निती आयोगाची शिफारस, केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी लवकरच प्रस्ताव येणार

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सात आजारी कंपन्या बंद करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाकडे या सात कंपन्यांची शिफारस करण्याची तयारी निती आयोग करत आहे.

मंत्रिमंडळाला शिफारसीची तयारी सध्या निती आयोग करत असून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सात कंपन्यांची त्यात नावे असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या ताब्यातील २६ आजारी आस्थापनांबाबतचा आराखडा निती आयोगाने तयार केला आहे. पैकी सातकरिता मंत्रिमंडळाची परवानगी घेण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

हिंदुस्थान केबल, टायर कॉर्पोरेशन, एचएमटी वॉचेस, बर्ड्स ज्युट अ‍ॅण्ड एक्स्पोर्ट लिमिटेड, सेंट्रल इनलॅण्ड वॉटर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या त्या कंपन्या असल्याचे सांगण्यात येते. ही नावे अर्थव्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीकडे पाठविण्यात येणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यात निती आयोगाने १२ आजारी कंपन्यांची नावे निश्चित केल्याचे सांगण्यात येते. यामध्ये नॅशनल टेक्सटाइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स, स्कूटर्स इंडिया आणि हिंदुस्थान फ्ल्युरोकार्बन्स यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी निती आयोगाने १५ आजारी सरकारी कंपन्यांपैकी सेल व एनएमडीसी या दोन कंपन्यांच्या काही प्रकल्पांच्या धोरणात्मक विक्रीची शिफारस केली होती.

येत्या तीन दिवसांत संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षांसाठी सरकारने ४५,५०० कोटी रुपयांच्या निर्गुतवणुकीचे लक्ष्य राखले आहे. पैकी सरकारला आतापर्यंत ३०,००० कोटी रुपये उभारता आले आहे.

२०१७-१८ साठी सरकारने अर्थसंकल्पातील निर्गुतवणुकीचे लक्ष्य विस्तारताना ते ७२,५०० कोटी रुपयांवर नेले आहे. पैकी १५,००० कोटी रुपये हे धोरणात्मक विक्रीच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.

४३ सरकारी उपक्रम सलग तीन वर्षे तोटय़ात

बीएसएनएल, एअर इंडिया यासह विविध ४३ केंद्र सरकारचे उद्यमी उपक्रम हे गत तीन वर्षांपासून सलगपणे तोटय़ात चालले आहेत. केंद्रीय अवजड उद्योग आणि सावर्जनिक उपक्रम राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी  लोकसभेत लेखी उत्तरादाखल ही माहिती दिली. भांडवलासह प्रमुख संसाधनांची वानवा, निम्न क्षमता वापर, खासगी क्षेत्रातून वाढलेली स्पर्धा, जुनाट उपकरणे व सामग्री, भिकार व्यवस्थापन आणि कारभार आणि विपणनाचा अभाव अशी या उपक्रमांच्या तोटय़ाची कारणेही सरकारने नमूद केली आहेत. तोटय़ातील या उपक्रमांमध्ये ब्रिटिश इंडिया कॉर्पोरेशन, हिंदुस्तान अँटिबयोटिक्स, एचएमटी वॉचेस आणि इंडियन ड्रग्ज अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स या कधी काळी नावाजलेल्या कंपन्याही समाविष्ट आहेत.