हातामध्ये ‘स्मार्टफोन’ आला म्हणून कोणी ‘स्मार्ट’ वा शहाणे होत नसते. एखाद्या क्षेत्रात आपण मोठे आहोत म्हणून इतर क्षेत्रांत आपण ब्रह्मदेव आहोत असेही होत नसते. त्यासाठी अभ्यास हवा असतो. समजून घेण्याची क्षमता आवश्यक असते. किमान थोडय़ाशा सामान्यज्ञानाची तरी आवश्यकता असते. ती नसली की काय होते, याची उदाहरणे म्हणून भारतातील आघाडीचा क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, कुस्तीपटू बबिता फोगट, तसेच चित्रपट अभिनेता रणदीप हुडा यांनी अलीकडेच केलेल्या ट्विप्पण्यांकडे पाहता येईल. दिल्ली विद्यापीठात शिकणारी विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिने अभाविपच्या विरोधात समाजमाध्यमांवर मत प्रदर्शित केल्यामुळे पित्त खवळलेल्या काही भक्तमंडळींची मजल तिला बलात्काराच्या धमक्या देण्यापर्यंत गेली आहे. ही गोष्ट निंदनीय खरी. परंतु आता समाजाने अशा ट्विटरीगुंडगिरीची सवय करून घ्यायला हवी. या माध्यमीगुंडांकडे दुर्लक्ष करणे हे काहींच्या सोयीचे असल्याने त्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांना अशा अश्लाघ्य धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. विशेष म्हणजे अशी शिवीगाळ करणारे हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वा एखाद्या विचाराचे समर्थक आणि त्याहून भयंकर म्हणजे देशभक्त म्हणून मिरवताना दिसतात. पूर्वी अशांना समाजकंटक म्हटले जाईल. हल्ली ते ट्विटरफौजेतील सैनिक गणले जातात. अशा प्रकारच्या राजकीय अ-संस्कृतीमध्ये या देशातील खेळाडू आणि कलाकारांनाही डुबक्या माराव्या वाटत असतील, तर ते आपापल्या क्षेत्राबाहेर वाढलेच नाहीत असे एक वेळ म्हणता येईल; परंतु केंद्रात गृहराज्यमंत्र्यांसारखे जबाबदारीचे पद भूषविणाऱ्या किरेन रिजिजू यांच्यासारख्या नेत्यानेही त्या मुलीचे ट्रोलिंग करावे, जल्पना करावी ही बाब असभ्य आहे. रिजिजू यांच्या मते या मुलीच्या मेंदूत कोणी तरी विष पेरले. ते का? तर काही महिन्यांपूर्वी तिने एका चित्रफितीतून युद्धविरोधी संदेश दिला होता. ती शहिदाची कन्या आहे. लहानपणी मुसलमानांचा द्वेष करणारी. त्यांना भोसकून मारावे असे वाटत असलेली. पुढे शिकून खरोखर शहाणी झाल्यानंतर तिच्या लक्षात आले की, आपल्या पित्याचा बळी अन्य कोणी नाही तर युद्धाने घेतला आहे. युद्धच झाले नसते, तर त्यांचा त्यात मृत्यू झाला नसता. त्यानंतर तिने ठरविले की, या दोन देशांत शांतता नांदावी यासाठी आपण काम करायचे. तसा संदेश तिने फेसबुकवरून प्रसिद्ध केला. त्यातील निवडक एक ओळ घेऊन आज रिजिजू आणि त्यांचे असंख्य पक्षबंधू तिला मूर्ख, ‘ब्रेनवॉश’ झालेली ठरवीत आहेत. या सर्व वादात आता केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही आपला शहाणपणा पाजळला आहे. त्यांच्या मते दिल्लीतील ‘त्या’ रामजस महाविद्यालयातील हिंसाचारामागे परकीय हात आहे. हा इंदिरा गांधी यांचा आवडता सिद्धांत. विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या अशांततेनंतर, रिजिजू यांनी, या मुलांमध्ये कोण विष कालवत आहे, असा सवाल करून त्याचे सूतोवाच केले होते. अहिर यांनी तो पुढे नेला. आपल्या विचारांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी परकी म्हणजे पाकिस्तानी हस्तक ठरविण्याचा हा कावा आहे. ‘भारत-चीन युद्धात जेव्हा जवान हुतात्मा होत असत तेव्हा भारतातील डावे येथे आनंदोत्सव साजरा करीत असत,’ या रिजिजू यांच्या आरोपाचा हेतूही तोच आहे. असाच आरोप येथील डावेही संघांवर करीत असतात (तो असा की, स्वातंत्र्ययुद्धात संघाने ब्रिटिशांची बाजू घेत भारतद्रोह केला). आपणास हवी ती आणि तेवढीच माहिती विकृत स्वरूपात मांडून कोणालाही राष्ट्रद्रोही ठरविणे सोपे आहे. व्हॉट्सअ‍ॅप हेच ज्यांचे विद्यापीठ आणि तेच इतिहासाचे शिक्षक अशा जल्पकांनी असे करणे वेगळे. रिजिजू आणि अहिर यांच्यासारख्यांना मात्र त्यांचे पद असा बेजबाबदारपणा करण्याची परवानगी देत नाही. त्यांच्याकडून ती अपेक्षा नाही.