विक्रमी शिखर गाठणाऱ्या भांडवली बाजाराने गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देण्यात सोने-चांदीपेक्षा आघाडी घेतली आहे. २०१४ मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स २३ टक्क्यांनी वधारला असताना सोन्याच्या किमती मात्र ५ टक्क्यांनी घसरल्या आहेत, तर चांदीने या कालावधीत अवघा २.३८ टक्के परतावा दिला आहे.
२६ हजारांपुढे जाताना सेन्सेक्सने गेल्या गुरुवारी नव्या ऐतिहासिक टप्प्याला गाठले. त्याचबरोबर निफ्टीनेही हाच क्रम राखताना ७,८०० पुढील प्रवास राखला. सोमवारी, २८ जुलै रोजी सेन्सेक्स २५,९९१.२३ वर असताना त्याने गेल्या वर्षभराच्या तुलनेत २२.७६ टक्क्यांची झेप घेतली आहे. ३१ डिसेंबर २०१३ रोजी सेन्सेक्स २१,१७०.६८ वर होता, तर गेल्या वर्षअखेर सोने तोळ्यासाठी २९,८०० रुपये, तर चांदी किलोमागे ४३,७५५ रुपये होती. आता २८ जुलै २०१४ रोजी सोने व चांदीसाठी हे दर अनुक्रमे २८,३७० व ४४,८०० रुपये राहिले आहेत. गेल्याच आठवडय़ात राजधानीत सोने वर्षांच्या सर्वोच्च अशा २६,३०० रुपयांवर गेले होते.
२०१३ मध्ये सेन्सेक्सने ९ टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. तेव्हा आता २०१४ मध्ये परताव्याबाबत भांडवली बाजार पुढे जातात का मौल्यवान धातू हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.