निधी व्यवस्थापन क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या यूटीआय म्युच्युअल फंड कंपनीने भांडवली बाजारात उतरण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. भारतीय भांडवली बाजाराच्या चढय़ा प्रवासाबाबत आश्वस्त असलेल्या यूटीआयने प्रारंभिक भागविक्रीसाठी सरकारची परवानगी मागितली आहे.
प्रारंभिक भागविक्रीसाठी आम्ही तयारी करत आहोत. त्यासाठी केंद्रीय अर्थ खात्याकडे परवानगीही मागितली आहे, असे यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लिओ पुरी यांनी स्पष्ट केले आहे. ही परवानगी मिळताच पुढील सहा महिन्यांत भांडवली बाजारात प्रवेश केला जाईल, असेही ते म्हणाले.
भांडवली बाजारात उतरण्यासाठी बाजार नियामक सेबीही कंपन्यांना प्रोत्साहित करत आहे. तेव्हा कंपनीलाही प्रारंभिक विक्री प्रक्रिया राबविण्यात कोणतीही अडचण येईल असे वाटत नाही, असे पुरी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अर्थ खात्याचीही आम्हाला याबाबतची परवानगी लवकरच मिळेल, असेही ते म्हणाले.
सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान, ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे सूतोवाच केले होते. तसेच अद्याप बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांनी हा मार्ग जोपासावा, असे आवाहनही केले होते.
यूटीआय हे देशातील सर्वात जुने फंड घराणे आहे. कंपनीने यापूर्वी २००८ मध्येही बाजारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आवश्यक ती सर्व मंजुरी असूनही तत्कालीन वातावरणामुळे त्यापासून माघार घेण्यात आली. कंपनी १५ अब्ज डॉलरच्या निधीचे व्यवस्थापन पाहते. या क्षेत्रात कंपनीचा निधी मालमत्तेत पाचवा क्रमांक आहे. कंपनीत सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांचा प्रत्येकी १८.५ टक्के तर अमेरिकेच्या टी. रो प्राइसची २६ टक्के भागीदारी आहे.