मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय तसेच राज्य मंत्र्याचा समावेश असलेली २९ जणांची निवडणूक समिती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी या समितीची घोषणा रविवारी केली.

महापालिका निवडणुकीची तयारी, व्यवस्थापन, प्रचार साहित्य व वाटप, प्रचारसभा तसेच उमेदवारांची निवड आणि निवडणुकीच्या जाहीरनाम्यासह सर्व जबाबदारी या समितीवर असणार आहे.

आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता, विद्या ठाकूर, खासदार गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या, पूनम महाजन, आमदार अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा, योगेश सागर, भाई गिरकर, राज पुरोहित, संघटनमंत्री सुनील कर्जतकर, मुंबई भाजपचे महामंत्री सुनील राणे, आमदार प्रवीण दरेकर, राम कदम, अतुल शहा, मधु चव्हाण यांच्यासह २९ सदस्यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या पारदर्शी कारभारासाठी ‘पारदर्शी’ जाहीरनामा बनविण्याच्या कामावरही या समितीची नजर असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेचा कारभार पारदर्शी असला पाहिजे, अशी भूमिका मांडत अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या कारभारावर टीका केली.

यापूर्वीही पालिकेचा अर्थसंकल्प ३७ हजार कोटी रुपयांचा असताना विकासकामे पुरेशा प्रमाणात झाली नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी भाजपची वाट वेगळी असेल असे सूचित केले होते. आता केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांचा निवडणूक समितीत समावेश करून भाजपने मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याची जोरात तयारी सुरू केली आहे.