नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अधिकची कलमे लावू नयेत आणि जामीन रद्द होऊ नये, या साठी तक्रारदाराला तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागून अखेर २५ हजार रुपये घेताना पोलीस हवालदार संजय रामराव फड याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडले. महिनाभरापूर्वीच पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील कर्मचाऱ्याला ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडले होते, तर ‘अर्थ’पूर्ण कारवाई केल्यामुळे ५ पोलिसांना दोनच दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले. लागोपाठच्या घटनांमुळे पोलीस दलातील खाबुगिरी चव्हाटय़ावर आल्याने पोलीस दलाची प्रतिमाच मलिन होऊ लागली आहे.
जिल्हा पोलीस दलात अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक कारवाई ‘अर्थ’पूर्ण दृष्टिकोनातूनच केली जात असल्याची चर्चा मोठय़ा प्रमाणात उघड होते. या चच्रेला पुष्टी मिळावी, अशाच घटना महिनाभरात उघडकीस आल्या आहेत. अधीक्षक अनिल पारसकर यांची शांत व स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी ओळख असली, तरी पोलीस दलातील खाबुगिरी मात्र बोकाळली आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश गावडे यांच्या पथकातील मुरली गंगावणे या कर्मचाऱ्याला मटका बुकी चालकाकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच िपपळनेर परिसरातील नाळवंडी येथे पत्त्याच्या अड्डय़ावर छापा टाकून जप्त केलेल्या ६४ हजारांपकी केवळ ९ हजार रुपयेच दाखवून पोलिसांनी हात ओले करून घेतल्याचे समोर आले. वरिष्ठांची परवानगी न घेता परस्पर कारवाई करून ‘अर्थ’पूर्ण व्यवहार केल्याप्रकरणी अधीक्षकांनी पाच पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले. ही कारवाई ताजी असतानाच गुरुवारी सकाळी नेकनूर ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल संजय रामराव फड याला बसस्थानक परिसरात तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. नेकनूर ठाण्यात दाखल गुन्ह्यातील कलम वाढवू नये आणि जामीन रद्द होऊ नये, या साठी फड याने तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत २५ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर गुरुवारी सापळा लावून त्याला पकडण्यात आले. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.