जिल्ह्य़ातील ७ मध्यम व ५७ लघुसिंचन प्रकल्पांत सध्या जेमतेम १७ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. ७ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त साठय़ाचे प्रमाण ४२ टक्के, तर लघुप्रकल्पांतील उपयुक्त साठय़ाचे प्रमाण केवळ ८ टक्के आहे.
जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याच्या खाली आहे. तीन लघुसिंचन प्रकल्प कोरडे आहेत, तर २८ लघु प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याच्या खाली आहे. मागील वर्षी याच वेळेस सर्व मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा जवळपास १८ टक्के होता. या वर्षी तो १३ टक्के म्हणजे एक टक्क्य़ाने कमी आहे.
सर्व मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता २७३.२५ दलघमी आहे. पैकी उपयुक्त साठय़ाची क्षमता २३६.३८ दलघमी आहे. परंतु सध्या या प्रकल्पात ४१.२० दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. पैकी २८.१६ दलघमी उपयुक्त साठा मध्यम प्रकल्पातील, तर १३.०४ दलघमी उपयुक्त जलसाठा लघु सिंचन प्रकल्पातील आहे.