22 August 2017

News Flash

संकल्प, सिद्धी आणि नियती

काँग्रेसच्या पटेल यांच्याबरोबरचे शत्रुत्व अमित शहा यांनी इतके प्रतिष्ठेचे केले नसते तर त्यांचा विजय

लोकसत्ता टीम | Updated: August 10, 2017 2:57 AM

काँग्रेसच्या पटेल यांच्याबरोबरचे शत्रुत्व अमित शहा यांनी इतके प्रतिष्ठेचे केले नसते तर त्यांचा विजय शहा यांना इतका जिव्हारी लागला नसता..

अध्यक्षीय आरोहणाचा तिसरा वर्धापन दिन साजरा करीत असतानाच त्याच दिवशी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना गुजरातमध्ये काँग्रेसच्या अहमद पटेल यांचा विजय पाहायला लागावा यात एक काव्यात्म पण तितकाच करुण न्याय दडलेला आहे. ही लढत भाजपसाठी अजिबात महत्त्वाची नव्हती. पण पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. त्याउलट विरोधी बाजूला अहमद पटेल यांच्यापेक्षा ही लढत काँग्रेससाठी जीवनमरणाची होती. तिचा निकाल अखेर काँग्रेसच्या बाजूने लागला आणि महाताकदवान अमित शहा यांना घरच्या अंगणात आसन्नमरण अशा काँग्रेसने बघता बघता धूळ चारली. गेले काही दिवस शहा आणि अर्थातच मोदी हे जणू अजेय आहेत, असे भाजपकडून दाखवले जात होते. हे मिरवणे किती वरवरचे आहे, हे या एकाच निकालाने दाखवून दिले. काँग्रेस, भाजप आणि मुख्य म्हणजे प्रसारमाध्यमे यांनी काही शिकावे असे बरेच काही या निवडणुकीत घडले. आवर्जून लक्षात घ्यावेत असे त्यातील हे काही धडे.

पहिला धडा भाजपसाठी. शक्तिमानाने कोणत्या कारणासाठी किती शक्ती लावावयाची याचाच विवेक नसेल तर काय होते, ते ही निवडणूक सांगते. या निवडणुकीत गुजरातेतील तीनपैकी एक जागा भाजपच्या पदरात पडली नसती तर काहीही बिघडले नसते. राज्यसभेत यामुळे कोणत्याही पद्धतीने परिणाम झाला नसता. तरीही भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली. त्यामागे केवळ सूड हे कारण होते. मनमोहन सिंग सरकारच्या काळात काँग्रेस सरकारने अमित शहा यांचे जिणे हराम केले होते आणि त्यामागे अहमद पटेल हे होते. त्यामुळे या पटेल यांचे नाक कसेही करून कापायचे असा शहा यांचा पण होता. जगण्याच्या अन्य क्षेत्रांप्रमाणे राजकारणातही सूड महत्त्वाचा हे मान्य. परंतु तो घेताना आपणास काय किंमत द्यावी लागणार आहे याचाही हिशेब करावा लागतो. शहा यांनी तो केला नाही. त्यांनी ही निवडणूक अकारण प्रतिष्ठेची केली. एकदा का वैयक्तिक मानसन्मानाचा मुद्दा उघडय़ा व्यासपीठावर आला की अपमानही तसाच उघडय़ावर घडतो. शहा यांना ते आता लक्षात येईल. काँग्रेसच्या पटेल यांच्याबरोबरचे शत्रुत्व त्यांनी इतके प्रतिष्ठेचे केले नसते तर त्यांचा विजय शहा यांना इतका जिव्हारी लागला नसता. एका खासदाराच्या निवडणुकीला नको इतके महत्त्व दिल्यामुळे पटेल यांच्या विजयाला आणि त्याहीपेक्षा शहा यांच्या पराभवाला नको इतके महत्त्व आले. म्हणजेच आपल्या विवेकहीन आग्रहामुळे त्यांनी उलट पटेल यांनाच प्रतिष्ठा मिळवून दिली.

दुसरा मुद्दा सरकारने लक्षात घ्यावा असा. आपल्या पक्षाच्या अध्यक्षामागे सर्व ताकदीनिशी उभे राहणे हे नरेंद्र मोदी सरकारचे कर्तव्य होते, हे ठीक. परंतु त्यासाठी सर्व सरकारी शहाणपण खुंटीला टांगून ठेवावयाची गरज नव्हती. मोदी सरकारने ते तसे ठेवले. काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यापासून यास सुरुवात झाली. या आमदारांवर दबाव यावा यासाठी सर्रास पोलिसांपासून अन्य सर्व सरकारी यंत्रणा भाजपच्या बाजूनेच राबल्या. गुजरातेत भाजपचे सरकार आहे. तेथे या आमदारांची शिकार करणे सहज शक्य असल्याने काँग्रेसने या सर्वाना आपल्या पक्षाचे सरकार असलेल्या कर्नाटकात हलवले. त्यानंतर केंद्र सरकारला कर्नाटकी मंत्र्यांच्या भ्रष्ट संपत्तीचा साक्षात्कार झाला आणि आयकर खात्याने त्याच्या घर, कार्यालयावर छापे टाकले. गुजरात निवडणुका आणि गुजरात आमदारांना आसरा हे मुद्दे नसते तर अर्थातच या काँग्रेस नेत्याबाबतचा साक्षात्कार आयकर खात्याला झाला नसता. मोदी सरकारचे या संदर्भातील औद्धत्य इतके की संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे घातले गेले. त्याचे पडसाद संसदेत उमटल्यावर सारवासारवीचा सरकारकडून प्रयत्न झाला. तो साफ फसला. या छाप्यांचा संबंध गुजरात निवडणुकांशी नाही या सरकारच्या दाव्यावर एक शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. आणि हे सर्व करूनही परत ज्यासाठी ते केले त्यात भाजपला अपयशच आले. तेव्हा पक्षीय उद्दिष्टांसाठी इतक्या निर्लज्जपणे सरकारी यंत्रणा वापरू द्यावी का, याचा विचार भाजपला करावा लागणार आहे. याबाबतच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना सत्तेवर असताना काँग्रेसही हेच करीत होती, असा युक्तिवाद भाजप करतो. तो त्यांच्या मस्तवालपणाचा द्योतक ठरतो. काँग्रेसने खाल्लेल्या प्रत्येक शेणाची चव घेऊन पाहणे हेच जर भाजपचे उद्दिष्ट असेल तर या दोन पक्षांत फरक तो काय?

तिसरा मुद्दा जनता दल आणि भाजपच्या अन्य सहयोगी पक्षांचा. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली. त्या पक्षाच्या अर्धा डझन आमदारांनी आधीच पक्षांतर केले तर मतदानात दोन आमदार भाजपकडे वळले. पण त्याच वेळी लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे या खेळात भाजपचेदेखील दोन आमदार फुटले, त्याचे काय? यातील एक भाजपत विलीन झालेल्या पक्षाचा आहे आणि दुसरा नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचा. म्हणजे पक्ष फोडाफोडी हेच जर राजकारण असेल तर अन्य पक्षही तो उद्योग करू शकतात. तेव्हा या मार्गावर किती भरवसा ठेवावा हेदेखील भाजपने एकदा स्वत:च्या अंतरात्म्याला विचारावे. याचे कारण सध्या भाजप देशभरचा सर्वपक्षीय गाळ आनंदाने स्वीकारताना दिसतो. यातील काही गाळ अखेर आपल्याही अंगास चिकटू शकतो, याचे भान असलेले बरे.

चौथा धडा हा काँग्रेससाठी. गोवा, मणिपूर अशा राज्यांत सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसने आपल्या कर्माने सत्ता घालवली. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे सहा दशकांच्या सत्तेने अंगात भरलेला सुस्तपणा. आपला पक्ष म्हणजे सध्या ओसाड गावच्या पाटलांचे संघटन आहे, याचे भान या पक्षाला इतके दिवस नव्हते. गुजरात निवडणुकीने ते आले. आपल्या दोन फुटीर आमदारांनी निवडणूक नियमांचा भंग केल्याचे आढळल्याबरोबर लगेच या पक्षाने चिदम्बरम ते अभिषेक संघवी अशा आपल्या तगडय़ा विधिज्ञांना मैदानात उतरवण्याचे चापल्य दाखवले. सध्या हत्तीची ताकद कमावलेल्या भाजपच्या विरोधात मैदानात उभे राहावयाचे असेल तर काँग्रेसला हे चापल्य वारंवार दाखवावे लागेल. त्यासाठी आपल्या नेत्यांना मैदानात उतरवून घाम गाळून घ्यावा लागेल. भाजपचे अध्यक्ष अमित शहा पक्षवाढीसाठी शब्दश: अथकपणे काम करीत असतात. पक्षवाढीसाठी हे जमिनीवरचे काम आणि खलबतखान्यातील चाली दोन्हींची गरज असते. केवळ खलबतखान्यातील उद्योगांनी आणि चॅनेलीय चर्चानी पक्ष वाढत नाही. तेव्हा काय करायला हवे हे या निवडणुकीने काँग्रेसला दाखवून दिले आहे.

पाचवा मुद्दा नागरिकांनी लक्षात घ्यावा असा. या निवडणुकीत जे काही घडले त्यामागे काँग्रेसचे चापल्य असेल. पण ते पुरेसे नाही. या निवडणुकीचे खरे श्रेय जाते ते निवडणूक आयोगास. अर्धा डझन मंत्र्यांचा हल्लाबोल असताना, सरकार उरावर बसून हवा तो निर्णय काढून घेऊ पाहत असतानाही आयोग दबला नाही आणि आपल्या नियमाला जागला. ही बाब अभिमान वाटावा अशी. यामुळे तरी सुजाण नागरिकांनी स्वायत्त नियामक यंत्रणांचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. समाजाची प्रगती होते ती सत्ताधाऱ्यांमुळे नव्हे. तर अशा ताठ कण्याच्या नियामक यंत्रणांमुळे. तेव्हा अशा यंत्रणा जास्तीतजास्त कशा तयार होतील यासाठी नागरिकांनी सजग राहायला हवे.

हा सल्ला माध्यमांनाही लागू पडतो. सत्ताधाऱ्यांची तळी उचलण्यात आपला धर्म नाही हे माध्यमांनी लक्षात घ्यायला हवे. सत्ताधारी.. मग ते कथित धर्मनिरपेक्ष काँग्रेसवाले असोत वा तितकेच कथित राष्ट्रवादी भाजपवाले असोत वा भंपक आतला आवाजवाले समाजवादी असोत.. माध्यमांनी सुरक्षित अंतर पाळायलाच हवे. गुजरात निवडणुकीत ते कसे पाळले गेले नाही, हे दिसले. हा धडा सहावा.

आणि शेवटचा सातवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी. मोठे संकट आगमनाआधी सुगावा धाडते असे म्हणतात. रिझव्‍‌र्ह बँकेचा ताजा अर्थ अहवाल, मंदीसदृश स्थिती, हरयाणातील घटना आणि हा गुजरातमधील पराभव इत्यादी हे आगामी संकटाची चाहूल आहेत. याची पहिली चुणूक हाकेच्या अंतरावर आलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांतच दिसेल. या निवडणुकीत काँग्रेस ही भाजप अध्यक्षाच्या आतताईपणामुळे पुनरुज्जीवित झालेली असेल. परिणामी या निवडणुकीचा निकाल वाटतो तितका एकतर्फी लागणार नाही. राज्यसभा निवडणुकीने ते दाखवून दिले आहे. बुधवारी, ९ ऑगस्टच्या निमित्ताने, मोदी सरकारने  देशभर आपली ‘संकल्पातून सिद्धीकडे’ वाटचाल दाखवणाऱ्या जाहिराती केल्या आहेत. विख्यात मराठी लेखक दिवंगत वि. स. खांडेकर यांच्या एका कादंबरीतील नायक ‘संकल्प आणि सिद्धी यांत नियती असते’ असे म्हणतो. मोदी आणि भाजपनेही हे ध्यानात ठेवलेले बरे.

First Published on August 10, 2017 2:57 am

Web Title: ahmed patel to defeat narendra modi and amit shah juggernaut
 1. N
  Niteen Chitanvis
  Aug 13, 2017 at 8:07 pm
  गुजरात दंगली मध्ये साबरमती एक्सप्रेस मधील निरपराध लहान मुले स्त्रिया पुरुष यांचे पण हत्याकांड झाले पण ानु ि फ़क्त एका धर्माच्या लोकनाच मिळाली कुणीही त्या साबरमती मधील हत्याकाण्ड चा साधा उल्लेख पण कुणी करत नाही केवल अहमद पटेल आणि कांग्रेस पार्टी मुले आणि आशा व्यक्तीच्या विजयाला काय इतके महत्त्व द्यायचे
  Reply
 2. V
  Vincent Bagul
  Aug 12, 2017 at 11:19 pm
  सडेतोड आणि विचारप्रवर्तक अग्रलेख.
  Reply
 3. S
  sangleshriram
  Aug 11, 2017 at 2:45 pm
  काँग्रेसने खाल्लेल्या प्रत्येक शेणाची चव घेऊन पाहणे हेच जर भाजपचे उद्दिष्ट असेल तर या दोन पक्षांत फरक तो काय? हेच प्रश्न आम्हालाही नेहमीच पडतात जेव्हा भक्त भाजपच्या चुकीच्या कृत्याचेही समर्थन करतात
  Reply
 4. R
  Rakesh
  Aug 11, 2017 at 12:06 pm
  भाजप नेत्याचा मुलाने एका मुलीचा पाठलाग करून त्रास दिला त्यावर सुद्धा श्रीराम यांची प्रतिक्रिया नाही. यावरून असे वाटते की त्यांचे या घृणास्पद घटनेला समर्थन आहे. बहुतेक ते या घटनेचे समर्थन करण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावत असतील. बाकी त्यांच्या प्रतिक्रिया या बहुधा भारतीय स्त्रियांचा तिरस्कार करणार्याच असतात हे वेळोवेळी दिसून आले आहे.
  Reply
 5. N
  Narba
  Aug 11, 2017 at 12:08 am
  कुबेर साहेबांचे सध्या जसा आपण चस्मा घालू तसे जग दिसते तसे झाले आहे .त्यांना फक्त काँग्रेस मिंडेगिरी करायची आहे. काँग्रेसचा साप मारण्यासाठी केलेला कोणताही प्रयत्न स्वागतार्ह आहे. त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा देण्यासाठी हि पापे माफ. एक भक्त
  Reply
 6. U
  umesh
  Aug 10, 2017 at 8:41 pm
  अहमद पटेल हा नीच कुटील माणूस निवडून आल्याचा भलताच विकृत आनंद संपादक आणि त्यांचे पाळलेले प्रतिक्रियाकार श्वानांना झालाय अमित शहांनी एका खासदाराची निवडणूक प्रतिष्ठेची करायला नको होती तुम्ही मात्र त्यावर संपादकीय लिहून दुसरे काय केले? कारण पटेल विजयी झाले यापेक्षा संपादक आणि त्यांच्या कॉंग्रेसी बाजारबुणग्यांना अमित शहा हरले याचाच विकृत आनमद जास्त झालाय कॉंग्रेस इतका गलिच्छ नीचतम पक्ष असूनही तुम्हाला कॉंग्रेसची पीछेहाट इतकी का डाचते? कॉंग्रेसचे चार आणे सभासद नसूनही ही जाज्वल्य निष्ठा दाखवून केतकरांनी रक्त ओकले तरीही पद्मश्री मिळाले नाही तुम्हाला मिळेल असे वाटते का? आता तर कॉंग्रेसची ताकदही उरली नाही इतका एकतर्फी लेखन करणारा सामान्य दर्जाचा संपादक मी तरी आजवर पाहिला नाही
  Reply
 7. रांका
  Aug 10, 2017 at 8:10 pm
  संपादक स्वतःला अर्थशास्त्री मानतात, पण एकाच शितावरून त्यांची ते कसे रेटून खोटे व दिशाभूल करणारे लिहितात याची साक्ष पटते. त्यांच्या म्हणण्यानुसार या काँग्रेसी गुजराती आमदारांना शिवकुमार यांनी आसरा दिला म्हणून incomtax या केंद्राच्या अधिपत्या खालील संस्थेने धाड घातली हे शेंबड्या पोराला सुद्धा कळेल ! ज्यांचा थोडा सुद्धा या विभागाशी किंवा त्यांच्या कार्यशैलीशी संबंध/माहिती आहे त्यांना कळेल की एका वेळी 37 ठिकाणी दिल्ली पासून बेंगलोर पर्यंत धाड टाकणे हे किमान 6 महिन्याच्या अभ्यासाने व मागोव्या ने व नेटक्या नियोजनानेच शक्य आहे ! हे काही 4/6 दिवसाचे काम नाही. पण ठोकून द्यायचे म्हटल्यावर काय करणार? पत्रकारांसाठी कोणतीच आचारसंहिता नसल्याने, विचार स्वातंत्र्यच्या नावाखाली सोयीचे व दिशाभूल करणारे लिखाण केलेले चालते. या प्रकरणात प्रामाणिक काम केलेल्या माणसावर आपण अन्याय करतोय याची सुद्धा शुद्ध राहत नाही. यांनीच इलेक्शन कमिशनने उलटा निर्णय दिला असता तर त्यांची अब्रू काढली असती. मी असल्या कुजक्या लिखाणाचा एक नागरिक म्हणून निषेध करतो.
  Reply
 8. संदेश केसरकर
  Aug 10, 2017 at 8:07 pm
  सडेतोड आणि मुद्देसूद लेखन. शेवट हि सगळ्याच्या डोळ्यात अंजन घालणारा आणि वास्तववादी. नुसतेच प्लानिंग करून चालत नाही, नियतीची पण भूमिका असतेच. शहांनी प्लानिग चांगले केले पण नियतीला ते मंजूर नव्हते. पण त्यासाठी कॉंग्रेसजनांना हर्षवायू होण्याची गरज नाही. खर तर त्यांनी धडा घ्यायला पाहिजे कि भाजप आता किती बलवान झाला आहे. आणि हे कुठेतरी लेखनात नमूद व्हायला पाहिजे होते. म्हणजे लेख समतोल झाला असता.
  Reply
 9. S
  Shriram
  Aug 10, 2017 at 7:45 pm
  अमित, मोघम लिहीण्यापेक्षा किती तारखेच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली नव्हती ते सांगितल्यास बरे होईल. अलिकडे माझ्या 35-40 टक्के प्रतिक्रिया प्रसिद्ध होत नाहीत.पण तो हक्क लोकसत्ताचा आहे.ज्या छापतात त्यासाठी मी आभारी आहे. आज माझ्यामुळे त्या दोन तासात पाठवल्या गेलेल्या जवळजवळ 16-17 अन्यांच्या प्रतिक्रिया गाळल्या गेल्या होत्या ( नंतर दिसू लागल्यावर कळले) त्यामुळे कृष्णविवराचा उल्लेख करावा लागला.असेही असेल की काही तांत्रिक कारणाने तसे झाले असेल.तसे जाहिर झाल्यास ते मुद्दाम होत नाहिये हे कळेल.खुलासा झाल्यास बरे होईल.जरा मेहतांवरील अग्रलेखांची तारीख कळवावी. धन्यवाद.
  Reply
 10. J
  JaiShriRam
  Aug 10, 2017 at 4:38 pm
  शहाताई ..तुमच्या बुडाला आज आग लागलेली दिसतेय.....शेण पचलेले दिसत नाही ....किती धडे शिकवताय.....हाहा..
  Reply
 11. J
  JITENDRA
  Aug 10, 2017 at 4:29 pm
  लेख काही वाचला नाही कारण अशा फुटकळ विषयावरील लेख वाचण्याऐवजी तो वेळ इतर उपयुक्त वाचनासाठी घाला असा विचार करताना हे सांगावेसे वाटते कि अमित शाह, पटेल काँग्रेस, भाजप या पेक्षाही लोकसत्तेला यात जास्त रस होता कोण ठरतोय व कोण जिंकतोय यात आणि हा लेख त्याचा पुरावा आहे.
  Reply
 12. H
  harshad
  Aug 10, 2017 at 3:33 pm
  उर्मिला शाह- १) व्यापम मध्ये कुणी शेण खाल्ले. ४७ खून कसे काय झाले २) कोळसा घोटाळ्या मध्ये रेड्डी व येडियुरप्पा ची नवे आली ते कुठल्या पक्षात आहेत. ३) जेंव्हा घोटाळा झाला तेंव्हा नो लॉस नो गाईन मध्ये ९९क करोड मिळाले आणि आता घोटाळा ना होता फक्त ६५क करोड मिळाले कसे काय हो? ४) बँक चे NPA.10 गेले कितीजणांवर कारवाई केली. ५) जीव मोबाइलला मुले सरकार चे ७५० कोटी चे नुकसान झाले असा TRAI चा लेव्हल आहे त्या jio. च्या जाहिराती मध्ये कोण आहे ६) छत्तीसगढ चे मुख्यमंत्री रामानसिंह ह्यांनी खेडे दत्तक घेणायच्या योजने मध्ये स्वतःच्या बायकोचे रिसॉर्ट डेव्हलोप केले ७) किती एकर जमीन लाटली आदिवासींची त्याबद्दल काय ८) तांदूळ घोटाळा मध्ये त्यांचे नाव आहे 9) महाराष्ट्र मध्ये सुरुवात खडसे पासून झाली ती आता Mehta पर्यंत येऊन पोहचली त्याचे काय? १०) चालती मोदी ला मदत करणारे राजे बदल काय मत आहे? ११) ताडोबा अभयारण्य मध्ये अडाणी ग्रुप ला जमीन दिली त्याचे काय? ह्यावरून तुम्ही काही धडे घेणार आहेत का?
  Reply
 13. A
  arun
  Aug 10, 2017 at 3:31 pm
  अग्रलेखापेक्षा जास्त करमणूक प्रतिक्रियांनी झाली. राज्यसभेची निवडणूक प्रतीष्टेची केली गेली कारण काही काळ आधी राष्ट्रपतीपदाची निवडणूक दलित कार्डाने जिंकली होती. एकीकडे जातीयवाद संपवण्याच्या घोषणा करायच्या आणि दलित उमेदवार शोधायचं भांडवल करायचं. त्यामुळे फाजील आत्मविश्वास आला होताच. त्यातच विकल्या गेलेल्या, पैशाने अधीर झालेल्यानी करार झालेला मोबदला मिळवण्याची उतावळी केली आणि कागदि पुरावा दाखवला.( त्यामागे कोणाची फूस असली तर तो चाणक्यच म्हणावा लागेल. ) तोच नेमका क्षण अध:पतानाचा ठरला. आणि काँग्रेसला जीवदान मिळालं. यालाच नियती म्हणतात. बँकेच्या लोकरीच्या दोन चाव्या असतात तशा माणूस आणि नियती अशा दोन चाव्या हार-जीत होण्यात असतात. या एका सीटसाठी किती करोड खजिन्यातून गेले ? शेवटी ही लढाई होती. जो जिता वोही सिकंदर.. मोठा काळ राजकारणात राहिलेल्या अहमद पटेलांनी ती जिंकली. अजूनही महाराष्ट्रही हाती आलेलाच नाही, तोही याच आडमुठ्या कारणामुळे.आणि मुत्सद्दीपणाच्या अभावामुळे. या ४ वर्षात महाराष्ट्रही हाती लागला नाही. चाणक्यनीतीचा अभाव आणि स ीचा अभाव. संघाची मात्र प्रतिमा खराब झाली.
  Reply
 14. S
  Shriram Bapat
  Aug 10, 2017 at 2:52 pm
  कैलास. २०१९ मध्ये काय होईल याची काळजी मी कशाला करू. जे सर्व जनतेचे होईल तेच माझे होईल. शेवटी कोणीतरी म्हटलेच आहे " पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व."
  Reply
 15. दयानंद नाडकर्णी
  Aug 10, 2017 at 2:35 pm
  उत्तर प्रदेश विधान सभा निकालांच्या आदल्या दिवशी लोकसत्ताचे एक थोर माजी संपादक टेलीव्हिजन वर मुलाखत देत होते. ते म्हणाले कि मी सुम्पूर्ण उत्तर प्रदेश पालथा घातला पण ा भाजपा कुठंच दिसला नाही. ते पुढे म्हणाले कि खरं तर भाजपा निवडणुकीच्या स्पर्धेत नाहीच आहे. खरी लढत फक्त समाजवादी-काँग्रेस आणि बिसपी मध्येच आहे. भाजपा आलाच तर चवथ्या क्रमांक वर येईल. दुसऱ्या दिवशी काय घडले हे आपण सर्व जाणताच ! त्यामुळे स्वप्न बघायला काहीच हरकत नाही. कोणीही बघू शकतो.
  Reply
 16. H
  harshad
  Aug 10, 2017 at 2:32 pm
  ह्या भक्तांना एक ककळत नाही रघुराम राजन नंतर अजून एक अरविंद पांगारीया सोडून गेले हे अर्थतज्ज्ञ एकेकाळी मोदी ह्यांचे समर्थक होते ह्यावरून तरी बोध घ्यावा. किती दिवस लोकांना मुर्खात काढणार आहेत?
  Reply
 17. H
  harshad
  Aug 10, 2017 at 2:30 pm
  आज भक्त वैतागले. सोसिए लमीडिया वर अहमद पटेल हरणार म्हणूनच पोस्ट फिरत होत्या. कसे शाह ४२ इलेक्टिव जिंकले कसे एकदा पण हरले नाहीत वैगेरे वैगेरे. पण आता पटेल ह्यांनी धूळ चारल्यावर तोंड दाबून बुक्क्याचा मर न करावा लागतो. म्हणून येथे येऊन त्रागा करत आहेत.
  Reply
 18. A
  AMIT
  Aug 10, 2017 at 2:15 pm
  बापट, सोमनाथ : मेहता यांच्या भ्रष्टाचाराबद्दल लेख आल्यावर आपण कोणत्या कृष्ण विवरात दडून बसले होते याचा एकदा सी बी आय ला शोध लावायला हवा.
  Reply
 19. A
  AMIT
  Aug 10, 2017 at 2:12 pm
  हेमंत कद्रे यांनी वाघेला यांची "भूमिका" कशी काय बदलली हे सुद्धा सांगावं. किती खर्च झाला हे सांगितले तरी चालेल. काँग्रेसी आमदारांच्या ली काँग्रेसी संस्कृतिला धरूनच झाल्या. ते भ्रष्ट आहेतच. पण तुमची दुसऱ्याचे पाहावे वाकून ची सवय काही केल्या जात नाही. यालाच चाटूगिरी म्हणत असावेत कि काय? बाकी वाघेला यांनी केलेलं ते "भूमिका बदलणे " आणि काँग्रेस ने स्वतःचे आमदार दडवून केले ते भ्रष्टाचार हे आपल्या चाटूगिरीस धरूनच झाले. जनता जागीच आहे.
  Reply
 20. दयानंद नाडकर्णी
  Aug 10, 2017 at 1:53 pm
  कोणत्याही व्यक्तीला स्वतःचे मत असू शकते नव्हे ते असतंच. आपल्याला एखाद्याची मते पसंत नसतात कारण तुमचा त्यावरचा दृष्टीकोन वेगळा असतो. आणि तुम्ही तुमची मते जाहीर पणे मांडूही शकता. त्यात काही वावगं नाही. पण एकांगी लेखन करून एखाद्याची हीन पातळीवर जाऊन अवहेलना करणे हे गैर आहेत. तुमचे मोदींच्या राजकारणाबद्दल, त्यांच्या कार्यशैलीबद्दल आक्षेप असू शकतात पण जो माणूस दंशाचा पंतप्रधान आहे आणि ज्याला देशात आणि विदेशातही मान आहे त्यांच्याबद्दल तुम्ही जी भाषा वापरता ती पूर्णपणे आक्षेपार्ह आहे. पण एक लक्षात ठेवा तुम्ही वापरलेल्या भाषेमुळं मोदींचे महत्व जराही कमी होत नाही पण संपादक म्हणून तुमच्या पदाला ती भाषा शोभत नाही. तुम्ही तुमचा नाही पण ज्याचे तुम्ही संपादक आहात त्या लोकसत्ताचे नाव तुम्ही खराब करीत आहात. वाचक म्हणून आम्ही ह. रा. महाजनी, र. ना लाटे, माधव गडकरी आणि अरुण टिकेकरांचे अनेक लेख वाचले पण कधीही टीका असली तरीही त्यांच्या भाषेत विखार नसायचा. हा विखार तुम्ही आणि तुमचे पूर्वसुरी कुमार केतकर ह्यांच्या लिखाणात प्रकर्षाने दिसून येतो.
  Reply
 21. K
  kailas
  Aug 10, 2017 at 1:26 pm
  उर्मिला शहा, श्रीराम बापट...मोदी आणि अमित शहा यांनी गेल्या तीन वर्षांच्या काळात जागोजागी केलेल्या घाण तुम्ही मनसोक्त उपभोगता आहात. तुमची कीव करावी तेवढी थोडी आहे. एका लाटेवर स्वार होऊन मोदी सत्तेवर आले आहेत. २०१९ मध्ये ते तशाच भल्यामोठ्या लाटेत पालापाचोळा होऊन जाणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, शेती, उद्योग अशा एकूण एक आघाड्यांवर आर.एस.एस.-भाजप प्रणित सरकारला काहीही करता आले नाही. उलट आततायी निर्णय घेऊन या महाशयांनी देशाची अर्थव्यवस्था काळ्याकुट्ट अंधारात नेऊन टाकली आहे. मोदी सरकारचे पतन २०१९ निश्चित आहे. त्याची काळजी करा तुम्ही आता...
  Reply
 22. Load More Comments