कामगिरी चांगली असतानाही काढून टाकल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप

कामगिरी चांगली असूनही कंपनीने नोकरीचा राजीनामा देण्यास सांगितले असल्याचा आरोप करत ‘कॉग्निझंट’च्या काही कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्त कार्यालयात धाव घेतली आहे. ‘फोरम ऑफ आयटी एम्प्लॉइज’ (फाइट) या संघटनेने पुण्याच्या कामगार आयुक्तालयात गुरुवारी याचिका दाखल केली.

पुण्याच्या आयटी क्षेत्रातील दहा ते पंधरा हजार कर्मचाऱ्यांना येत्या दोन महिन्यांत नोकऱ्या गमवाव्या लागण्याच्या शक्यतेचे वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरुवारी दिले होते. या पाश्र्वभूमीवर कॉग्निझंटच्या पुणे व मुंबईतील २०० कपातग्रस्त कर्मचाऱ्यांनी ‘फाइट’शी संपर्क साधला असून देशात जवळपास ६,००० कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार असल्याची चर्चा ‘आयटी’ वर्तुळात आहे. ‘फाइट’तर्फे शिवाजीनगर येथील कामगार आयुक्त कार्यालयात गुरुवारी याचिका दाखल करण्यात आली. या वेळी कॉग्निझंटचे काढून टाकलेले चार कर्मचारी उपस्थित होते. सहायक कामगार आयुक्तांनी या प्रकरणी १ जून रोजी कंपनीचे प्रतिनिधी आणि कपातग्रस्त कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

राजीनामा देण्यास सांगितलेले कर्मचारी साधारणत: ५ ते १५ वर्षे अनुभव असलेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक मूल्यमापनाच्या वेळी झालेल्या चर्चेत त्यांची कामगिरी चांगली असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात कामगिरी खराब असल्याचा अभिप्राय देऊन कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. राजीनामा देण्यास केवळ तोंडी सांगू नका, लेखी पत्र द्या, अशी विनंती कर्मचाऱ्यांनी केली. परंतु कंपनी तसे लेखी देण्यास तयार नाही. राजीनामा न दिल्यास काढून टाकू किंवा काळ्या यादीत टाकू, अशी भीती दाखवल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिलाही आहे, अशी माहिती ‘फाइट’च्या प्रतिनिधीने दिली.

‘ही कपात नाहीच’;‘कॉग्निझंट’चा दावा

‘कॉग्निझंट’ने कर्मचारीकपात केलीच नसल्याचे म्हटले आहे. ‘दरवर्षी आम्ही कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करतो. व्यवसायाच्या दृष्टीने जी कौशल्ये गरजेची आहेत, ती कर्मचाऱ्यांकडे असणे आवश्यक आहे. ही नित्याची प्रक्रिया असून कामगिरीवर आधारित आहे. मार्च २०१७ च्या तिमाहीत आम्ही हजारो कर्मचाऱ्यांना नोक ऱ्या दिल्या; २०१६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना पुनर्प्रशिक्षित केले. या वर्षांच्या अखेरीस एक लाख कर्मचाऱ्यांचे पुनर्प्रशिक्षण पूर्ण केले जाईल,’ असे कंपनीचा प्रवक्ता म्हणाला.

‘सहा महिन्यांत माझी कामगिरी खराब कशी?’

‘मला आयटी क्षेत्रात दहा वर्षांचा अनुभव आहे. या कंपनीत नोकरीस लागून मला सहा महिने झाले असताना वार्षिक मूल्यमापन करण्यात आले. त्यात माझी कामगिरी खराब असल्याचे सांगून राजीनामा देण्यास सांगण्यात आले. माझे काही सहकारी ५-६ वर्षांपासून काम करत असून इतकी वर्षे चांगली असलेली त्यांची कामगिरी याच वर्षी एकदम खराब कशी दाखवण्यात आली? नोकरी सोडण्यासाठी ‘नोटिस पीरिअड’ देऊन बदल्यात दोन महिन्यांचा पगार घ्या किंवा चार महिन्यांचा पगार घेऊन बाहेर पडा, असा पर्याय दिला जात आहे,’ असे ‘कॉग्निझंट’मधील एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.