतसिंग कोहली

बी. आर. चोप्रा हे उंचेपुरे, सणसणीत देहयष्टी असणारे आणि तशीच निर्मिती करणारे फिल्ममेकर होते. तर यश चोप्रा हे त्यांच्याइतके उंच नसले तरी कर्तृत्वाच्या नव्या उंचीला गवसणी घालणारे त्यांचे धाकटे बंधू होत. बी. आर. हे सामाजिक प्रश्नांचे रखवालदार होते, तर यशजी प्रेमाचे शाहीर होते. एकाने सामाजिक क्रांतीची गाणी गायली, तर दुसऱ्यानं प्रीतगीतांची बाग बहरवली..

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

मुंबई म्हणजे केवळ शहर नाही. मला तर ते एक जिवंत अस्तित्वच वाटतं. सतत जागं असणारं शहर! या शहरात दिवसाच्या कोणत्याही प्रहरी या, तुम्हाला हे शहर जवळ घेऊन विचारतंच, की ‘बाबा रे, तू जेवलास का? थोडीशी विश्रांती घेतलीस का? नसली घेतलीस तर थोडीशी विश्रांती घे. माझ्या कुशीत कुठंही झोप.’ मग डोकं टेकायला जागा नसलेली माणसं कुठंतरी विश्रांती घेतात. एखादा दमलेला अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान वरळी सी फेसवरच्या बाकडय़ावर अपरात्री झोपतो. अरबी समुद्राच्या लाटा त्यांच्यासाठी अंगाई गातात आणि त्यांच्यावरून वाहणारे मतलई वारे त्यांना जोजवतात. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे ‘द अमिताभ बच्चन’ आणि ‘द शाहरुख खान’ झालेले नसतात. ते आयुष्याला प्रश्न विचारणारे साधे ‘स्ट्रगलर्स’ असतात. ही मुंबई त्यांना घडवते. आणि नंतर ते मुंबईला घडवतात. म्हणून तर मुंबईच्या ब्रिटिश नावावरून आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’ म्हणतात ना! मला इथं आल्यावर हळूहळू समजत गेलं की मुंबई हे सात बेटांपासून बनलेलं शहर आहे. दंतेरी समुद्र- किनाऱ्याला लागून असलेल्या आपल्या या शहराला नंतर अनेकांनी घडवलं. ग्रँट रोडला ‘नाना चौक’ आहे. त्या चौकाला ज्यांचं नाव आहे ते नाना म्हणजे जगन्नाथ शंकरशेट. महान माणूस! मुंबईच्या आजच्या रूपाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. या शहराची घडण नाना शंकरशेट, फिरोझशहा मेहता आदींनी केली. भारतातल्या पहिल्या विद्यापीठांपैकी एक- मुंबई विद्यापीठ इथंच स्थापन झालं. पहिली रेल्वे इथंच धावली आणि पहिला चित्रपटही इथंच बनला. हे सारं निर्माण करणारी अद्भुत माणसं या शहरानं दिली.

आज मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला उंचच उंच इमारती दिसतात. पण मी इथं आलो तेव्हा ४०-५० च्या दशकांत मुंबईत फक्त दोन मजल्यांच्याच इमारती होत्या. ग्राऊंड प्लस टू! तिसऱ्या मजल्यांना माझ्यासमोर परवानग्या मिळायला सुरुवात झाली. मरिन ड्राइव्हवर मात्र काही सहा मजल्यांच्या इमारती बनल्या होत्या. पण तो अपवाद. आमच्या ‘प्रीतम’ची इमारतही आधी दोन मजल्यांचीच होती. नंतर आम्ही तिच्यावर तिसरा मजला चढवला. माणसं वाढत गेली तशा इमारती वाढत गेल्या. समुद्र आणि मुंबई बेटांच्या मूळ सांगाडय़ामुळे तिला आडवं वाढायला संधी नव्हती, म्हणून ती उभी वाढू लागली. परंतु उभी वाढली तरी तिची माया मात्र अरबी समुद्रासारखी खोलवर होती. यहाँ अपने आप रिश्ते बनते है।

आपसूकच आमचंही नातं अनेक ढंगांच्या लोकांशी जोडलं गेलं. प्रेमळ मुंबईनं प्रेमानं आमच्यासारख्या सर्वाना सामावून घेतलं.. आपल्यासारखंच केलं. आता आमच्या सर्वाची जात-धर्म एकच.. मुंबईकर! अशा सच्च्या मुंबईकरांपैकी एक कुटुंब म्हणजे चोप्रा कुटुंब. बी. आर. चोप्रा, धरम चोप्रा, राज चोप्रा, यश चोप्रा आणि हिरू जोहर (करण जोहरची आई.. यश जोहरची पत्नी)! बी. आर हे उंचेपुरे, सणसणीत देहयष्टी असणारे व तशीच निर्मिती करणारे फिल्ममेकर होते. तर यश चोप्रा हे त्यांच्याइतके उंच नसले तरी कर्तृत्वाच्या नव्या उंचीला गवसणी घालणारे त्यांचे धाकटे बंधू होत. बी. आर. हे सामाजिक प्रश्नांचे रखवालदार होते, तर यशजी प्रेमाचे शाहीर होते. एकाने सामाजिक क्रांतीची गाणी गायली, तर दुसऱ्यानं प्रीतीगीतांची बाग बहरवली. या सर्व भावंडांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. एकमेकांना बांधून राहायचे. बी. आर. यांनी मुंबईत मांड पक्की केली आणि ती करताना आपल्या सर्व भावंडांनाही संधी दिली. धरम चोप्रा हे सिनेमॅटोग्राफर झाले. (त्यांच्या कॅमेऱ्यात जादू होती.) राज व यश हे दिग्दर्शक झाले. यशजींनी तर स्वतंत्र स्टुडिओच थाटला.

बी. आर. यांचा एकत्र कुटुंबपद्धतीवर विश्वास होता. त्यांनी यशजींना सुरुवातीपासूनच आपला साहाय्यक म्हणून सोबत घेतलं. त्यांनी यशजींसाठी एक छोटीशी बंगलीही बांधली होती. हे सर्व मी सांगू शकतो याचं कारण हे सारे ‘प्रीतम’मध्ये एकत्र येत, एकत्र जेवत आणि आमच्याशी त्या सर्वाचं घरगुती नातं जुळलं होतं. आमच्या सुख-दु:खांत ते आणि त्यांच्या सुख-दु:खांत आम्ही नेहमी सामील असतो. बी. आर. यांच्याबद्दल आम्हा सर्वाना खूपच आदर. मोठय़ा भावासारखं त्यांच्याशी आमचं नातं होतं. तर यशजी हे वयानं माझ्या बरोबरीचे!

यशजी भक्कम बांध्याचे होते. सतत काही ना काही चघळत असायचे. बहुधा वेलची किंवा लवंग वा एखादं च्युईंग गम. पण ते चघळताना त्यांच्या मनात सतत चित्रपटनिर्मितीचाच विचार सुरू असायचा. ते अदबशीर होते. वक्तशीर होते. दुसऱ्यांशी बोलताना त्यांचा पूर्ण आब राखूनच ते बोलत असत. माझा त्यांच्याबाबतीत हाच अनुभव आहे. ‘कुलवंतजी’ अशी सुरुवात करूनच ते माझ्याशी बोलायचे. कपडय़ांचा जबरदस्त सेन्स त्यांच्याकडे होता. त्यांना मी कधीही बेंगरूळ कपडय़ांत पाहिलं नाही. स्त्रियांविषयी त्यांच्या मनात प्रचंड आदर असे. ते गप्पा मारताना म्हणत, की ‘चित्रपटासारख्या कलेत जर स्त्रीला परावलंबी दाखवलं तर आपण समाजाला काय उत्तर देऊ शकू?’

सभ्यता, सुसंस्कृतपणा हे चोप्रा परिवाराचं मोठं वैशिष्टय़! बी. आर.जी काय, यशजी काय किंवा राज वा धरमजी काय, या संपूर्ण परिवाराला कोणतंच व्यसन नाही. हीच गोष्ट मला बी. आर. आणि यशजींच्या जवळ घेऊन जाणारी ठरली. ते दिखाऊ  नाहीत ही बाब मला महत्त्वाची वाटे. कारण मुळातच राजस वृत्ती असणाऱ्यांना राजेपणाचं सोंग आणावं लागत नाही. ही चोप्रा मंडळी ‘पार्टी अ‍ॅनिमल्स’ नाहीत. दहामधल्या जेमतेम दोन वा तीन- त्याही महत्त्वाच्या वाटेल अशाच पाटर्य़ाना ते जातील! हे सगळे खूपच नाती जपणारे आणि बाहेरच्यांनाही घरातले करणारे. मैत्रीच्या नात्याचे मूल्य त्यांना अतिशय महत्त्वाचे वाटते. तसं या सर्वाचं व्यसन एकच- चित्रपटनिर्मिती!

मोठय़ा भावाबरोबर अनेक हिट् चित्रपट दिल्यानंतर स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस असावं असं यशजींना वाटणं स्वाभाविक होतं. कितीही झालं तरी गरुडाला पंख फुटले की अंगणातलं आभाळ ठेंगणं वाटायला लागतं. यशजींनी शांतपणे १९७० च्या दशकात स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं आणि एकापेक्षा एक गाजलेले चित्रपट  दिले. त्यांच्या मोठय़ा भावाला- म्हणजे बी. आर.ना यशजींनी स्वतंत्र होणं फारसं रुचलं नव्हतं. इतकं, की यशजींनी स्वतंत्र प्रॉडक्शन हाऊस सुरू केल्यानंतर बी. आर. अनेक दिवस झोपेच्या गोळ्या घेत होते. पण जसजशी यशजींची स्वतंत्र ओळख निर्माण झाली, तसतसे ते माझ्याकडे आनंद व्यक्त करू लागले. यशजींच्या कर्तृत्वाविषयी बी. आर. यांना अभिमान वाटू लागला. यशजींच्या ‘दाग’च्या यशाचं सेलिब्रेशन मला आठवतंय. त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये वाह्यतपणाला स्थान नसतं, याचं अनेकांना आश्चर्य वाटत आलंय. परंतु एकूणच चोप्रा कुटुंबाच्या स्वभावाचा घाट पाहता ते कधी वेडंवाकडं काही करूच शकणार नाहीत याची खात्री तुम्हाला वाटावी.

एक अगदीच खासगी आठवण सांगतो. त्या काळात बॉलीवूडमधल्या मंडळींचे एक फॅमिली डॉक्टर होते. त्या डॉक्टरांचं नाव होतं डॉ. कपूर. त्यांच्याकडे फारशा डिग्य्रा नव्हत्या. वैद्यकशास्त्रातली कुठली तरी अगदीच प्राथमिक पदवी त्यांच्याकडे होती. परंतु त्यांच्या निदानावर आणि औषधोपचारावर कपूर कुटुंबीय, रोशन कुटुंबीय अशा सर्वाचा आंधळा विश्वास होता. आम्हीही त्यांच्याकडेच जायचो. माझे चांगले मित्र होते ते.  बी. आर.- यशजी आपल्या परिवारासोबत कित्येकदा डॉ. कपूर यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन ‘प्रीतम’मध्ये जेवायला यायचे, इतके त्यांचे घरगुती संबंध होते. माझी पत्नीही त्यांच्याबरोबर कौटुंबिक नातं राखून होती. आमचा ‘स्टफ्ड कुलचा’ या सर्वाच्या आवडीचा! भरपेट खाऊन झाल्यावर ‘कुलवंतजी, आम्हाला प्रत्येकी दहा-दहा कुलचे बांधून द्या,’ असं ते सांगायचे. (या सर्वाचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे सगळे जण हॉटेलचं बिल भरायचे. कोणीही कधीही आम्ही मोठे आहोत असं मानून बिलं बुडवली नाहीत की कटकट केली नाही.)

१९७१ मध्ये यशजींच्या मुलाचा- आदित्यचा जन्म झाला. सर्वाना खूप आनंद झाला. पण दुर्दैवानं आदित्यचे ओठ जन्मत:च फाटलेले होते. त्याच्यावर उपचार करून हे व्यंग दूर करायला हवं होतं. अमेरिकेत जाऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी असा निर्णय झाला. तशी शस्त्रक्रिया झाली आणि आदित्यचं व्यंग दूर झालं. त्या शस्त्रक्रियेच्या वेळी डॉ. कपूर हे अमेरिकेत त्यांच्यासोबत होते. यशजी दोस्तीला किती महत्त्व देत असत हे यावरून लक्षात येईल.

यशजींनी यशाची नवनवी शिखरं पटापट गाठली. अमिताभ बच्चन यांना त्यांची ‘अँग्री यंग मॅन’ची प्रतिमा यशजींच्याच ‘दीवार’, ‘त्रिशूल’ या चित्रपटांनी कायमची मिळवून दिली. यशजींच्याच ‘कभी कभी’, ‘सिलसिला’ यांसारख्या चित्रपटांतून अमिताभना एक हळवा, कविमनाचा प्रेमी म्हणून पेश केलं. अपयशाच्या गर्तेत गेलेल्या अमिताभना यशजींच्याच ‘मोहब्बतें’ने नवे यश मिळवून दिले. कोणत्याही मोठय़ा यशामागे धाडसी निर्णयाची पाश्र्वभूमी असते. यशजी नेहमीच असे धाडस करत असत. बनलेले साचे, प्रतिमा ते मोडत. असं असूनही ते अत्यंत मार्दवशील आणि अदबशीर होते.

१९९६-९७ च्या दरम्यान आमच्या आंतरराष्ट्रीय पंजाबी असोसिएशनचा पुरस्कार यशजींना देण्याचं आम्ही ठरवलं. मी त्या संस्थेचा अध्यक्ष होतो. मी यशजींना फोन करून आम्ही भेटायला येत असल्याचं कळवलं. कारण मात्र सांगितलं नाही. माझ्यासोबत असोसिएशनचे काही पदाधिकारी होते. आम्ही लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळच्या यशजींच्या स्टुडिओत गेलो, तर ते आम्हाला गेटवर सामोरे आले. मला मिठी मारली. सर्वाचं स्वत: आगतस्वागत केलं. मग आम्हाला त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. तिथं गेल्यावर त्यांनी आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, आप यहाँ बैठिये.’’ मी हबकलोच! एवढा मोठा चित्रपट निर्माता आणि महान दिग्दर्शक मला स्वत:च्या खुर्चीत बसायची विनंती करतो आहे. मी ‘नको, नको’ म्हटलं. तर यशजी म्हणाले, ‘‘कुलवंतजी, तुमचा अधिकार आहे या खुर्चीत बसायचा. आपण जरी समवयस्क असलो तरी तुम्ही बी. आर.जींचे मित्र आहात आणि आमच्या पंजाबी असोसिएशनचे अध्यक्ष आहात. तुम्ही जर या खुर्चीत बसला नाहीत तर मीही उभाच राहीन.’’ माझे डोळे कधी नव्हे ते पाण्याने डबडबले. मी सहसा भावनाविवश होत नाही; पण त्यावेळी झालो खरा! आम्ही यशजींचं कौतुक करून त्यांना आमचा पुरस्कार देतो आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा, अशी विनंती केली. त्यांनी आनंदानं तो पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं. आम्हाला खूप बरं वाटलं.

त्यांच्यासमवेत आम्ही आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या काही पंजाबी बांधवांचाही सत्कार करणार होतो. हॉटेल ललितमध्ये तो कार्यक्रम करायचं ठरवलेलं. कोणी कसं बसायचं, त्या कार्यक्रमाची आखणी कशी असेल याविषयी मी यशजींशी चर्चा करत होतो. तर यशजी म्हणाले, ‘‘कुलवंतजी, व्यासपीठावर आम्हाला कोणालाही बसवू नका.’’ मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिलो. माझ्या नजरेतला भाव त्यांच्या लक्षात आला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही आमचा सन्मान करणार आहात. त्यामुळे असोसिएशनचे पदाधिकारी सारे व्यासपीठावर बसा. आम्हाला खाली एका टेबलवर बसवा आणि एकेकाला पुरस्कार घेण्यासाठी वर बोलवा. कार्यक्रम छान होईल.’’ मग त्यांनी विचारलं, ‘‘मनोरंजनाचे काही कार्यक्रम करणार आहात किंवा कसं..?’’ त्यांनी काही गाणाऱ्या नवोदितांची नावं सुचवली. आणि काय सांगू तुम्हाला- सगळा कार्यक्रम अक्षरश: दृष्ट लागण्याजोगा झाला!

भन्नाट! नव्या पद्धतीने पार पडलेला पुरस्कार वितरण समारंभ आणि त्याला पंजाबी तडका! आणि हे सारे घडून येण्यामागे यशजींची कल्पकता होती. स्वत: सारं हळुवारपणे सुचवून नामानिराळे! खरंच आहे.. रिकामी भांडी आवाज करतात, भरलेलं भांडं आवाज करत नाही!

ksk@pritamhotels.com