भारतातील युवावर्गाला कौशल्याधारित शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून तांत्रिक शाळा उभारण्यात येणार असून यासाठी दक्षिण कोरियाची आघाडीची मोबाइल निर्माती सॅमसन्ग व केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयादरम्यान सहकार्य करण्यात आले आहे.
नवी दिल्लीत अशा पहिल्या शाळेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा व सॅमसंगच्या दक्षिण पश्चिम आशिया विभागाचे अध्यक्ष बी. डी. पार्क यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी झाले. वर्षांला १० हजार विद्यार्थी प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट राखण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रति अभ्यासक्रम २० हजार रुपये शुल्क असून अभ्यासक्रम हा तीन महिन्यांचा आहे. अभ्यासक्रमासाठी शुल्क न भरू शकणाऱ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सॅमसंग कंपनीत नोकरी अथवा स्वतंत्र व्यवसायासाठी सहकार्य केले जाणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबादसह देशातील प्रमुख १० शहरांमध्ये अशा तांत्रिक शाळा चालू वर्षांत सुरू केल्या जाणार आहेत.