भांडवली बाजार निर्देशांक‘निफ्टी ५०’च्या परतावा कामगिरीपेक्षा २००८ पासून सातत्याने सरस कामगिरी करणारा फंड म्हणून ‘आयसीआयसीआय प्रुडेंशिअल डायनॅमिक प्लॅन’चा लौकिक राहिला आहे. फंडाच्या प्रारंभी म्हणजेच ऑक्टोबर २००२ मध्ये या फंडात ज्यांनी १० लाखांची गुंतवणूक केली असेल, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य डिसेंबर २०१६ अखेर तब्बल २.०५ कोटीपर्यंत वाढले आहे. त्याचबरोबर नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतून अर्थात ऑक्टोबर २००२ पासून दरमहा १० हजार रुपयांची  ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करणाऱ्या या फंडातून वार्षिक १८.७९ टक्के दराने परतावा दिला आहे. त्या उलट याच काळात ‘निफ्टी ५०’ निर्देशांकाने वर्षांला सरासरी १२.५१ टक्के परतावा दिला आहे.

डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशनवर आधारित हा मुदतमुक्त फंड ऑक्टोबर २००२ मध्ये सुरू करण्यात आला. डायनॅमिक असेट अलोकेशन पद्धतीत किमती उच्च पातळीवर असताना नफा कमवायचा आणि ज्या वेळी किमती कमी असतात तेव्हा खरेदी करायची अशी व्यूहनीती अवलंबली जात असल्याने साहजिकच या फंडाने दमदार कामगिरी करीत आतापर्यंत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

वस्तुत: डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन प्रकारातील हा सर्वोत्तम फंड असून दीर्घकाळातील उद्दिष्टपूर्ती साध्य करू पाहणाऱ्यांसाठी ही आदर्श गुंतवणूक ठरते, याचा प्रत्यय फंडाचे निधी व्यवस्थापनाने वेळोवेळी दिला आहे. अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकांत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकी भांडवली बाजाराने शिखराला गवसणी घातली आहे. अर्थातच दूरदृष्टी ठेवून या फंडाने अगोदरच विदेशी कंपन्यांच्या समभागांत केलेल्या गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याची फंडाला अपेक्षा आहे. ३१ जानेवारी २०१७ रोजी डायनॅमिक फंडांमधील मालमत्ता ६,०७६.६७ कोटी रुपये आहे. यातील ७५.५९ टक्के गुंतवणूक ही समभागांमध्ये असून आघाडीच्या पाच समभागांतील गुंतवणुकीची सरासरी ३० टक्के आहे. परदेशी बाजारांमधील संधी पाहता या फंडाने परकीय समभागांमध्ये गुंतवणूक आधीपासूनच सुरू केली. ३१ डिसेंबर २०१६च्या विवरणानुसार परकीय समभागांमध्ये ६.५६ टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे. अनिश्चित काळात चांगला परतावा देणारी समभाग आणि रोख्यांचे मिश्रण गुंतवणुकीत संतुलित रूपात फंडाने सत्वर व सक्रियरीत्या केले आहे.