सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर भांडवली बाजार सप्ताहारंभी एकदम उत्साहित झाला. सोमवारच्या एकाच दिवसाच्या व्यवहारात मुंबई निर्देशांकाने जवळपास ५०० अंश झेप घेत सेन्सेक्सला त्याच्या गेल्या चार महिन्यांतील तळातूनही बाहेर काढले.
४७९.२८ अंशवाढीसह सेन्सेक्स २७,४९०.५९ वर गेला. तर १५०.४५ अंशवाढीने निफ्टी ८,३३१.९५ पर्यंत पोहोचला. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांची व्यवहारातील झेप अनुक्रमे २७,५३७.८५ व ८,३४६.०० पर्यंत राहिली.
यापूर्वीची सत्रातील सर्वाधिक, ५१७.२२ झेप ही ३० मार्च रोजी नोंदली गेली होती. एकटय़ा एप्रिलमध्ये सेन्सेक्स तब्बल ९०० अंशांनी रोडावला होता. बाजारातील ३,००० हून अधिक विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्री खेळीमुळे हे वातावरण तयार झाले होते.
भांडवली बाजारातील गेल्या काही दिवसांतील घसरणीमुळे मुंबई निर्देशांक २७,००० वर येऊन ठेपला होता. बाजाराशी निगडित विदेशी गुंतवणूकदारांवरील पूर्वलक्ष प्रभावाने लागू करण्याच्या कराबरोबरच किमान पर्यायी कर संदर्भातील अनिश्चितता संपुष्टात आल्याने बाजाराने ही मरगळ चालू आठवडय़ातील पहिल्याच दिवसातील व्यवहारात झटकून टाकली.
गेल्या आठवडाअखेर लोकसभेत वित्त विधेयक पारित झाल्याचा सुपरिणामही बाजारातील व्यवहारात सोमवारी दिसून आला. सोमवारी वाहन, स्थावर मालमत्ता, तेल व वायू क्षेत्रातील कंपन्यांची जोरदार खरेदी झाली. ओएनजीसी, रिलायन्स, इन्फोसिस या ब्ल्यू चिप कंपन्यांच्या कामगिरीमुळे मुंबई शेअर बाजारानेही त्याचे १०० लाख कोटी रुपयांचे मूल्य पुन्हा प्राप्त केले.
सेन्सेक्समध्ये तेल व वायू क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ओएनजीसीची कामगिरी सरस राहिली.
किरकोळ विक्री,
वाहन समभाग चमकले
भारतीय किरकोळ विक्री क्षेत्रातील विलीनीकरणाच्या वेगवान घडामोडींमुळे या क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभागही दुहेरी आकडय़ातील टक्केवारीत उंचावले. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्याच महिन्यात विक्रीतील वाढ राखणाऱ्या मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, बजाज ऑटोसारख्या वाहन कंपन्यांचे समभागही  वधारले.