रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरणाआधीच व्याजदर कपातीसाठी आग्रही राहिलेल्या अर्थमंत्र्यांनी याबाबतच्या निर्णयावर रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुन्हा फेरविचार होण्याची आवश्यकता गुरुवारी पुन्हा प्रतिपादित केली. महागाई दरात सातत्याने घसरण येत असल्याने व्याजाच्या दरात आनुषंगिक घट होण्याची गरज आहे, असे अरुण जेटली म्हणाले.
जेटली म्हणाले की, रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यास कर्जदार बँकांकडून नव्या कर्जाची मागणी करतील. तसेच यामुळे कर्जदारांचा मासिक हप्ताही कमी होईल. या स्थितीची आम्ही वाट पाहत असून संबंधित नियामक यंत्रणा त्यावर निश्चितच व लवकर निर्णय घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबरच महागाई व्यवस्थापनदेखील रिझव्‍‌र्ह बँकेकडून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी द्विमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर स्थिर ठेवले होते. तब्बल वर्षभरापासून बदल करण्यात न आलेले व्याजदर नव्या वर्षांत कमी होतील, असे संकेत राजन मात्र यांनी दिले आहेत.