साहित्य- रिकामी छोटी प्लॅस्टिकची बाटली, कोरडी वाळू, ग्लासभर पाणी.
कृती- प्रथम रिकाम्या बाटलीमध्ये पाऊण बाटली भरेल एवढी वाळू भरा. वाळू भरताना इकडे तिकडे सांडू नये म्हणून फनेलचा वापर करा. आता ग्लासमधील पाणी हळूहळू बाटलीत ओता. बाटलीतील वाळू पूर्ण भिजून वाळूच्या वरच्या बाजूला थोडेसेच (१-२ चमचे) पाणी जमा होईल एवढे पाणी बाटलीत ओतायचे आहे. आता वाळू आणि पाणी भरलेली बाटली अंगठय़ाच्या साहाय्याने मध्यात दाबा. बाटली दाबल्यावर पाणी वरच्या बाजूला सरकेल असे आपल्याला वाटते. पण आपल्या अपेक्षेप्रमाणे असे न होता बाटलीतील पाणी गायब झाल्याचे दिसेल.
आता बाटली दाबलेली असतानाच ती उलटी करा. असे करूनही पाणी बाहेर पडत नाही.
असे का होते?
बाटलीमध्ये कोरडी वाळू भरल्यावर वाळूच्या कणांच्या एकमेकांशी सूक्ष्म रचना बनलेल्या असतात. वरून पाणी ओतल्यावर यापैकी काही रचनांमधील पोकळीत पाणी शिरण्यास वाव नसतो. त्यामुळे जास्तीचे पाणी वर आलेले दिसते. आपण बाटलीच्या मध्यावर दाब दिल्यावर पोकळी असलेल्या वाळूंमधल्या रचना तुटतात आणि तेथील पोकळींमध्ये पाण्याला शिरण्यास वाव मिळतो. व बाटलीत वरती राहिलेले थोडे पाणी शोषले जाते. म्हणूनच बाटली दाबून ती उलटी केल्यास पाणी खाली सांडत नाही.
हा प्रयोग तुम्ही https://www.youtube.com/ watch?v=Oezu85CPeXg या लिंकवर पाहू शकता.
मनाली रानडे – manaliranade84@gmail.com