23 September 2017

News Flash

भंपकांचा भांगडा भंगला!

सलग तीन निवडणुकांत आपचा पराभव झाला

Updated: April 28, 2017 4:50 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

सलग तीन निवडणुकांत आपचा पराभव झाला तरी अरविंद केजरीवाल आणि कंपनी यातून काही धडा शिकतील अशी शक्यता कमीच आहे.

आपचा कर्कशपणा, करदावणे, आरोपांचा तमाशा  एकीकडे आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशातील विजय ताजा असल्याने दिल्लीतील तीनही महापालिका निवडणुकीत मोदी यांचे पारडे खूपच जड होते. त्यामुळेच आजूबाजूला पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी करून ठेवलेली घाण दिसत असतानाही, मतदारांनी पुन्हा त्याच पक्षाला संधी दिली.

दिल्लीत हे होणारच होते. आम आदमी पार्टीनामक जो हुच्चपणा तेथे बळावला आहे, त्याला अखेर फटका बसणारच होता. तो दिल्ली महानगरपालिकांच्या निवडणुकीने दिला. तेथे आपचे श्रीमुख व्यवस्थित फुटले. हे असे होणार याची चाहूल पंजाब आणि गोवा येथील विधानसभा निवडणुकांनी दिली होतीच. पंजाबात तर आता आपचीच सत्ता असे माध्यमी-कथन तयार करण्यात आले होते. गोव्यातही आपने हवा तापविली होती. परंतु बेडकी कितीही फुगली तरी तिचा बैल होत नसतो. त्या दोन्ही राज्यांत तेच झाले. त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीतील राजौरी गार्डन विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही झाली. इजा आणि बिजा झाले होते. दिल्लीतील महापालिका निवडणुकांत तिजा झाले. यातून आपचे स्वमग्न नेते अरविंद केजरीवाल काही धडा शिकतील अशी शक्यता कमीच आहे. स्वत:स नैतिकतेचे अवतार मानणारे धडा वगैरे शिकण्याच्या भानगडीत कधी पडत नसतात. कारण त्यांचा अवतारच मुळात धडे देण्यासाठी झालेला असतो. देशातील संपूर्ण राजकीय-सामाजिक व्यवस्थेला आता एकदाचा धडा शिकवायचा या आविर्भावातच आपचा जन्म झाला होता. तेव्हा जित्याची ती खोड मेल्याशिवाय जाणार नाही, हे नक्की. राजकीय पक्ष पराभव झाला की आत्मपरीक्षणाची भाषा बोलू लागतात. काही नेते हीच संधी साधून राजीनामे देऊन जबाबदारीमुक्त होत असतात. काही जुने हिशेब चुकते करीत असतात. आपमध्ये सध्या तेच सुरू आहे. वस्तुत: आपच्या नेत्यांना पराभवाचे विश्लेषण वगैरे करण्याची काहीही आवश्यकता नाही, इतकी ती कारणे सुस्पष्ट आहेत. ती पाहण्यासाठी केजरीवाल आणि कंपूला डोळ्यांवरील नैतिकतेची झापडे मात्र बाजूला सारावी लागतील. त्यातील पहिले कारण आहे ते अर्थातच मतदान यंत्रे. दिल्ली पालिकेतील आपच्या पराजयाला खरोखरच ही मतदान यंत्रे कारणीभूत ठरली आहेत. मतदान यंत्रांमध्ये भाजपने घोळ केला असल्याच्या आरोपातील सत्यासत्यतेचा मुद्दा वेगळा. इंदिरा गांधी यांना देशात अशाच प्रकारे विजय मिळत असताना, ‘हा विजय बाईचा, गाईचा की शाईचा’ या कुजबुजीत भाजपही सहभागी असे. परंतु केजरीवाल यांनी ज्या कर्कशपणे हा मुद्दा लावून धरला त्याने मतदारांचे कान किटले. हा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सचोटीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि देशातील जनतेचा त्यांच्यावरील विश्वास अद्याप कायम आहे, ही नेमकी बाबच केजरीवाल विसरले आणि त्यातून त्यांच्यावर नकारात्मक राजकारण करीत असल्याचा शिक्का बसला. या अर्थाने त्यांच्या पराभवाला मतदान यंत्रे कारणीभूत ठरली. मात्र या अपेक्षित निकालामागे याहून महत्त्वाची कारणे आहेत. देशाच्या राजकारणातील भंपकांचा भांगडा समजून घेण्यासाठी त्यांचे परिशीलन आवश्यक आहे.

दिल्लीतील निकालाचे विश्लेषण करताना एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. ही निवडणूक पालिकेची होती. पालिकेच्या कारभाराचा संबंध थेट शहराच्या जगण्या-मरण्याशी असतो. अशा वेळी या निवडणुकीत शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या प्रचाराच्या अग्रस्थानी असायला हव्यात. परंतु व्यापक प्रचारात हे मुद्दे पुढे आलेच नाहीत. उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली या तीनही पालिकांमध्ये गेली दहा वर्षे भाजपची सत्ता आहे. या काळातील पालिकेच्या कारभाराचे वर्णन केवळ भ्रष्ट याच शब्दाने करता येते. या भ्रष्टाचाराने दिल्लीकरांचे जगणे अवघड करून टाकले आहे. परंतु पत्रके आणि समाजमाध्यमांतील फलकबाजी यांपलीकडे त्याबाबतचा प्रचार पुढे गेलाच नव्हता आणि निकालाने हे दाखवूनच दिले की त्याच्याशी मतदारांना काहीही देणेघेणेच नव्हते. तसे असते, तर मतदारांच्या नाराजीचा फटका भाजपला बसला असता. तो बसला नाही, याचा अर्थ मतदार भाजपवर नाराज नव्हते. आणि याचाच दुसरा अर्थ असा होतो, की सर्वसामान्य मतदारांना विकास, प्रगती, नागरी समस्यांची सोडवणूक अशा सकारात्मक बाबींवर चर्चा व्हावी असे वाटत असले, तरी प्रत्यक्ष मतदानात मात्र ते या गोष्टींना काडीमात्र किंमत देत नसतात. राजकीय पक्षांच्याही हे लक्षात आले आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रचार हा भाजपच्या बाजूने नरेंद्र मोदी या चलनी नाण्यावर आधारलेला होता. त्याला अतिरेकी राष्ट्रवादाची, गोप्रतिपालक नवहिंदुत्वाची जोड होती. आपचा प्रचार अरविंद केजरीवाल यांच्या व्यक्तिगत करिश्म्यावर आणि केवळ मोदीविरोधावर अवलंबून होता. आपच्या प्रचारयंत्रणेने गेल्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांची ‘मफलरमॅन’ अशी प्रतिमा तयार केली होती. या वेळी ‘झाडूमॅन’ अशी व्यंगचित्रे समाजमाध्यमांतून पसरविण्यात आली. त्यातून केजरीवाल यांचे ‘बालिश बहु’ हे रूपच अधिक ठसले. त्या तुलनेत मोदी यांच्या मागे लगतच्या उत्तर प्रदेशातील कोरा करकरीत विजय होता. ते अजूनही चांगले दिवस आणतील या लोकश्रद्धेचे बळ होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केजरीवाल यांच्या दिल्लीतील सरकारला भाजपने सळो की पळो करून सोडले असले आणि त्या भांडणाचा परिणाम थेट कारभारावर होत असला, तरी केजरीवाल हेच कर्मदरिद्री आहेत, असे माध्यम-कथन तयार करण्यात भाजपला व्यवस्थित यश आले होते. एकूणच या निवडणुकीत मोदी यांचे पारडे खूपच जड होते. त्यामुळेच आजूबाजूला पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी करून ठेवलेली घाण दिसत असतानाही, मतदारांनी पुन्हा त्याच पक्षाला संधी दिली. हा झाला या निकालाचा एक अर्थ. मात्र त्याच्याही खाली आणखी एक अर्थ लपलेला आहे आणि तो अधिक गंभीर आहे.

ही निवडणूक प्रामुख्याने झाली ती दोन पक्षांतच. काँग्रेसला ३२ जागा मिळाल्या असल्या, तरी त्याचे अस्तित्व आताशा इत्यादीमध्येच जमा होते. तेव्हा द्वंद्व झाले ते भाजप आणि आप यांच्यातच. परंतु या दोन्ही पक्षांच्या भावनिक आवाहनात फारसा फरक नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या अण्णा आंदोलनातून आपचा जन्म झाला, ते आंदोलन हे प्रामुख्याने येथील नवमध्यमवर्गाचे होते. अभिजन विरुद्ध इतर असा त्याचा सूर होता. जागतिकीकरणाचे सर्व फायदे घेऊन झाल्यानंतर आर्थिक सुधारणांवर टीका करणारा हा वर्ग. स्वदेशीवादी, उजवा राष्ट्रवादी असा त्याचा चेहरा होता. तोच मेणबत्त्या हातात घेऊन, रस्त्यावरच न्याय झाला पाहिजे असे म्हणणारा होता. केजरीवाल यांचा साधेपणा, भ्रष्टाचार आणि उद्योगपतीविरोध, त्यांच्या हातातील तिरंगा आणि व्यासपीठावरील भारतमातेची प्रतिमा हे सारे त्याला भावले. तो आपच्या मागे गेला. भाजपने मोदींच्या रूपाने अतिव्यापक स्तरावर हेच सारे केल्यानंतर तो मोदींकडे आला. हे झाले नवमध्यमवर्गाचे. त्या इतरांतील बाकीच्यांना केजरीवाल यांचे आर्थिक धोरण आवडले. त्याहून अधिक गोड राष्ट्रवादी आर्थिक धोरण मोदींनी समोर ठेवल्यानंतर त्याला त्यात आपला उज्ज्वल भविष्यकाळ दिसू लागला. आपला भाजपच्या या आवाहनाचा मुकाबला करणे जसजसे कठीण जाऊ लागले, तसतसा त्यांच्या आवाहनातील रंगही फिका पडू लागला. लढाई केवळ मोदी सरकारशी सुरू झाली. आपचा कर्कशपणा, करदावणे, आरोपांचा तमाशा हे त्यातून सुरू झाले. त्यात मोदी सरकार पोलीस आणि सीबीआयच्या साह्य़ाने तेल ओतत होतेच. या सगळ्यांतून आपने धोका दिला ही दिल्लीकरांची भावना जन्मास आली. पराभव केला तो त्या भावनेने. राजकारणाच्या मंचावर फार काळ भंपक भांगडा चालत नाही. तेथे मतदार नेहमीच अधिक नृत्यकौशल्याच्या शोधात असतात. दिल्लीतील निकालाचा एवढाच काय तो अर्थ.

First Published on April 28, 2017 4:50 am

Web Title: delhi mcd election results 2017 marathi articles arvind kejriwal aam aadmi party
 1. U
  Uday
  May 16, 2017 at 4:18 pm
  you cannot fool all the people all the time.
  Reply
  1. G
   Govind
   Apr 30, 2017 at 12:56 pm
   भांगडा हे सामुदायिक नृत्य आहे . भाजपचा भांगडा सध्या मोदी एकटेच सादर करीत असल्याने . लोक त्यालाही कंटाळतील आणि मूकनाट्य या प्रकाराला प्राधान्य देतील अशी शक्यता आहे .
   Reply
   1. R
    Rakesh
    Apr 30, 2017 at 12:49 pm
    Urmila Madam, seems you have to share your payment with the english translator. Loksatta takes their own decisions. What is your problem, if its difficult to give comments in Marathi. Why you are angry? Stop commenting. Ohh.. seems your daily wages are getting impacted. How much you get per comment and now how much you are paying to english tran tor?
    Reply
    1. आनंद
     Apr 30, 2017 at 11:42 am
     आम आदमी पार्टी कशी चुकली ह्याच विस्लेशण चांगले झाले. तसेच भाजपा जिंकली ह्याबद्दल चांगले लिहिले नाही.काँग्रेस हरली ह्याच खर दुःख संपादकाला झाले असे ा वाटते.
     Reply
     1. J
      jai
      Apr 28, 2017 at 7:21 pm
      bhartiya rajkaran he yera gabalyache kaam nhave..kejriwal should concentrate more on governence of Delhi state instead of wasting his time on other ic things..
      Reply
      1. S
       Shriram Bapat
       Apr 28, 2017 at 9:53 am
       'पंजाबात तर आता आपचीच सत्ता असे माध्यम कथन करण्यात आले होते' (कॉलम १) आणि 'तरी केजरीवाल हेच कर्मदरिद्री आहेत असे माध्यम कथन करण्यात भाजपाला यश आले' (कॉलम ५). थोडक्यात माध्यमे एकसंध नाहीत आणि लोकसत्ताप्रमाणे प्रत्येक माध्यमाला आपणच शहाणे आहोत असे वाटते. अशा वेळी यशाचे-पराभवाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण कसे होणार ? या एकामागून एका पराभवानंतर सुद्धा केजरीवाल समोर येऊन चुकीचे का होईना पण भाषण करत आहेत.लोकांपासून तोंड लपवत नाहीयेत. कोणी सांगावे, पुढच्या वेळी त्यांचा भांगडा न भंगता 'बल्ले बल्ले' होईल. पण राहुल गांधी तर भांगड्यातला 'भ' सुद्धा म्हणायला समोर नाहीत. आता या क्षणी ते कोणत्या परदेशात जाऊन तेथील बँक खात्यात रकमांची काय फिरवाफिरव करत आहेत याचा पत्ता कट्टर काँग्रेसजनांना तरी आहे का ?
       Reply
       1. b
        bhaidhupkar@rediffmail
        Apr 28, 2017 at 7:49 am
        SOLID LEKHA
        Reply
        1. उर्मिला.अशोक.शहा
         Apr 28, 2017 at 7:48 am
         vande mataram- MR EDITOR HOW LONG IT WILL TAKE TO INPUT THE MARATHI COMENTS FACILITY ??? WE DID NOT LIKE TO COMENT IN ENGLISH ON MARATHI ARTICLES PLEASE START MARATHI COMENT FACILITY AS EARLY AS POSSIABLE THANKING YOU --URMILA SHAH AND ASHOK SHAH JA G TE R HO
         Reply
         1. उर्मिला.अशोक.शहा
          Apr 28, 2017 at 7:43 am
          vande mataram- once kejarival was darling of the media and now media become frustereted as kejarival did not p the media trail once he was projected as optain for modi by so called wise media and Delhi elections have swept one and all concerning about alternative for modi BJP always have welcome opposition but the way in which opposition function have frusterated voters they have lost the faith in opposition non of the opposition have influantial leader none of the ledaers of oppositon have honest image and also until now no charge has been leveled or proved against BJP and its leaders so voters have no choice but to elect BJP overlooking its image JAGATE RAHO
          Reply
          1. H
           Hemant Kadre
           Apr 28, 2017 at 7:33 am
           दिल्ली महानगरातील तीन मनपा निवडणुकीत भाजपचा विजय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. भाजपबाबत ज्यांच्या मनात आकस आहे त्यांची मळमळ स्पष्टपणे जाणवते. काँग्रेसला नवसंजीवनी (?) देणारे राहूल यांचा दूरान्वयानेही उल्लेख न होणे ही बाबही बरेच काही सांगुन जाते. निवडणुकीतील विजय हा कामाचा, विश्वासाचा द्योतक असतो. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा परिपाक असतो. अनेकांच्या इच्छा वेगळ्या असतात पण इच्छा, आकलन व वस्तुस्थिती यात बरेच अंतर असते. टीका करणे सोपे असते. टीका करणेच म्हणजे मर्दूमकी ही भावना ज्यांच्या मनात बळकट झाली आहे त्यांना जनसामान्य कंटाळतात व असे टीकाकार एके दिवशी उकीरड्यावर फेकले जातात. भंपकबाजी करणाऱ्यांना वस्तुस्थिती कळत नसते.
           Reply
           1. K
            k bansidhar
            Apr 28, 2017 at 7:20 am
            हा आपला अग्रलेख हेच दर्शवतो कि सर्व प्रसार माध्यमे अद्याप भ्रष्ट,गुंड,विषयासक्त,अतिरेकी कॉंग्रेसच्या प्रभावाखाली आहे.केजरीवाल या एक भ्रष्ट,गुंड,अतिरेकी सरकारी नोकराला ज्याला लोकसेवा कधीच करायची नव्हती तर केवळ अण्णा हजारे या सरकारी सत्त्याग्रहीचा वापर करून आपल्या भाकर्या भाजायच्या होत्या.पंत प्रधान मोदी यांचे नेतृत्व घराणेशाही किंवा आभाळातून आपल्या आपण येवून पडले नाही व त्यांनी हुकुमशाही पद्धतीतून लोकावर लादले नाही.तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूष भट्टीतून जवळ जवळ चाळीस वर्षे सामाजिक कार्य करून तावून सुलाखून निघालेले आहे.आणि त्यांना सामान्य जनतेचा भरघोस पाठींबा मिळत आहे.केजरीवाल हा तर एक केवळ पैसा मिळवण्याच्या उद्देश्याने राजकारणात उतरलेला एक केंद्रीय सरकारातून बाहेर पडलेला नोकर आहे.आयकर खात्यात नोकरी करत असताना आपल्या बुद्धिमत्तेचा गैर वापर करत अमाप संपत्ती मिळवण्याच्या हेतूने बाहेर येवून राजकारणात पडलेला माणूस आहे.अन्य कोणत्याही क्षेत्रात जलद मार्गाने एवढी संपत्ती मिळवता येत नाही.हे ठावूक होते.त्याला प्रसार माध्यमांनी वर चढवले.सत्ता डोक्यात गेली.लोकांनी खाली आणले हीच लायकी.
            Reply
            1. R
             RJ
             Apr 28, 2017 at 5:03 am
             फक्त छोट्या भंपकांचा भांगडा भंगलाय , मोठ्यांचा अजून मोठ्या प्रमाणात सुरूच आहे की ;-)
             Reply
             1. Load More Comments