राज्यातील नामवंत अशा राजर्षी शाहू महाविद्यालयात भरदुपारी शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांच्या समोर प्रचंड मारहाण झाली. आयुष्यात पहिल्यांदाच अशी थेट एखाद्या इसमास अनेकजण अमानुष मारहाण करत असल्याचे दृश्य कोवळय़ा मुला, मुलींनी पाहिले अन् ते पुरते भेदरून गेले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून अकरावी व बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. एखादा हाणामारी असलेला चित्रपट पाहणे व प्रत्यक्षात अचानकपणे एखाद्या इसमास अनेकजण निर्दयीपणे मारत असल्याचे दृश्य पाहणे यात प्रचंड फरक आहे. माहिती अधिकार कार्यकत्रे भाईकट्टी यांना ज्यांनी मारहाण केली त्यांचा हेतू काय? हा स्वतंत्र विषय आहे. मारहाण करणाऱ्यांना सुपारी दिली की त्यांनी स्वयंस्फूर्तीने उचलून आणून मारहाण केली? हेही प्रश्न भिन्न आहेत. एखाद्या व्यक्तीस आपल्या महाविद्यालयात आणून का मारले जात आहे? महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, सेवक, संस्थेचे सदस्य हा प्रकार उघडपणे पहात आहेत. कोणीही मारामारी सोडवायला जात नाही. याचे नेमके कारण काय? हेही मुलांच्या लक्षात येत नाही. शुक्रवारी दुपारी शेकडो मुले, मुली या प्रकारामुळे अस्वस्थ होते. अनेकांच्या डोळय़ातून घळाघळा पाणी येत होते. मारहाण ज्याला होत आहे तो कोणीही असो. मात्र, त्याला वाचवले पाहिजे ही भावना अनेक मुला, मुलींच्या मनात होती. आपल्याला ते धाडस होत नाही याबद्दल अपराधी भावना त्यांच्या मनात मोठय़ा प्रमाणावर होती.
या घडल्या प्रकारानंतर अशी अस्वस्थ मुले, मुली महाविद्यालय अर्धवट सोडून घरी गेले. दुसऱ्या दिवशी अनेक मुले महाविद्यालयात जायलाच तयारी नव्हती. नको ते शिक्षण अशी भावना त्यांच्या मनात होती. काही मुले तर रात्री दचकून जागी होत होती. काहीजणांनी भाईकट्टी यांना कोणत्या रुग्णालयात दाखल केले आहे त्याची माहिती घेऊन तेथे रांगा लावून भेटून त्यांना सहानुभूती व्यक्त केली. भेदलेल्या या मुलांचे जे मानसिक नुकसान झाले आहे ते कोण भरून काढणार? महाविद्यालय हे शिक्षणाचे पवित्र केंद्र आहे अशी समजूत ज्या मुलांच्या मनात होती तिला बसलेला धक्का कोण दूर करणार? या मुलांना आयुष्यात ज्या समस्यांना सामोरे जावे लागेल त्याची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
संवेदनशील मुलांवर गंभीर परिणाम  डॉ. पोतदार
लातूर शहरातील प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मििलद पोतदार यांना शाहू महाविद्यालयात घडलेल्या प्रकारामुळे मुलांच्या मनावर नेमका काय परिणाम होतो? याविषयी विचारले असता ते म्हणाले, अकरावी, बारावीची शाहू महाविद्यालयातील मुले ही कोवळय़ा वयाची आहेत. त्यातही ९५ टक्केपेक्षा अधिक गुण घेणारी ही मुले केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारी आहेत. बाहेरच्या जगात नेमके काय चालते ? याबाबत ते पूर्णपणे अनभिज्ञ असतात. अचानकपणे त्यांनी ही मारहाण पाहिल्यानंतर काही अतिसंवेदनशील मुलांच्या असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यातही मुलींमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलीत होऊ शकते. रात्री-बेरात्री घाबरून उठण्याचे प्रसंग घडू शकतात. त्यांच्या मनावर दीर्घकाळ नकारात्मक परिणाम टिकून राहतो. सामाजिक कार्यकर्त्यांनी या सर्व बाबींचा विचार एखादी कृती करताना करायला हवा, असे मत डॉ. पोतदार यांनी व्यक्त केले.