शिल्पकलेतील महाकाव्य असे वर्णन करता येतील अशी अजंठा व वेरूळ शिल्पे, दौलताबादसारखा समरकलेतील सर्वागसुंदर किल्ला, ताजमहालाची प्रतिकृती मानला जाणारा बीबी का मकबरा; अशा एकापेक्षा एक सुंदर वास्तू असलेले औरंगाबाद म्हणजे संपूर्ण मराठवाडय़ातील कलाकारांचे माहेरघर म्हणायला हवे. या शहराबरोबरच मराठवाडय़ातील इतर शहरांमधील कलाकारांच्या नाटय़गुणांना राज्यभरात पोहोचवण्यासाठी आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी मंगळवारी दुपारी औरंगाबाद येथील तापडिया नाटय़मंदिरात होणार आहे. प्राथमिक फेरीतून निवडलेल्या पाच महाविद्यालयांच्या एकांकिकांमधून एक एकांकिका मुंबईतील महाअंतिम फेरीत औरंगाबाद केंद्राचे प्रतिनिधित्त्व करेल.

१५ एकांकिकांमधून पाच उत्कृष्ट एकांकिकांची निवड विभागीय अंतिम फेरीसाठी करण्यात आली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्यशास्त्र विभागाची ‘भक्षक’, नाटय़शास्त्र विभागाची ‘देवदासी’, बीडच्या एस. के. एस. महाविद्यालयाची ‘भोग’, तसेच जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयाची ‘साधूच्या डोहात’ व रायसोनी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या ‘आसुसलेला दोरखंड’ या एकांकिकांचा समावेश आहे.