मुंबई ही मुंबईच! या शहराला तोड नाही. आमचं रावळपिंडी सुटलं आणि आम्हाला घर लाभलं ते मुंबईत! या शहरानंच आम्हाला उभं केलं. आम्हालाच काय, अनेकांना मुंबईनं उभं केलं. आजची मुंबई वेगवान आहे; पण जुन्या मुंबईलासुद्धा गती असली तरी तिच्यात एक ठाय लयही होती. ती स्वत:च्याच गतीनं पुढे जात होती. दादर, परळ, गिरगाव भागांत तेव्हा चाळी होत्या. या चाळींची स्वत:ची अशी एक संस्कृती होती. दुसऱ्या महायुद्धात भीतीनं बरेचसे मुंबईकर दूर भागांत निघून गेले. तो दूरचा भाग म्हणजे वांद्रे, खार, पार्ले, इत्यादी! या गोष्टीवर लोकांचा आज कदाचित विश्वास बसणार नाही. दादरनंतर किंग्ज सर्कलच्या पुढं फारशी वस्ती नव्हती.

मुंबईत स्वत:ची कार घेऊन सहज फिरायला जाता येत होतं. माझे पापाजी तर मुंबईत भटकण्याचे शौकीन होते. त्यांच्या मोठय़ा गाडीत एखाद्या मित्राबरोबर ते मागच्या सीटवर बसून चिकन-कबाब, शेंगदाणे वगैरे खात गप्पा मारत मस्त फिरत असत. दादर ते जी. पी. ओ.पर्यंत जायला त्यांना फार तर पंचवीस मिनिटे लागत. त्यावेळी संध्याकाळी मरिन ड्राइव्हवरचा सूर्यास्त पाहणं मजेचं वाटे. दादरला आज जिथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृतिस्थळ असलेली सुंदर चैत्यभूमी आहे, तिथं समुद्रकिनारा होता. तिथल्या वाळूच्या पुळणीत वाळूची शिल्पं बनवणारा एक शिल्पकार दररोज अप्रतिम शिल्पं तयार करायचा. ती वाळूशिल्पं पाहणं गमतीचं वाटे. तेव्हा जुहू-वांद्रय़ाला फिल्मी वस्ती फारशी गेली नव्हती. सगळे मुख्य शहरातच राहत असत. पण शहराबाहेर पहिल्यांदा स्टुडिओ थाटला तो राजजींनी.. राज कपूर यांनी!

Mumbai Pune Expressway The area near Khalapur toll plaza will be free of traffic congestion Mumbai news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग: खालापूर पथकर नाक्याजवळील परिसर वाहतूक कोंडीमुक्त होणार
Change in Khopoli bypass on Mumbai Pune Expressway from Monday mumbai
सोमवारपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली बाह्यमार्गात बदल
Mumbai-Ahmedabad National Highway
पालघर : राष्ट्रीय महामार्गावर अपघात, वाहतूक विस्कळीत; संत्रा वाहतूक करणारी गाडी उलटली
Raju Shetty on highway
धार्मिक स्थळे जोडणाऱ्या महामार्गासाठी चौपट नुकसान भरपाई मिळावी; अन्यथा, रक्ताचे पाट वाहतील पण.. – राजू शेट्टी यांचा इशारा

राज कपूर हे माझ्यापेक्षा वयानं मोठे होते. पृथ्वीराजपापाजींचा हा मुलगा शिक्षणात फारसा रमत नव्हता. त्यांना नाटक-चित्रपटांतच काम करायचं होतं. पृथ्वीराजजींनी राजजींचा कल बघून त्यांना शाळेतून काढून थेट केदार शर्माकडे उमेदवारी करायला पाठवलं. चित्रपट उद्योगाचे अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांचा हा मोठा मुलगा केदार शर्माकडे एक साधा, तिसरा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला! त्यांना मी प्रत्यक्षरीत्या पहिल्यांदा पाहिलं ते राजजी सायकलवरून डबा आणण्यासाठी प्रीतममध्ये यायचे तेव्हा! ‘पृथ्वीराजजींचा मुलगा’ म्हणून शेखी न मिरवता ते सर्व प्रकारची कामं करायचे. निळ्या डोळ्यांचे, झुलपं वाढवलेले, अत्यंत देखणे, गोरेपान राजजी पटकन् सर्वाना भुरळ घालायचे. त्यांचं बोलणं नेहमीच नम्र असे. ‘आप’शिवाय ते बोलतच नसत. केदार शर्माकडून भराभर शिकून ते हिरो बनले. नंतर त्यांनी धाडस करून चेंबूरला स्वत:चा स्टुडिओ थाटला. पृथ्वीराजजींच्या छायेतून बाहेर पडून त्यांनी स्वत:चं व्यक्तिमत्त्व घडवलं. त्यांच्या या प्रवासाचा मी जवळून साक्षीदार आहे. चेंबूरला स्टुडिओ सुरू केला तेव्हा अनेकांनी त्यांना वेडय़ात काढलं होतं. पण ते त्यांच्या निश्चयावर अटळ होते.

राजजी हे अतिशय मनस्वी कलाकार होते. त्यांच्या नायिकांबरोबर त्यांचं खास नातं असे. त्यांचा अभिनय राजजींच्या दिग्दर्शनाखाली अधिक खुलत असे. चेंबूरच्या आर. के. स्टुडिओमध्ये त्यांची स्वत:ची एक खास कुटी (झोपडी) होती. त्या दोन खोल्यांच्या छोटय़ाशा झोपडीत राजजींच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश नसे. तिथं प्रवेश म्हणजे राजजींच्या अंतरंगात प्रवेश असं मानलं जायचं. त्या खोल्या साध्याशा होत्या. छानपैकी कार्पेट अंथरलेलं. एका खोलीत येणारी माणसं बसत असत आणि दुसऱ्या खोलीत ते खास लोकांशी बोलत असत. त्यांच्या नायिकेला ते स्वत: स्टोरी ऐकवत. (आजही कदाचित ती झोपडी आर. के. स्टुडिओत असावी.) या कुटीमध्ये कुणाच्या परवानगीशिवाय आम्हाला मात्र थेट प्रवेश असे. मी कधी कधी राजजींकडे जात असे.

एका गाळ्यात सुरू झालेल्या आमच्या प्रीतम हॉटेलने जम बसवला आणि मग आम्ही ती पूर्ण इमारतच खरेदी केली. आणि या जागेत प्रीतमचं नूतनीकरण केलं. त्याचं थाटात उद्घाटन करावं व तेही राजजींच्या हस्ते- असं पापाजींना वाटलं. मनात आलं की लगेच ते कृतीत उतरवायचं, असा त्यांचा खाक्या होता. राजजी हे त्यांच्या मित्राचे पुत्र. त्यामुळे मी त्यांना निमंत्रण दिलं असतं तरी चाललं असतं. पण पापाजी म्हणाले, ‘तो आता मोठा माणूस झालाय. मीच त्याला निमंत्रण देतो.’ १९६६ सालच्या होळीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं संध्याकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास चेंबूरच्या स्टुडिओत गेलो. तोवर सारे निघून गेले होते. आम्ही राजजींच्या घरी गेलो. होळीनंतरचा दिवस. राजजींकडे त्या संध्याकाळी त्यांचे लंडनचे मित्र करतार लालवानी आले होते. राजजी आतल्या खोलीत होते. त्यांना आम्ही आल्याचा निरोप गेला. ते लगेच बाहेर आले. होळीची नशा अजून उतरली नव्हती. ‘‘ओये पापाजी, ओये पापाजी..’’ असं ओरडतच राजजींनी खाली वाकून पापाजींना नमस्कार केला. पापाजींनी ‘‘पुत्तर, पुत्तर’’ असं म्हणत त्यांना आलिंगन दिलं. मलाही त्यांनी घट्ट मिठी मारली. पापाजींनी त्यांना येण्याचं कारण सांगितलं. ते खूश झाले. त्यांनी जोरजोरात कृष्णाजींना हाका मारल्या . त्या वरच्या मजल्यावर होत्या. त्या ‘‘येते, येते’’ म्हणत होत्या, पण राजजी त्या खाली येईपर्यंत थांबतील तर ना! त्या खाली येईतो राजजी हाका मारतच होते. ‘‘लवकर ये, लवकर ये’’चा धोशा सुरू होता. त्या आल्यावर राजजी त्यांना म्हणाले, ‘‘देखो, हम दोनों को बुलाने के लिये पापाजी खुद यहाँ पर आये है. कितनी किस्मतवाली हो तुम. आपल्या दोघांच्या हातून नव्या प्रीतमचं उद्घाटन होणार आहे! उद्या सकाळी अकरा वाजता आपल्याला प्रीतममध्ये जायचंय. जाऊ  या ना? पापाजी, हम दोनों ठीक ग्यारह बजे पहूँच जायेंगे.’’

मात्र तरीही आम्ही थोडेसे साशंकच होतो. राजजी अजून होळीच्या धुंदीत होते. दुसऱ्या दिवशी ते कसे येतील? पण बरोब्बर अकराला पाच मिनिटं असताना राजजींची काळी ब्यूक कार प्रीतमसमोर येऊन उभी राहिली. कृष्णाजींसोबत ते गाडीतून उतरले. त्यांनी नूतनीकरण झालेल्या प्रीतमचं उद्घाटन केलं. त्या रात्री आम्ही प्रीतमच्या टेरेसवर एक छोटीशी पार्टी दिली, तिलाही ते हजर होते. पार्टीला व्ही. शांतारामजी, त्यांची मुलगी राजश्री, त्याच दिवशी ‘गीत गाया पत्थरोंनें’ हा चित्रपट साइन केलेला जितेंद्र, प्राणसाहेब, राजेंद्रकुमार आदी आले होते. त्या रात्री घरच्यासारखे पुढाकार घेऊन राजजी पार्टीत शरीक झाले होते. माझ्या दुसऱ्या अपत्याला कडेवर घेऊन ‘मेरा बेटा, मेरा बेटा’ करत सर्वत्र फिरवीत होते. ते घरच्यांसाठी अगदी साधे होते.. निगर्वी!

आम्ही पूर्वी वर्षांतून तीनदा पार्टी देत असू. त्याला राजजी आवर्जून येत असत. त्यांना मद्य आवडत असे, हे सर्वश्रुत आहेच. पण मद्य त्यांच्यावर कधीही स्वार होत नसे. मात्र, काही वेळा ते मदिरेचा अंमल चढल्याचं नाटक करीत असत. कारण त्यावेळी ते त्यांचे काही हिशेब चुकते करत. त्यांनी सर्वस्व पणाला लावून ‘मेरा नाम जोकर’ हा अप्रतिम चित्रपट बनवला होता. आणि त्याचवेळी एका निर्माता-वितरकाचा तगडय़ा स्टारकास्टचा एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या वितरकानं राजजींचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट पाडण्यासाठी जबरदस्त शक्कल लढवली. त्याने सुरुवातीच्या खेळांची सगळी तिकिटं खरेदी केली. ती तिकिटं देऊन स्वत:ची माणसं चित्रपटगृहांत बसवली. या भाडोत्री माणसांनी गाणी सुरू असताना मधेच उठून जाऊन ‘पिक्चर बेकार आहे’ अशी आवई उठवली. हे सारं नंतर आमच्या लक्षात आलं. मी तेव्हा चित्रपट वितरण आणि फायनान्सच्या व्यवसायातही होतो. माझ्या एका पार्टीत राजजी आणि तो निर्माता-वितरक समोरासमोर आले. पार्टीला बी. आर. चोप्रा, चेतन आनंद, एअर चीफ मार्शल मेहरा आदी मंडळीही निमंत्रित होती. ते दोघे तसे एकमेकांचे उत्तम मित्र होते. राजजींनी भरपूर मद्य प्यायल्याचं नाटक केलं आणि त्या चित्रपट वितरकाला म्हणाले, ‘‘तू मुद्दाम माझा चित्रपट पाडलास. तू काय काय केलंस ते मला माहिती आहे. तू माझा चित्रपट फेल केलास. मी सर्व काही गमावलंय त्यात. पण लक्षात ठेव- मी राज कपूर आहे. तू माझा चित्रपट फेल करशील रे.. पण राज कपूरला फेल नाही करू शकणार! बघ, मी पुन्हा एकदा उभा राहीन. पण लक्षात ठेव- तू जे केलंस ते मी मरेपर्यंत विसरणार नाही.. आणि दुसऱ्याच्या बाबतीत तसे होऊ  देणार नाही.’’

राजजी एक जखमी शेर होते. पण शेवटी शेर तो शेरच ना! राजजींनी त्यानंतर ‘बॉबी’ केला. त्या काळात मुंबईत ‘ताजमहाल’, ‘अ‍ॅम्बॅसेडर’ आणि ‘नटराज’ ही एवढीच मोठी हॉटेलं होती. सिनेमावाल्यांचं लाडकं हॉटेल म्हणजे ‘नटराज’! एक दिवस राजजी माझ्याकडे आले. म्हणाले, ‘‘अरे यार कुलवंत, देखो- ‘मेरा नाम जोकर’मुळे मी पार खंक झालोय. एक भी पैसा नहीं है. पण मी आता एक नवा चित्रपट बनवतोय. कारण मला तेवढंच येतं. हा लो बजेट पिक्चर आहे. त्यात मी चिंटूला (ऋषी कपूर) लाँच करणार आहे. त्याची हिरॉइनही नवी घेतोय. सगळंच नवं घेतोय. कमीत कमी पैशांत सगळं झालं पाहिजे. तू तुझ्या ‘पार्क वे’ हॉटेलमधल्या सहा खोल्या मला काही महिने दे. त्यांचे पैसे मी देऊ  शकेन की नाही, हे मला माहीत नाही. चित्रपट चालला तर ठीक; नाही चालला तरी मी जेव्हा शक्य होईल तेव्हा ते पैसे परत करेन. आज माझ्याजवळ माझी स्वत:ची एकच गाडी आहे.. अ‍ॅम्बॅसिडर! पैसे देता आले नाही तर तीच मी तुला देऊन टाकीन. गॅरेजमध्ये ब्यूक आहे, पण ती चालवण्याइतकीही ऐपत नाही माझी.’’

मी पटकन् म्हणालो, ‘‘राजजी, असं काय बोलता? ‘पार्क वे’ तुमचंच आहे. हवं तितके दिवस राहा.’’

राजजी म्हणाले, ‘‘तो यूनिट को बोल दूँ?’’

मी काही न बोलता त्यांच्या हातात चाव्या दिल्या. पुढे सहा महिने त्या सहा खोल्यांत दिवसरात्र मेहनत केली गेली. ‘बॉबी’ची कथा रचली गेली. स्क्रिप्ट लिहिलं गेलं. संवाद लिहून झाले. संगीत बनलं. नऊ  महिन्यांत सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं आणि ‘बॉबी’ प्रदर्शित झाला! पहिल्याच दिवशी तो सुपरडुपर हिट् झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन-चार दिवस राजजी कोणाला भेटत नसत.

चार दिवसांनी ते माझ्याकडे आले. मला मिठी मारून ओरडले, ‘‘ओये, यार कुलवंत, तेरी पिक्चर हिट् हो गयी है।’’

तेरी पिक्चर? राजजींच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेला आजवरच्या सिनेइतिहासातील महत्त्वाचा चित्रपट! त्यांनी बनवलेला!! आणि ते मला म्हणत होते.. ‘तेरी पिक्चर’! खूप आनंद झाला त्या दिवशी. मी म्हणालो, ‘‘राजजी, ईश्वर आप के साथ है और आप मालिक के बंदे हो।’’

राजजींनी माझ्यासमोर एक कोरा चेक ठेवला अन् म्हणाले, ‘‘काय हवी ती रक्कम त्यावर घाल.’’ चंदेरी दुनियेच्या उफराटय़ा हिशेबांतला एक हिशेब राजजी सरळ पूर्ण करत होते.

मी हळूच पुटपुटलो, ‘‘हिशेब करून सांगतो, तेवढेच मला द्या.’’

राजजी हसले अन् म्हणाले, ‘‘ओये कुलवंत, तू ऐसाही रहेगा हमेशा।’’

हां राजजी.. मी तसाच राहिलो. म्हणून आज चौऱ्याऐंशीव्या वर्षीदेखील शांतपणे झोपू शकतो. नानकसाहेबांच्या शिकवणीपलीकडे गेलो नाही आणि पापाजींच्या आशीर्वादाशिवाय काही मागितलं नाही.. दुसरं काय!

कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर