तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com

पहला पहला प्यार
तिला पाहिले आणि मी तिच्या अक्षरश: प्रेमातच पडलो. हे काही मुलीवरचे प्रेम नसून, मी माझ्या बाइकवरच्या प्रेमाविषयी बोलतोय. मी पुणेकर. तसाही घरामध्ये नवीन बाइक घेण्याचा विचार चालू होताच. येथील मार्केट यार्डवरून येत असताना सहज मनात विचार आला आणि ढोणे ऑटोमोबाइल्स रॉयल एनफील्ड बाइकच्या शोरूमला आई आणि मी गेलो. आतमध्ये जाताच क्षणी माझीच काय पण माझ्या आईची नजर खिळली ती फक्त रॉयल एनफील्ड डेझर्ट स्टॉर्म ५०० सीसीच्या बाइकवरती. तिचा रुबाब, तिची अदा, तिचा डौलदारपणा पाहूनच मी वेडा झालो आणि हीच बाइक घ्यायचे ठरवले. आईनेही क्षणाचा विलंब न करता माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि त्याच दिवशी बुकिंगसुद्धा करून टाकले. फक्त एकाच गोष्टीमुळे मन उदास झाले तो तिचा वेटिंग पीरिअड ऐकून! पण सब्र का फल मिठा होता है। या उक्तीनुसार तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस आला. तो दिवस होता २०१३च्या लक्ष्मी पूजनाचा.. पूजा झाली, पेढे वाटले. सर्व मित्रांनी, शेजारच्यांनी आणि नातेवाईकांनी शुभेच्छांचा आणि कौतुकांचा वर्षांव केला. तसेच बाइकच्या पसंतीलाही भरभरून दाद दिली आणि नवीन बाइकवरती डौलात फेऱ्याही मारल्या. त्यानंतर आजपर्यंत छोटय़ा-मोठय़ा बाइक ट्रिप्स मित्रांबरोबर यशस्वीरीत्या पार पाडल्या. सर्व मित्रांच्या सोबतीने, सहकार्याने आणि प्रयत्नातून आम्ही एक बाइक क्लबसुद्धा फॉर्म केलाय आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
– अनिकेत कामठे, पुणे</strong>

अपरंपार प्रेमाची अनुभूती
वयाच्या बाराव्या वर्षांपासून मी बाइक चालवायला शिकलो. बाइकवेडाचा हा वारसा मला माझ्या वडिलांकडूनच मिळाला. आमच्याकडे एम80 पासून आताच्या पॅशन बुलेटपर्यंत सर्व गाडय़ा होत्या आणि आहेतही. पावसात गाडी चालवण्याची मजा काही औरच. रेनकोट व हेल्मेट घालून मस्त लाँग ड्राइव्हला एकटय़ानेच जायला मला खूप आवडते. मी माझ्या बाइकची खूप काळजी घेतो. दर रविवारी मी स्वत: वेळ काढून बाइकची साफसफाई करतो. माझे माझ्या बाइकवर खूप प्रेम आहे आणि चिरंतन काळापर्यंत ते टिकून राहणार आहे याची खात्री आहे मला.
– सुहास काडे, सोलापूर

बाइक इज माय लाइफ
मी इयत्ता सातवीपासून बाइक चालवतो. (कृपया असा गरसमज करून घेऊ नका की मी अगदी सातवीपासूनच हायवेवर बाइक चालवतोय. मी रीतसर परवाना मिळाल्यावरच भररस्त्यात बाइक चालवायला लागलो.) मला गाडी चालवण्याचे खूप वेड आहे. मला लांब हायवेने भटकायला खूप आवडते. मी कुठेही जायचे म्हटले तर बाइकनेच जातो. एकदा आमच्या जवळच्या आजोबांना त्यांच्या एका नातेवाईकाला भेटायला जायचे होते. त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचे होते आणि त्यांना तातडीने जायचे होते. ते लोकांना विनवणी करत होते, पण कुणीच त्यांना सोडत नव्हते, शेवटी मी सोडले, तेव्हा मी लहान होतो. ते आजोबा खूप खूश झाले. मलाही बाइक चालवायला मिळाल्याने मीही खूश होतो. माझे मित्र मला म्हणतात की, लोक मुलींच्या प्रेमात पडतात, पण तू तर पहिल्यांदा बाइकच्याच प्रेमात पडला. आणि खूप खरे आहे, हे.
अप्पासाहेब गदादे, अहमदनगर</strong>

अमेरिकेत.. हमारा बजाज
ऑक्टोबर, २०१३ मध्ये कंपनीच्या कामासाठी बीव्हर्टनला (ओरेगॉन राज्य, अमेरिका) जायचा योग आला.तिथे हॉटेल मधून बाहेर पडताना मला हॉटेलच्या पाìकग मध्ये एक स्कूटर पार्क केलेली दिसली.जवळ जाऊन बघतो तर त्या वरचं बजाज चेतक नाव बघून मी उडालोच. भारतापासून दहा हजार किलोमीटर लांब आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशात शंभर टक्के भारतात बनलेली बजाज चेतक बघून ऊर अभिमानाने भरून आले. मीही १९९३ ते २००९या काळात बजाज चेतक स्कूटर  वापरली होती आणि तिने मला माझ्या अनेक सुख-दुखात साथ दिली होती. त्याच स्कूटरवरून मी आणि माझ्या पत्नीने महाबळेश्वर , सातारा अशा अनेक सहली केल्या. माझ्या मुलाच्या जन्माच्यावेळी पुण्यात रिक्षावाल्यांचा संप सुरू असताना मी माझ्या पत्नीस याच स्कूटरवरून रुग्णालयात घेऊन गेलो होतो. मी थांबून त्या स्कूटरच्या मालकाची आतुरतेने वाट बघू लागलो. थोडय़ा वेळाने एक ३० वर्षांचा अमेरिकन तरुण हातात हेल्मेट घेऊन स्कूटर चालू करू लागला.त्याच्याशी बोलल्यावर कळले की त्याचे नाव कि त्याचे नाव इयान आहे आणि तो गेली १२ वष्रे विनासायास बजाज चेतक स्कूटर वापरत होता आणि ते त्याच आवडतं वाहन होतं. जेव्हा मी त्याला मी भारतीय आहे आणि ती स्कूटर भारतात तयार झाली आहे हे सांगितले तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटले. मी त्या स्कूटरचे काही फोटो काढले आणि त्याचे नाव आणि फोन क्रमांक घेऊन त्याचा निरोप घेतला.
श्रीकृष्ण सहस्रबुद्धे, पुणे