बी-१५क्षेत्राच्या योगदानात १९ टक्के वाढ

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मुंबई, पुण्यासारख्या शहरांबाहेरील गुंतवणूकदारांकडून वाढू लागली आहे. परंपरेने गुंतवणूक असणाऱ्या १५ अव्वल शहरांपल्याड (बी १५) म्युच्युअल फंडातील मालमत्ता सरलेल्या आर्थिक वर्षांत १९ टक्क्यांनी वाढून २.०२ लाख कोटी रुपये झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.

भांडवली बाजार व म्युच्युअल फंड व्यवसायाचे नियमन करणाऱ्या ‘सेबी’ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च २०१५ अखेर १५ महानगरांपल्याड क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे फंडाची मालमत्ता १.७० लाख कोटी रुपये होती, ती  वाढून मार्च २०१६ अखेर २.०२ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

या क्षेत्रातून समभागनिगडित (इक्विटी) फंडांमध्ये अधिक गुंतवणूक ओघ येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील सकारात्मक चित्रानेही गुंतवणूकदारांचे मनोबल उंचावले असून त्यांचा कल म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे वाढल्याचे दिसून येत असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.

देशातील प्रमुख १५ महानगरांपल्याड म्युच्युअल फंड योजनांचा प्रसार करण्याचे सेबीने फंड कंपन्यांना वेळोवेळी सांगितले आहे. या भागातील किरकोळ गुंतवणूकदारांचा फंडांकडील कल वाढविण्यावरही सेबीने भर दिला होता.

यामुळे या भागातील गुंतवणूकदार खातीदेखील २०१५-१६ दरम्यान १६.१ टक्क्यांनी वाढून २.०९ कोटी झाली आहेत. सध्या फंडांमध्ये असलेली एकूण गुंतवणूकदार खाती ४.९२ कोटी आहेत. विविध ४३ फंड कंपन्या एकूण १५ लाख कोटी रुपयांहून अधिक निधीचे व्यवस्थापन पाहतात. देशातील प्रमुख १५ महानगरांमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद, बदोडा, चंदीगड, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, पणजी, पुणे आणि सुरत यांचा समावेश होतो. या शहरांव्यतिरिक्त विस्तार करण्यासाठी म्युच्युअल फंडांना सेबीने २०१२ मध्ये प्रोत्साहन दिले होते.