गेल्या सलग तीन व्यवहारांपासून मूल्य घसरत असलेल्या टाटा समूहातील कंपनी समभागांनी मावळत्या संवत्सराला तेजीसह निरोप दिला. संवत्सर २०७२ च्या अंतिम व्यवहाराच्या दिवसात २५.६१ अंश वाढीने सेन्सेक्स २७,९४१.५१ वर तर २२.७५ अंश तेजीसह निफ्टी ८,६३८.०० पर्यंत पोहोचला.

साप्ताहिक तुलनेत मुंबई निर्देशांकात १३५.६७ अंश, तर निफ्टीत ५५.०५ अंश घसरण नोंदली गेली आहे. संवत्सर २०७२ मध्ये सेन्सेक्स २,१९८.२५ अंशांनी म्हणजेच ८.५३ टक्क्यांनी वाढला आहे. तर या वर्षभरातील निफ्टीतील वाढ ८५४.६५ (१०.९८%) अंश नोंदली गेली आहे.

सायरस मिस्त्री यांच्या अध्यक्षपदावरून दूर होण्यामुळे टाटा समूहातील कंपन्यांचा मूल्यप्रवास घसरणीसह सुरू होता. त्याला शुक्रवारी काहीशी खीळ बसली. त्याचबरोबर सेन्सेक्समधील बजाज ऑटो, टेक महिंद्र, सेन्सेक्समधील ३० पैकी १७ समभागांचे मूल्य वाढले, तर १२ समभागांमध्ये घसरण झाली. मुंबई निर्देशांकातील पॉवर ग्रिड स्थिर राहिला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, स्थावर मालमत्ता, पोलाद, बँक, आरोग्यनिगा आदी निर्देशांक २ टक्क्यांपर्यंत वाढले. सायरस मिस्त्री यांच्या निष्कासन कारवाईनंतर गेल्या सलग तीन व्यवहारांपासून घसरणारे टाटा समूहातील कंपन्यांचे समभाग मूल्य सप्ताहअखेरच्या व्यवहारात काहीसे उंचावले. मिस्त्री यांच्या आरोपामुळे चर्चेत असलेल्या कंपन्यांचे समभाग मूल्य ३ टक्क्यांपर्यंत वाढले. टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स आणि टीसीएसवरील दबाव मात्र शुक्रवारीही कायम होता.

रविवारी सायंकाळी बाजारात मुहूर्ताचे व्यवहार

  • शुक्रवारी भांडवली बाजारात नव्या महिन्यातील वायदापूर्तीचे व्यवहार झाले. सोबतच संवस्तर २०७२ मधील शेवटचे सत्रही पार पडले. प्रत्यक्ष नवे २०७३ संवत्सर ३० ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाने सुरू होणार असले तरी रविवार व लक्ष्मीपूजनानिमित्त सुटी असल्याने बाजारात व्यवहार होणार नाहीत. तसेच शनिवारीही व्यवहार होत नाही. परिणामी, मावळत्या सवंत्सराचा शुक्रवार हा व्यवहाराचा शेवटचा दिवस होता. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजार दफ्तरी रविवारी सायंकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान मुहूर्ताचे व्यवहार होणार आहेत. बलिप्रतिपदेनिमित्त भांडवली बाजारात सोमवारी व्यवहार होणार नाहीत.
  • भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आम्ही अद्यापही आशादायी आहोत. ग्राहकांची देशांतर्गत वाढती क्रयशक्ती, कंपन्यांचे समाधानकारक दुसरे तिमाही वित्तीय निष्कर्ष यांचे सहकार्य भांडवली बाजाराला यापुढे मिळत राहील. वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू यांना नव्या संवस्तर वर्षांतही गुंतवणूकदारांकडून योग्य प्रतिसाद मिळत राहील. येथील भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा निधी ओघ यापुढेही कायम असेल. वैभव अगरवाल, उपाध्यक्ष व प्रमुख संशोधक, एंजल ब्रोकिंग.

टाटा समभागांना तीन दिवसांनंतर उभारी

टाटा समूहाने अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची केलेली गच्छंती, पुढे मिस्त्री यांचे आरोप यातून गत तीन दिवसांत टाटा समूहातील कंपन्यांचे समभाग जवळपास १० टक्क्य़ांपर्यंत आपटले. तीन दिवसात समूहातील बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य एकूण २६,००० कोटी रुपयांनी खाली आले आहे. शुक्रवारच्या व्यवहारात मात्र ते सावरलेले दिसले.

untitled-13