राज्यात लवकरच नवीन लघु उद्योग धोरण जाहीर केले जाईल. या नव्या धोरणाचा फायदा घेत महिलांना उद्योगक्षेत्रात जोमाने पुढे येता येईल आणि तसा फायदा घेण्यासाठी महिलांना अधिकाधिक प्रोत्साहित केले जावे, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केले.
राज्यभरातून सुमारे हजारहून अधिक उद्योजिकांच्या उपस्थितीत दादरच्या बी. एन. वैद्य सभागृहात दिवसभर चाललेल्या ‘आम्ही उद्योगिनी राज्यव्यापी उद्योजक महिला’ परिषदेच्या सम्ोारोप सत्रात उद्योगमंत्री देसाई बोलत होते. राज्यात उद्योग सुरू करणे सुलभ होण्याच्या दृष्टीने सरकारकडून त्वरेने पावले टाकली जात आहेत. परवाने-मंजुऱ्यांची संख्या ७६ वरून २५ वर आणली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिषदेचे उद्घाटन राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे-पालव यांच्या हस्ते झाले. महिलांना व्यवहार जास्त कळतो, त्यांना ताणतणावांचे व्यवस्थापनही चांगले जमते, महिलांमधील सकारात्मक वृत्ती पाहता महिलांकडे उद्योजकता उपजतच असते, असे त्यांनी प्रतिपादन केले. केवळ थोडासा आत्मविश्वास व प्रशिक्षण देण्याची त्यांना गरज आहे, असे त्या म्हणाल्या. आदित्य बिर्ला समूहाच्या संचालिका राजश्री बिर्ला, रश्मी ठाकरे, सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर, राज्याचे विकास आयुक्त सुरेंद्र बागडे आदी उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे होते. या परिषदेनिमित्ताने आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे यशस्वी उद्योजिकांना उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते ‘उद्योगिनी गौरव पुरस्कार’ वितरित करण्यात आले.