रिपाइंच्या वर्धापनदिनानिमित्त येथे उद्या (शनिवारी) भाजप महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते एका व्यासपीठावर येत असून रिपाइंच्या महामेळाव्यातून घटक पक्ष सत्ताधारी भाजपला कोणता इशारा देतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. रिपाइंने महामेळाव्यासाठी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांच्यासह अनेक पक्षांच्या दिग्गजांना निमंत्रित केले आहे. त्यामुळे रिपाइंच्या महामेळाव्याला कोण कोण हजेरी लावणार, कोण काय बोलणार याकडेच सर्वाचे लक्ष लागले आहे.
खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचा ५८ वा वर्धापनदिनाचा कार्यक्रम येथील पंचशीलनगर भागातील सर्कस ग्राऊंडवर होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह घटक पक्षांचे नेते रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या महामेळाव्याची जय्यत तयारी मागील महिन्यापासून सुरू आहे. महामेळाव्यास गर्दी जमवून, घटक पक्षांच्या नेत्यांना एका व्यासपीठावर आणून भाजप सत्ताधाऱ्यांना ताकद दाखवण्याचा प्रयत्न रिपाइंकडून केला जात आहे.
भाजपबरोबर महायुतीत सामील झालेल्या दोन घटक पक्षांची केवळ आमदारकीवर बोळवण करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर मागील काही दिवसांपासून घटक पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांना इशारा देणे सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी रासपचे आमदार महादेव जानकर यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारल्यानेही चर्चा रंगली होती. त्यामुळे रिपाइंच्या महामेळाव्यात घटक पक्षांचे नेते सरकारला आता कोणता नवा इशारा देतात, याकडे लक्ष लागले आहे. रिपाइंने मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. मात्र, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का, या बाबतची अधिकृत माहिती शुक्रवारी सायंकाळपर्यंत मिळू शकली नाही. मेळाव्याला सत्ताधारी व घटक पक्षांचे कोण नेते उपस्थित राहणार, याकडेही सर्वाचे लक्ष आहे. मेळाव्यास एक लाखापेक्षा अधिक लोक येतील, असा दावा संयोजक रिपाइं युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केला.