भविष्य निर्वाह निधीतील रक्कम भांडवली बाजारात गुंतविण्यास केंद्रीय कामगार खात्याने होकार दिल्यानंतर त्यातील सुमारे ६,००० कोटी रुपये बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांमध्ये ओतले जाणार आहेत.
केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी याबाबत माहिती सोमवारी हैदराबाद येथे दिली. मार्च २०१६ अखेपर्यंत निधीतील ६,००० कोटी रुपये हे अधिक परताव्यासाठी भांडवली बाजारात गुंतविले जातील, असे राज्यमंत्र्यांनी सांगितले.
याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून गुंतविण्यात येणाऱ्या निधीचे व्यवस्थापन स्टेट बँक, रिलायन्स व एचएसबीसी या बँका पाहणार आहेत, असेही दत्तात्रेय यांनी सांगितले. सुरुवातीच्या टप्प्यात एक टक्का ते चालू आर्थिक वर्षअखेपर्यंत १५ टक्के रक्कम या माध्यमातून गुंतविली जाईल, असेही ते म्हणाले.
ही गुंतवणूक दीर्घकालावधीसाठी ती निश्चितच एखाद-दोन वर्षांसाठी केली जाणार नाही; तर अशा गुंतवणुकीसाठी सरकारने १० ते १५ वर्षांचा कालावधी अपेक्षित केला आहे, असेही राज्यमंत्री म्हणाले.
सध्या या निधीतील गुंतवणुकीवर वार्षिक ८.७५ टक्के व्याज दिले जाते; बाजारातील गुंतवणुकीच्या माध्यमातून १० टक्क्य़ांपर्यंतचा परतावा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.