स्कायमेटपाठोपाठ भारतीय वेधशाळेनेही यंदाच्या पावसाबाबत आश्वस्त भाकीत केल्याने बाजाराची तेजी मंगळवारीदेखील कायम राहिली. सलग दुसऱ्या व्यवहारात वाढ नोंदविताना सेन्सेक्स मंगळवारी १२३.४३ अंशांनी वाढत २५,१४५.५९ पर्यंत गेला. तर ३७.५५ अंश वाढीमुळे निफ्टीला ७,७०० च्या पुढे, ७,७०८.९५ वर पोहोचता आले. निर्देशांक आता आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

यंदाच्या सकारात्मक मान्सूनबाबतच्या भाकितावर स्वार होत निर्देशांकांनी मंगळवारच्या व्यवहारात जोरदार नफेखोरी केली. मंगळवारी सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या मार्चमधील महागाई व औद्योगिक उत्पादनदरापूर्वी वाढीव मूल्याचा लाभ गुंतवणूकदारांनी घेतला. स्थानिक तसेच विदेशी गुंतवणूकदार संस्थांनीही बाजारात खरेदीवर भर दिला.

चांगल्या मान्सूनमुळे वाहन क्षेत्रालाही मागणी येण्याच्या अंदाजाने मंगळवारी  बाजारात या क्षेत्रातील मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रसारख्या कंपन्यांचे समभाग ३ टक्क्यांपर्यंत वाढले.

उत्पादन शुल्कविरोधातील गेल्या महिन्याहून अधिक कालावधीतील सराफ बंद आंदोलन तूर्त थांबल्याने टीबीझेड, पीसी ज्वेलर्ससारख्या सूचिबद्ध सराफ पेढय़ांचे समभाग मूल्यही वाढले.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सचा मंगळवारचा प्रवास २५,१८०.०२ पर्यंत झाला. तर त्याचा सत्रातील तळ २५ हजाराच्या काठावर, २४,९९६.४४ राहिला.

मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा मुंबई निर्देशांकाचा टप्पा हा ४ एप्रिलनंतरचा वरचा ठरला. तर संपूर्ण व्यवहारात ७,७०० पुढील स्तर कायम राखणारा निफ्टी सत्रात ७,७१७.४० पर्यंत झेपावला होता. सेन्सेक्समधील केवळ ७ समभाग घसरले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन निर्देशांक सर्वात वर होता.

कृषी समभाग उंचावले..

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याबाबत दोन प्रमुख वेधशाळांनी व्यक्त केलेल्या अंदाजानंतर मंगळवारी बाजारातील कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे समभाग मूल्य उंचावले. इन्सेक्टिसाइड्स इंडिया तर तब्बल १६.१७ टक्क्यांनी झेपावला.

इन्सेक्टिसाइड्स इंडिया    रु. ४००.८०     २ १६.१४%

जैन इरिगेशन सिस्टिम्स  रु. ६३.१५      २ ६.१३%

चंबल फर्टिलायजर्स       रु. ६०.१५      २ ४.१६%

कावेरी सीड कंपनी रु. ३८१.१५     २ ३.३९%

दीपक फर्टिलायजर्स      रु. १५४.१५     २ १.७०%