खरेदीदारांच्या थंड प्रतिसादाने सराफ हवालदिल; घटलेले दर, नियम शिथिलतेकडे ग्राहकांचे दुर्लक्ष

तोळ्यामागे ३० हजार रुपयांखाली आलेले दर तसेच दागिने खरेदीकरिता पॅन कार्ड सादर करण्याची नियम शिथिलता आल्यानंतरही दिवाळीतील पहिल्या खरेदी मुहूर्ताला ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह नसल्याचे दिसून आले.

सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून १० ग्रॅमसाठी ३० हजार रुपयांच्या आतच आहेत. तर चांदीचा किलोचा भाव ४०,००० रुपयांच्या नजीक फिरत आहे. चालू वर्षांच्या गुढीपाडवा तसेच दसऱ्यालाही मौल्यवान धातूंच्या दरात फारशी उसळी अनुभवली गेलेली नाही. तरीदेखील या पर्यायाकडे खरेदीदारांचा ओढा वाढलेला नाही. यंदा तुलनेत मान्सूनही चांगला झाला आहे. मात्र वर्षभरापूर्वीची नोटाबंदी आणि तिमाहीपूर्वी लागू झालेली वस्तू व सेवा करप्रणाली यातून खरेदीदार अद्यापही सावरले नसल्याचे चित्र आहे.

दोन लाख रुपये किमतीपर्यंतच्या दागिने खरेदीकरिता पॅन व आधार क्रमांक नमूद करण्याच्या सक्तीपासून ग्राहकांची मोकळीक करणारी मुभा केंद्र सरकारने नुकतीच जाहीर केली. यापूर्वी ५०,००० रुपयांपर्यंतच्या सोन्याच्या दागिने खरेदीसाठी पॅन बंधनकारक होते. याचा विपरित परिणाम यंदाच्या दसऱ्याला सोने खरेदीवर झाल्याचे दिसून आले होते. मात्र यंदा त्यात शिथिलता येऊनही मौल्यवान धातू खरेदी-विक्री व्यवहार फारसे झाले नसल्याचे सांगण्यात येते.

छोटी सराफ साखळी दुकाने, पेढय़ा यांचा देशाच्या एकूण सोने-चांदी विक्री व्यवसायात तब्बल ९० टक्के हिस्सा आहे. खरेदी मुहूर्ताला पेढय़ांमध्ये अनुभवास येणाऱ्या गजबजाटाचा अभाव मुंबईतील बहुताश सराफांनी मंगळवारी अनुभवला. पीसी ज्वेलर्स, कल्याण ज्वेलर्ससारख्या साखळी दालने चालविणाऱ्या आघाडीच्या सराफपेढय़ांनी यंदाच्या सणोत्सवात वार्षिक तुलनेत ३५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

‘ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’चे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी सोने खरेदीसाठी यंदाचा सण महोत्सव गेल्या वर्षीसारखाच असेल, असे म्हटले आहे. ‘जागतिक सुवर्ण परिषदे’चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुरूप, यंदा मौल्यवान धातूचे दर काही प्रमाणात कमी आहेत. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच सोन्याच्या नाण्यांकरिता ग्राहकांकडून मागणी नोंदली जात आहे. यंदा झालेला चांगला पाऊस व कमी असलेले सोन्याचे दर या सोने खरेदीच्या पथ्यावर पडणाऱ्या बाबी आहेत, असेही ते म्हणाले.

या क्षेत्राशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील सुधारणांमुळे खरेदीदारांनी यंदा निर्धास्तपणे सोने खरेदी केल्याचे पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी सांगितले. ते म्हणाले की, सोन्याच्या दरांबाबत सध्याचे दर हे गेल्या वर्षीच्या इतकेच आहेत; मात्र आधीचा मूल्यवर्धित कर व आताचा वस्तू व सेवा कर यातील फरक तेवढाच (दीड टक्का अधिक) खरेदीदारांना बोचरा वाटत आहे. सोने तसेच चांदीचे दर गेल्या वर्षीच्या सणाइतकेच आहे. मात्र खरेदीदारांचा प्रतिसादही तुलनेत गेल्या वर्षीसारखाच माफक आहे. तुलनेत चांदीसाठी यंदा मागणी काही प्रमाणात वाढल्याचे तेवढे समाधानकारक चित्र आहे.

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशी सोने खरेदीच्या दृष्टीने सकारात्मक असल्याचे म्हटले  आहे. खरेदीदारांच्या संथ प्रतिसादाबाबत मंगळवारी दुपापर्यंतचे चित्र सायंकाळी उशिरापर्यंत गर्दीच्या रूपात बदलले. मौल्यवान धातूकरिता गुंतवणूकदार आणि ग्राहक अशा दोहोंसाठी बाजाराची सध्याची परिस्थिती अनुकूल आहे.

शहरी तसेच ग्रामीण भागातून सोन्याची नाणी, दागिने, हिऱ्यांचे दागिने याकरिता मागणी नोंदविली जात आहे. येणाऱ्या विवाह समारंभाकरिता दागिने खरेदी करण्याकरिता सध्याचे दर सुलभ मानले जात आहेत.