भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा स्वीय सहाय्यक असल्याच सांगत अनेकांना गंडा घालणाऱ्या गणेश बोरसेने  राजकीय नेत्यांच्या  नावाचा वापर करुन अनेकांना लुबाडल्याच पोलीस तपासात समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या नावानेही त्याने अनेकांना गंडा घातल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या व्यतिरिक्त अनेक राजकीय नेत्यांच्या नावाचा त्याने गैरवापर केला आहे.

बोरसे मागील ९ वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांशी जवळच संबंध असल्याचं भासवत अनेकांची फसवणूक केली.  त्याने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना टोपेंच्या नावाचा गैरवापर करत जवळ जवळ अडीच कोटी रुपये उखळल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अजय आणि गणेश अशी त्यांची नावं आहेत. अजय उर्फ विक्की गवळी याला बुलढाणा, तर गणेश पवार याला साताऱ्यातील कराडमधून ताब्यात घेण्यात आलं.

बोरसे अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्ती प्रक्रियेसाठी  पैशांची देवाण-घेवाण करत असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी  दिली होती. या प्रकरणात सरकारी वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. तर बोरसेला अटक झाल्यानंतर दानवे यांनी त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे बनावट लेटरहेड बनवले असल्याची माहिती दिली होती.