गर्दी वाढल्यास घाटशीळ मार्गावर दर्शनरांग

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मागील पंधरा दिवसांपासून तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे रस्त्यांची डागडुजी, दर्शन रांगेसाठी बॅरिकेटिंग, भवानी कुंडाची स्वच्छता आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत. उद्या होणाऱ्या घटस्थापनेच्या एक दिवस अगोदरच मंदिर प्रशासन, व्यापारी आणि नगरपालिकेने भाविकांच्या सेवेसाठी कंबर कसली आहे.

तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सव एक दिवसावर येऊन ठेपला आहे. नवरात्रात तुळजापूरला कर्नाटकातून हजारोंच्या संख्येने भाविक पायी चालत येतात. होणाऱ्या गर्दीच्या पाश्र्वभूमीवर मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आढावा घेतला. भाविकांची गरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मंगळवारी एकाच रात्री महाद्वारासमोर दर्शन रांगेसाठी झिगझग बॅरिकेटिंग उभारण्यात आले आहे. याशिवाय दर्शन व्यवस्थेचा अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, मुख्याधिकारी राजीव बुबणे, नगर अभियंता फारूकी हे वेळोवेळी आढावा घेत आहेत. नवरात्रोत्सवात भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी दर्शन रांगेकडे व मंदिराकडे जाण्याचे दिशादर्शक फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. मराठीबरोबरच कन्नड, इंग्रजी भाषेतील फलकामुळे भाविकांची सोय होणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून एक ते दीड फुटांचे खड्डे पडले होते. ते आता बुजवण्यात आले आहेत. गर्दीच्या कालावधीत भाविकांना घाटशीळ रोडमाग्रे मंदिरात सोडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या मार्गावरही वाहनतळ येथील तयारी वेगात सुरू आहे. वाहनतळावर भाविकांच्या वेगवेगळ्या रांगा तयार करण्यात आल्या आहेत.

पावसापासून भाविकांचे संरक्षण होण्यासाठी निवाऱ्यासाठी छतावर पत्रे टाकण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी विश्रांती कक्ष बांधण्याचे कामही सुरू आहे. मोठय़ा संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी प्राधिकरणातून नव्याने बांधण्यात आलेल्या भवानी कुंड अथवा बीडकर तलाव येथील साफसफाईचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. भवानी कुंड येथे एकाच वेळी हजारो भाविकांच्या अंघोळीची सोय करण्यात आली आहे.