शीर्षक पाहून आश्चर्य वाटलं ना? ही आहे अशी गंमत.. कदाचित ती अनेकांना माहीत नसेल. आणि हा लेख वाचून झाल्यावर ते वरील प्रश्न विचारतील म्हणून आम्ही असं शीर्षक दिलंय. मित्रांनो, तुमच्या घरात किंवा शाळेत असं नक्कीच घडत असणार! तुमची आणि तुमच्या भावंडांची किंवा मित्रमत्रिणींची अभ्यासाची पद्धत नक्कीच वेगवेगळी असणार. कोण म्हणत असणार- मी वाचलं की लक्षात राहतं. तर कुणाचं मत असणार की- मी लिहिलं की कधीच विसरायला होत नाही. कुणी या सगळ्याला विरोध करत म्हणणार की- मला बुवा लेक्चर्स ऐकल्यावर चांगलं लक्षात राहतं. हे सगळं असं असतं म्हणून तर तुमचे शिक्षक वर्गात शिकवत असताना बोलत असतात. बोलता बोलता फळ्यावर लिहितात. कधी तुम्हाला वहीत लिहायला सांगतात, तर कधी तुमच्याकडून फळ्यावर लिहून घेतात. अनेकदा ते वर्गात किंवा प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकं करून घेतात. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे आपल्या शिकण्याच्या वेगवेगळ्या तीन पद्धती! कुणी पाहून शिकत असतो, कुणी ऐकून शिकत असतो, तर कुणी कृती करून शिकत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती फक्त एकाच प्रकारे शिकणारी नसते, पण शिकण्याच्या एका पद्धतीचं वर्चस्व तिच्यामध्ये असतं. पुढच्या काही लेखांकांमध्ये आपण याविषयीच सविस्तर चर्चा करणार आहोत. आपली अध्ययन पद्धती मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे ते कसं शोधायचं?

हो, हो, मला माहीत आहे त्यासाठी टेस्टस् असतात. त्या टेस्टस् सर्वाना उपलब्ध होणं शक्य नाहीत. म्हणूनच तर आपणच आपलं निरीक्षण करून शोधू या नं आपली अभ्यास पद्धती! यासाठी पुढील लेखांक तर वाचाच, पण आजपासून टी.व्ही. पाहिल्यानंतर एक सुरुवात करा. टी.व्ही. मालिकेतील डायलॉग्ज किंवा गाण्याचं संगीत तुमच्या लक्षात राहतं, की त्यातले सीन्स किंवा पात्रांची वेशभूषा तुमच्या डोळयांसमोर उभी राहते; की मालिकेतील पात्रांचा अभिनय किंवा त्यांच्यासारखे हातवारे वगरे करून बोलायला तुम्हाला मजा येते. आजपासून हे सुरू करा आणि पुढच्या भेटीला तयार राहा.

मेघना जोशी
joshimeghana.23@gmail.com