विक्रमी शिखराला पोहोचलेल्या भांडवली बाजाराला मंगळवारी  नफेखोरीचे ग्रहण लागले. परिणामी सेन्सेक्स व निफ्टी सत्रात नव्या उच्चांकाला पोहोचल्यानंतर अखेरच्या टप्प्यात समभागांची जोरदार विक्री सुरू झाली आणि दोन्ही निर्देशांक सर्वोच्च टप्प्यापासून ढळले. व्यवहारात २८,२८२.८५ पर्यंत गेलेला सेन्सेक्स दिवसअखेर सोमवारच्या तुलनेत १४.५९ अंश घसरून २८,१६३.२९ वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सत्रात ८,४५४.५० पर्यंतची उंचावणारी कामगिरी बजाविल्यानंतर ४.८५ अंश घसरणीसह ८,४२५.९० वर स्थिरावला.
गेल्या दोन्ही सत्रांत भांडवली बाजार तेजीवर स्वार होते. यामुळे दोन दिवसांतील मुंबई निर्देशांकाची भर २३७.२४ अंशांची राहिली होती. सोमवारी सत्रात २८,२०० नजीक झेप घेतल्यानंतर सत्रअखेर मुंबई निर्देशांक विक्रमी टप्प्यावर कायम होता. मंगळवारची सुरुवातही तेजीसह झाली. या वेळी सेन्सेक्स २८,२००च्या पुढे जात २८,२८२.८५ पर्यंत पोहोचला. दिवसअखेर मात्र विक्रमापासून माघार घेत निर्देशांकाने घसरण नोंदविली.सेन्सेक्समधील एचडीएफसी, टीसीएस, इन्फोसिस, सन फार्मा, ओएनजीसी, टाटा मोटर्स, हिंदाल्को, हिंदुस्थान युनिलिव्हर या समभागांमध्ये घसरण नोंदली गेली. मुंबई निर्देशांकातील ३० पैकी १४ समभागांचे मूल्य घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.६१ टक्क्यांसह भांडवली वस्तून निर्देशांक घसरणीत पुढे राहिला. सोन्यावरील संभाव्य आयात र्निबधामुळे दागिने निर्मिती सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांनीही मंगळवारी लोळण घेतली. दरम्यान, परकीय चलन व्यवहारात रुपया सलग चौथ्या सत्रात नरम राहिला. एक पैशाच्या घसरणीने डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी ६१.७४ या महिन्याभराच्या किमान स्तरावर आला.

१०० लाख कोटींची हुलकावणी!
व्यवहारात तेजी असताना निर्देशांकाच्या नव्या विक्रमासह मुंबई शेअर बाजाराचे बाजारमूल्य १०० लाख कोटी रुपयांनजीक पोहोचले. सेन्सेक्स २८,२८२.८५ अशा सार्वकालिक उच्चांकाला पोहोचला असतानाच सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण मूल्य या टप्प्यापासून अवघे ५२,१९१ कोटी रुपये दूरवर होते. मुंबई शेअर बाजाराने १०० लाख कोटी रुपयांचा टप्पा सर्वप्रथम २००७ मध्ये नोंदविला होता. २०१४ मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स ७,००० अंशांनी उंचावला आहे.