सर्वोच्च टप्प्यावरील भांडवली बाजार गुंतवणूकदारांच्या नफेखोरीच्या धोरणानंतरही गुरुवारी नव्या विक्रमावर कायम राहिला. किरकोळ निर्देशांक वाढीसह दोन्ही प्रमुख शेअर बाजारांनी सलग दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक स्तराला गवसणी घातली. यामध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सत्रात ६,८०० ला गाठत लक्ष वेधले. दिवसअखेर सेन्सेक्स १२.९९ अंश वाढीसह २२,७१५.३३ या, तर निफ्टी ०.२० अंश वधारणेसह ६,७९६.२० वर बंद झाले.
मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी बुधवारी नव्या विक्रमाची नोंद केली होती. असे करताना सेन्सेक्स २२,८०० च्या पुढे, तर निफ्टी ६,८०० नजीक पोहोचला होता. गुरुवारच्या सत्राची सुरुवातही अशाच तेजीसह राहिली. व्यवहारात सेन्सेक्स २२,७९२ तर निफ्टी ६,८१९ पर्यंत झेपावला. नव्या विक्रमाची नोंद करणाऱ्या शेअर बाजारातील सुरुवातीची ही वाढ गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे होती.
ऊर्जा, भांडवली वस्तू, बांधकाम, तेल व वायू, वाहन क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. २.५ टक्क्यांसह ऊर्जा निर्देशांक वरचढ राहिला. तर बुधवारच्या सत्रात नकारात्मक व्यवहार करणाऱ्या माहिती तंत्रज्ञानांचा क्रम दुसऱ्या दिवशीही राहिला; त्याला गुरुवारी औषध निर्मिती क्षेत्रातने साथ दिली. या समभागांमध्ये २.७ टक्क्यांपर्यंतची आपटी नोंदली गेली.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने उंचावलेल्या भारताच्या विकासदराच्या जोरावर बुधवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १,०४३.८६ कोटी रुपये भांडवली बाजारात गुंतविले. या एकाच व्यवहारात ३५९ अंश वाढ राखणाऱ्या सेन्सेक्सने गुरुवारी तसा प्रतिसाद दिला नाही, मात्र दिवसअखेर तो किरकोळ वाढीसह नव्या टप्प्यावर पोहोचला.
तर निफ्टीने इतिहासात प्रथमच ६,८०० ला प्रथमच गवसणी घातली. दिवसअखेर मात्र तो या स्तरावर कायम राहिला नाही. तरीदेखील त्याचे सर्वोच्च स्थान कायम राहिले.