ट्रॅक्टरच्या चोरीचा बनाव करून विम्याची रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी धडपडणारा फिर्यादीच अखेर आरोपी निघाला! शेतजमिनीत ट्रॅक्टर गाडून त्याच्या विम्याची रक्कम मिळविण्यासाठी ट्रॅक्टर चोरी झाल्याची तक्रार परंडा तालुक्यातील वाकडी येथील शेतकऱ्याने दिली होती. तपासाअंती मातीत गाडलेला ट्रॅक्टर सापडल्यामुळे हा बनाव चव्हाटय़ावर आला.
वाकडी येथील शेतकरी बालाजी ज्ञानदेव बानगुडे-पाटील यांनी ५ नोव्हेंबरला परंडा पोलीस ठाणे गाठून ६ लाखांचा ट्रॅक्टर (एमएच २५ एडी २४१) चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. तीन महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या ट्रॅक्टरला कामे मिळत नसल्याने शेतवस्तीवर लावला होता. मात्र, अनोळखी व्यक्तींनी तो लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक निरीक्षक सुरेश सिरसट यांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली.
ट्रॅक्टर लावलेल्या घटनास्थळाच्या परिसराची सोमवारी पाहणी करतेवेळी बाजूलाच एका ठिकाणी लावलेले अँगल, त्यावर टाकलेल्या काटाडय़ा, काठय़ा, लाकडे व जागेची रुंदी पाहता या ठिकाणी ट्रॅक्टर गाडला असल्याचा संशय बळावला. पोलिसांनी तत्काळ जेसीबी मागवून घेत संबंधित ठिकाणावरील साहित्य काढून खोदकाम सुरू केले. जेसीबीने खोदकाम करताच चोरीस गेलेला ट्रॅक्टर जमिनीत पुरल्याचे दिसून आले. या प्रकाराने खळबळ उडाली व चच्रेला ऊत आला.
वाकडी येथील बालाजी बानगुडे-पाटील यांनी ट्रॅक्टरवरील विम्याची रक्कम उचलण्यासाठी हा बनाव रचल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या चोरी प्रकरणाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपास अधिकारी सहायक निरीक्षक सुरेश सिरसाट यांच्यासह बी. पी. वाहिल, एस. आर.चौधरी,  एस. आर. क्षीरसागर आदींनी ही कामगिरी बजावली.
ग्रामीण भागात अनेक ट्रॅक्टर उभेच
शेतीस जोडधंदा म्हणून ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी मोठय़ा उत्साहाने ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. मागील ३ वर्षांपासून दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे अनेकांचा ट्रॅक्टरचा व्यवसाय आतबट्टय़ाचा ठरू लागला आहे. खासगी कर्जपुरवठा कंपन्यांकडून कर्जाने घेतलेल्या ट्रॅक्टरचे हप्ते आणि गुणाकाराच्या पद्धतीने वाढत जाणारा व्याजाचा आकडा ग्रामीण भागात अनेक तरुणांच्या अंगलट आला. नापिकी, गारपीट, दुष्काळामुळे निर्माण झालेले प्रश्न, त्यात विनावापर पडून असलेले ट्रॅक्टर यामुळे नवीन गुंता निर्माण होऊ लागला आहे. ही आíथक परिस्थिती बदलावी आणि रोजगाराच्या प्रभावी संधी मिळाव्यात, म्हणून सुरू केलेला व्यवसायच आता शेतकऱ्यांना आरोपीच्या िपजऱ्यात उभा करू लागला आहे.