23 September 2017

News Flash

पाचवा पी

काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधी आणि नंतर कुटुंबकेंद्रित राजकारणात असेच केले जायचे

लोकसत्ता टीम | Updated: September 4, 2017 2:52 AM

कार्यक्षमता वा अकार्यक्षमता या मानकांवर मंत्रिमंडळाचा विस्तार आहे

नेत्यांची कार्यक्षमता वा अकार्यक्षमता या मानकांवर मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, हीच बाब मुदलात खरी नव्हती, हे रविवारी दिसून आले..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित अशा मंत्रिमंडळ विस्ताराची कहाणी गमतीशीरच म्हणायला हवी. रविवारी शपथ घेतलेल्या नऊ नव्या मंत्र्यांतील चार निवृत्त नोकरशहा आहेत, त्यातील दोन संसदेचे सदस्यही नाहीत, त्यातील एकाने तर थेट मध्यवर्ती नेतृत्वाविरोधातच बंडखोरी केलेली, एकाची दहशतवादाची ओळख इस्लामपलीकडे जात नाही, एकाच्या नावावर सरकारी डॉक्टरला बडवून काढण्याचा लौकिक आणि या सर्वाना जोडणारा समान धागा म्हणजे यातील एकालाही व्यक्तिमत्त्व नाही आणि त्यामुळे यातील कोणीही प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाण्याची शक्यता नाही. म्हणजेच केंद्रीय नेतृत्वाच्या कृपाकटाक्षाखेरीज त्यांचे पान हलणारे नाही. या मंत्रिमंडळ विस्तारात कार्यक्षम मंत्र्यांना पदोन्नती दिली जाणार आणि अकार्यक्षमांना नारळ, असे सांगितले जात होते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही दाव्यानुसार भाजपचे हे विधान अर्धसत्य ठरते. सदानंद गौडा, उमा भारती, राव बीरेंद्र सिंग, राधा मोहन सिंग, विजय गोयल, आचार्य गिरिराज, साध्वी निरंजन ज्योती, श्रीपाद नाईक असे अनेक मंत्रिमहानुभाव हे कोणत्या कोनातून पाहिल्यावर कार्यक्षम ठरतात याचे उत्तर भाजपलाही सापडणार नाही. तेव्हा कार्यक्षमता वा अकार्यक्षमता या मानकांवर मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, हीच बाब मुदलात खरी नाही. कार्यक्षमता हाच एक मुद्दा असता तर उमा भारती यांना मंत्रिमंडळात सांभाळत बसण्याची वेळ मोदी यांच्यावर आली नसती. तसेच निव्वळ कार्यक्षमतेच्या मुद्दय़ावर पदोन्नती देण्यात आली हे विधानही खोटे ठरते. कारण केवळ कार्यक्षमता हाच मुद्दा असता तर जयंत सिन्हा यांचे काय? मोदी सरकारातील अत्यंत अभ्यासू, कार्यक्षम मंत्र्यांतील हे एक. परंतु वडिलांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगायची वेळ सध्या त्यांच्यावर आलेली आहे. यांचे वडील म्हणजे यशवंत सिन्हा. अटलबिहारी वाजपेयी सरकारातील अर्थमंत्री आणि अलीकडच्या काळातील मोदी सरकारचे टीकाकार. थोरल्या सिन्हा यांचे मोदी यांच्याविषयीचे मत सध्याच्या पंतप्रधान भक्त संप्रदायाचा रोष ओढवून घेणारे आहे. त्याची शिक्षा जयंत सिन्हा यांना मोदी यांनी पदोन्नती नाकारून दिली. तेव्हा कार्यक्षमता आदी केवळ बोलाच्याच कढीसारखे.

तो एकमेव निकष लावला तर मोदी सरकारातील एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच मंत्र्यांविषयी काही बरे बोलता येईल. भूपृष्ठ वाहतूक खात्याचे नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पेट्रोलियम हे ज्वलनशील खाते अत्यंत संयमाने हाताळणारे धर्मेद्र प्रधान, जागतिक व्यापार संघटनेबाबत भाजपच्या बदललेल्या टोपीचे रक्षण करणाऱ्या वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन आणि अपेक्षा व्यवस्थापन कलेतील वाकबगार ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांचा या कार्यक्षमांत आवर्जून उल्लेख करायला हवा. यातील गडकरी यांच्या पदास हात लावावयाची ताकद.. इच्छा असली तरी.. पक्षाध्यक्ष अमित शहा यांना नाही. तेव्हा गडकरी यांना पदोन्नती नाही तरी पदावनती देण्याची सोय शहा-मोदी दुकलीस उपलब्ध नाही. दुसरे सुरेश प्रभू हे रेल्वे रुळांवरून अकारण घसरले. नेक, कष्टास मागे न हटणारा आणि जगाचे भान असलेला हा प्रभू यांचा लौकिक. परंतु अपेक्षारक्षणात ते कमी पडले. याबाबत खरे तर त्यांनी पीयूष गोयल यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला हवे होते. ते न घेतल्यामुळे प्रभू यांना रेल्वे खात्यावर पाणी सोडावे लागले. हे खाते आता गोयल यांच्याकडे असेल. या खातेपालटामुळे रेल्वेचे अपघात कमी होतील, असे सरकारला सुचवायचे असावे. दुर्दैवाने ते तसे झाले नाहीत तर गोयल यांनाही दुसऱ्या खात्यात पाठविणार काय? तेव्हा प्रभू यांच्यावर तसा अन्यायच झाला. तो जसा करकरत्या रेल्वे आस्थापनाने केला तसाच पंतप्रधान मोदी यांनीही केला. असो. या मंत्र्यांतील दृष्ट लागावी अशी कामगिरी आहे ती धर्मेद्र प्रधान यांची. त्यांच्याकडे पेट्रोलियमचे राज्यमंत्रिपद होते. आता ते केंद्रीय मंत्री असतील. या खात्यास दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणाऱ्यांचा वेढा आहे. त्यात प्रधान हे फसले नाहीत, हे त्यांचे मोठेपण. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देणे आवश्यकच होते. अर्थात त्यामागे त्यांच्या कामगिरीपेक्षा ओरिसा राज्यातील आगामी निवडणुकांचा विचार भाजप नेतृत्वाने केला नसेलच असे नाही. या निवडणुकांत ते भाजपचा आसामातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात. निर्मला सीतारामन आता संरक्षणमंत्री होतील. वाणिज्य खात्यात राज्यमंत्री असताना त्यांनी भाजपचे जागतिक व्यापार मुद्दय़ावरचे घूमजाव यशस्वीपणे हाताळले. महिला आणि त्यात चांगल्या इंग्रजीचे सौष्ठव यादेखील त्यांच्या जमेच्या बाजू. काय केले या प्रश्नापेक्षा काही तरी केले असे दाखवण्याची पीयूष गोयल यांची हातोटी वाखाणण्यासारखी. ऊर्जामंत्री या नात्याने देश आपल्या कारकीर्दीत विजेच्या मागणीत स्वयंपूर्ण झाला असे ते सांगतात. यातील मेख अशी की गेल्या काही महिन्यांच्या आर्थिक मंदीसदृश वातावरणामुळे विजेच्या मागणीतच मोठी घट झाली आहे. त्यामुळे आहे ती वीज पुरून उरते. आता त्यांच्याकडे अधिक आव्हानात्मक असे रेल्वे खाते असेल. आधीच्या खात्यात काही फारसे न करताही सुप्रसिद्धीची संधी तर आताच्या खात्यात कितीही केले तरी कुप्रसिद्धीची भीती असा हा बदल आहे. मुख्तार अब्बास नक्वी हे आणखी एक बढती मिळालेले मंत्री. सर्वधर्मसमभाव दाखवण्यासाठी त्यांची गरज होती. ती पूर्ण झाली.

तेव्हा कोणा बढती/ बदलीपेक्षाही कालच्या मंत्रिमंडळ विस्तारातील सुरस कथा आहे ती नऊ नव्या मंत्र्यांत. त्यातील चार हे निवृत्त नोकरशहा आहेत. राज कुमार सिंग, अल्फॉन्स कन्ननथानम, हरदीपसिंग पुरी आणि सत्यपाल सिंग हे ते चार नोकरशहा. या चारांतील दोन, कन्ननथानम आणि पुरी, हे संसदेच्या एकाही सदनाचे सदस्य नाहीत. म्हणजे पुढील सहा महिन्यांत त्यांना सदस्य करून घ्यावे लागणार आहे. हे सदस्यत्व अर्थातच राज्यसभेचे असेल. सिंग हे गृह खात्याचे सचिव होते. ते बिहारचे. त्या राज्यातील विधानसभा निवडणुकांत सिंग यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीकेची तोफ डागली होती. आपल्याला पक्षातून काढून दाखवावे असेही आव्हान त्यांनी श्रेष्ठींना दिले होते. मोदी-शहा दुकलीवर इतकी टीका करणे तसे धाडसाचेच. त्या धाडसाचे फळ त्यांना राज्यमंत्रिपदात मिळाले. कन्ननथानम हे केरळचे. ख्रिस्ती समाजाचे. दिल्लीत असताना बेकायदा बांधकामांविरोधात त्यांनी धडाडीने कारवाई केली होती. केरळात सध्या जे काही सुरू आहे, त्यात त्यांचा भाजपला उपयोग होऊ शकेल. पुरी परराष्ट्र सेवेत होते. मोदी यांचे जवळचे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे ते परिचित. डोवल यांच्या विवेकानंद फौंडेशनचे ते सदस्य. या संघटनेच्या अनेकांप्रमाणे त्यांचे भले झाले आहे. सत्यपाल सिंग मुंबईचे माजी पोलीसप्रमुख. अजित सिंग यांना बागपत मतदारसंघात पराभूत करण्याचा पराक्रम पहिल्याच निवडणुकीत सिंग यांच्या नावावर आहे. भाजपला सध्या गरजेचा असलेला जाट चेहरा सिंग यांच्या रूपाने मिळालेला असल्याने त्यांना मंत्रिपद देणे हे राजकीय गरजेचे होते. हे चारही नोकरशहा आपापल्या क्षेत्रांसाठी ओळखले जातात. परंतु त्यांना मंत्रिपदे मात्र वेगळ्याच खात्यांची देण्यात आली आहेत. म्हणजे एका विशिष्ट क्षेत्रातील अनुभवासाठी नवे चेहरे घ्यायचे. पण त्यांना जे जमते ते करू द्यायचे नाही, असा हा विचार.

काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधी आणि नंतर कुटुंबकेंद्रित राजकारणात असेच केले जायचे. हेतू हा की कोणाचेही प्रतिमासंवर्धन होता नये. प्रतिमा मोठी व्हावी ती फक्त एकाच कुटुंबाची. आताच्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्याचेच प्रतिबिंब दिसते. ज्यांचे जनमानसात स्थान तयार होऊ शकते, आहे त्यांचे मजबूत होऊ शकते अशांना मोदी आणि शहा यांच्या कारकीर्दीत स्थान नाही. तेव्हा अननुभवी, नवखे यांनाच प्राधान्य दिले जाणार हे उघड आहे. यातून जशी सरकार चालवणाऱ्यांची वृत्ती दिसते तसाच सत्ताधारी पक्षांत असलेला गुणांचा अभावही दिसतो. या नव्या मंत्र्यांना मोदी यांनी आज चार पींचा मंत्र दिला. Passion, Proficiency, Professional and Political Acumen यांच्या आधारे Progress. हे ते चार पी. पंतप्रधानांच्या शब्दखेळाच्या निर्थक छंदलौकिकानुसारच हे झाले. या चार पींत आणखी एक पी.. Pitiable… जोडला तर त्यातून या मंत्रिमंडळ विस्तार प्रयत्नांचे रास्त वर्णन होऊ शकेल.

First Published on September 4, 2017 2:52 am

Web Title: bjp inefficient leaders get place in narendra modi cabinet reshuffle 2017
 1. S
  SG Mali
  Sep 4, 2017 at 11:11 pm
  आणि उच्च पदस्थ मनमोहन साहेब हे सुद्धा एक नोकरशहाच होते आणि कधीही लोकसभेचे सदस्य नव्हते. याला काय म्हणणार.. वर्स्ट पिटिएबल.
  Reply
  1. M
   Manoj Ramkhare
   Sep 4, 2017 at 7:09 pm
   फार उत्तम लेख!
   Reply
   1. S
    Shrikant Yashavant Mahajan
    Sep 4, 2017 at 5:27 pm
    इतर सर्व मिडीयाला मंत्रिमंडळाच्या बदलाविषयी चांगले पाऊल वाटते पण केवळ आमच्या संपादकांचा सूर निराळा. अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष जसे योग्य माणसांच्या नेमणूकी करतात तसे जर या देशात येऊ पाहत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे.
    Reply
    1. S
     sanjay telang
     Sep 4, 2017 at 4:23 pm
     दररोज काहीतरी संपादकीय लिहिणे हा खरोखरच एक pitiable आटापिटा असतो ह्याची जाणीव संपादकांना झाली आणि हा अग्रलेख उगवला. आपली व्यथा समजू शकतो. नोकरी सोडताही यात नाही आणि नोकरीवर राहावतही नाही. अगदीच pitiable .
     Reply
     1. D
      digamber
      Sep 4, 2017 at 3:41 pm
      यांना तर राहुल सारखे नेते पंतप्रधान झालेले चालतील. या वरून यांची लायकी लक्षात यावी.
      Reply
      1. J
       Jayant Saraf
       Sep 4, 2017 at 2:15 pm
       अभ्यास पूर्ण लेख, कीप इट अप
       Reply
       1. A
        ashwin
        Sep 4, 2017 at 2:12 pm
        मग जे उपराष्ट्रपती साठी गांधी घरातील होतए ते तरी कुठे लायकीचे होते.. तो माणूस रात्री न्यायाधीशाचे दरवाजे ठोठावते कारण त्याला मजीद मेमन ला झालेली फाशी चुकीची वाटत होती, प चिदंबरम २हारून पण रे-इलेक्टिव घ्यायला लाल त्यातपण हारला न मग सेल्फ लरे करून स्वतःला विजयी घोषित केला. राज्यसभा अध्यक्ष कुरियन बलात्कार ची केस आहे त्याचा डोक्यावर तरीपण अध्यक्ष होताच कि, संजय गांधी इंग् मध्ये कार चोरीची केस आहे, सोनिया गांधी फ्राऊड डिग्री, राहुल गांधी फ्राऊड डिग्री आहे तरीपण आहेतच कि संसदेत.. तुम्ही त्यांचे कुत्रे तरीपण आहेतच कि पाची बोटे तुपात ... तुम्हाला वाटतंय कि लोकांना काळात नाही किंवया लक्षात नस्तय..
        Reply
        1. A
         Arun
         Sep 4, 2017 at 1:56 pm
         अहो हे तर फारच उत्तम झाले कि मग... अश्या रटाळ मंत्र्यांमुळे २०१९ ची निवडणूक मोदी जिंकतीलच कशी? आणि मग पुन्हा आपली काँग्रेस सत्तेत येणार.... उगाच मोदींना काहीबाही सांगून मंत्री बदल करायला लावू नका आता संपादक महाशय!
         Reply
         1. R
          Ramdas Bhamare
          Sep 4, 2017 at 1:24 pm
          भक्तांसाठी नवा पंचाक्षरी मंत्र : परम पूज्य प्राईम पिनिस्टर पिंदाबाद !
          Reply
          1. M
           mandar
           Sep 4, 2017 at 1:06 pm
           अग्रलेख छान , परंतु अलंकारित करण्याच्या ओघात शेवटी आणखी एक p विनाकारण जोडला,
           Reply
           1. J
            John_doe
            Sep 4, 2017 at 1:04 pm
            मोतीलाल महाराज, जवाहर महाराज, इंदिरा देवी, संजय महाराज, राजीव महाराज, सोनिया देवी , राहुल महाराज, प्रियांका देवी यांचे जोडे उचलायची क्षमता असलेले मंत्री निवडले जायचे .त्यापेक्षा हे बरे नाही का ?
            Reply
            1. H
             harshad
             Sep 4, 2017 at 12:31 pm
             Minimum government va maximum governence ase sangnaryanchya mantrimandal madhye 73 mantri hyavarunach tyanchi efficiency kalte.
             Reply
             1. D
              Datta
              Sep 4, 2017 at 12:16 pm
              योग्य विश्लेषण. गव्हर्नन्स, कार्यक्षमता वगैरे निकष गुंडाळून 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार केला आहे. कितीही कसरती केल्या तरी हे बोगस सरकार 2019 च्या निवडणुकीत सत्ताबाह्य होणार आहे. भाजपची संख्या तर 200 च्या आत असेल, याची जाणीवर मोदी-शहांना झाली आहे. म्हणूनच तीन वर्षांनंतरही जाहिरातबाजी सुरू आहे. मार्केटिंगमध्ये एक सिद्धांत आहे, एखाद्या प्रॉडक्टच्या किंवा कंपनीच्या जाहिराती वारंवार येऊ लागल्या की समजावे, काहीतरी गडबड आहे. या सरकारचेही तसेच आहे. नोटबंदी निर्णयानंतर घसा ताणून आणि अश्रू (मगरीचे!) ढाळून मोदी म्हणाले होते, ' ा केवळ 50 दिवस द्या निर्णय फसला तर कुठल्याही चौकात उभे करा आणि वाट्टेल ती शिक्षा द्या'. काय झाले पुढे? हे असं काही घडत नाही, हे मोदींना चांगलेच ठाऊक आहे. एका लाटेवर स्वार होऊन आलेल्या भंपक माणसाची गच्छंती निश्चित आहे.
              Reply
              1. D
               DINESH D.
               Sep 4, 2017 at 12:16 pm
               छान विश्लेषण केलेला लेख..
               Reply
               1. H
                Hemant Purushottam
                Sep 4, 2017 at 11:58 am
                हा अग्रलेख आहे की पारावरच्या कुचाळक्या असा प्रश्न पडतो. लोकसत्तामध्ये काही सदरे ठराविक कालावधीनंतर बदलविली जातात याचा अर्थ ती टाकाउ असतात असे नाही तर काळाच्या ओघात काही बदल करावेसे वाटतात. राजकारणातही काही बदल केले जातात. मोदी यांना विरोध करण्याचा विडा कुबेर यांनी उचलला असल्याने एकाच अग्रलेखात परस्पर विरोधी विधाने येत आहेत याचेही कुबेरांना भान राहत नाही. पछाडलेल्या मनोवृत्तीचा अग्रलेख एवढेच तूर्त म्हणता येईल.
                Reply
                1. S
                 Shridhar Kher
                 Sep 4, 2017 at 11:45 am
                 स्वतः मोदीजी स्वयंभू असताना इतर मंत्र्यांची गरजच नाही.
                 Reply
                 1. A
                  Ajay Kotwal
                  Sep 4, 2017 at 11:30 am
                  संपादक महाशय काँग्रेस ने तरी काय मोठे दिवे लावले एवढी वर्ष, आणि कुठेही गेलात तरी काही ठराविक किंवा मोजकीच माणसे सरकार काय आणि कंपनी काय चालवत असतात
                  Reply
                  1. S
                   shardul
                   Sep 4, 2017 at 11:29 am
                   धन्य धन्य ती लोकसत्ता आज प्रभूं चे गोडवे समजा बदल नसता केला तर का नाही केला बदल जरा शास्त्रीजींच्या आदर्श ठेवा असं म्हणाले असते .
                   Reply
                   1. S
                    Shreekant Shreekant
                    Sep 4, 2017 at 11:17 am
                    हे संपादक येडं तर नाही झालं? च्यायला, कोटी कोटी लोकांनी निवडलेल्या या पंतप्रधानांनी उजवा पाय उचलला तरी आणि डावा पाय उचलला तरी या संपादकाचा मूळव्याध शिगेला पोहोचतो. काय? म्हणजे माण श्वास घेऊ देता का नाही? की त्यो बी तुमाला इचारून तुमच्या लेखी परवानगीने घ्यावा?
                    Reply
                    1. U
                     Uday
                     Sep 4, 2017 at 10:55 am
                     इंडिया इलेव्हन संपादकांनी शोधून काढावे आणि खाते वाटप जाहीर करावे. ते अगदी वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांना आपल्या अग्र लेखातून उपदेश करून एकत्र आणावे. आम्हाला पण बरे वाटेल. हे एकदा मनावर घ्याच कुबेर साहेब.देशाचा कायमचा प्रश्न सुटेल. सगळे चांगले एकाच पक्षात आले आणि सत्तेत आले तर काय बहार येईल. दिल्ली च्या मुख्य मंत्र्यानी सुद्धा कोणत्याही भ्रष्ट माण तिकीट दिलेले नाही. लोक उगाच काही बाही लिहीत असतात. त्यांना सुद्धा निवडणुका जिकायच्या असतात.
                     Reply
                     1. U
                      umesh
                      Sep 4, 2017 at 10:44 am
                      संपादकीय आहे याला संपादकीय का म्हणायचे? ही तर गल्लीबोळातील कॉंग्रेसच्या सटरफटर नेत्याची प्रतिक्रिया झाली शेवटचा जोडलेला पी म्हणजे अगदीच टुकार पीपासून सुरु होणारे यापेक्षा किती तरी चांगले आणि संपादकीयाला सूट होणारे शब्द इंग्रजीत आहेत पण संपादकांचे इंग्रजीचे ज्ञान माझ्या पाली भाषेबद्दलच्या ज्ञानाइतकेच अगाध दिसतेय चांगले लोक मंत्रिमंडळात घेतले नाहीत किंवा त्यांनी सुमार कामगिरी केली तर भाजप भोगेल ना तुम्ही कशाला इतका थयथयाट करता? लोकसत्तात तरी कुठे सर्व कर्मचारी उत्तम कामगिरी करणारे आहेत?
                      Reply
                      1. Load More Comments