‘हा माझा शब्द आहे’ ची कसोटीजिंकली!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाचे स्वप्न दाखविले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विकासाच्या संकल्पना ‘व्हिजन डॉक्युमेंट’च्या माध्यमातून मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी व  फडणवीस यांच्यावरच तोफ डागली. ‘हा माझा शब्द आहे,’ असे सांगून स्वतची प्रतिष्ठा पणाला लावलेल्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीची ही कसोटीजिंकली आणि नगरपालिकेतील यशानंतर या निवडणुकांमध्येही ‘करून दाखवले,  पुन्हा एकदा..’ याचा प्रत्यय दिला.

राज्यात भाजपची सत्ता आल्यावर फडणवीस यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आली. पक्षातील अनेकांनाही त्यांच्या नेतृत्वाबद्दल शंका होत्या. सरकारी तिजोरीतील खडखडाट, सातत्याने पडलेले दुष्काळ या आव्हानांचा मुकाबला करीत असताना जलयुक्त शिवारसारख्या योजना राबवीत ग्रामीण भागात काम केले. मराठा समाजाच्या मोच्र्यामुळे राज्यात जातीय ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले आणि मोठा पेच निर्माण झाला. मात्र तोही प्रश्न फडणवीस यांनी यशस्वीपणे हाताळला. त्यानंतर नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचा पाय रोवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्याला अपेक्षित यश मिळून पक्षश्रेष्ठींचे ‘संसदेपासून पंचायतीपर्यंत’ हे सूत्र राज्यात साकारले.

मुंबई महापालिकेसह राज्यातील पालिका व जिल्हा परिषदांची निवडणूक ही ‘मिनी विधानसभा’ अशी चुणूक दाखविणारी होती. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई-ठाण्यात आव्हान देणे हे सोपे नव्हते. शिवसेनेनेच युती तोडल्याने भाजपला हे आव्हान पेलावे लागले. ‘पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभार’ या सूत्राची ढाल करीत फडणवीस यांनी आशीाष शेलार व किरीट सोमय्या या शिलेदारांसह शिवसेनेवर हल्ला चढविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची कामगिरी जनतेपुढे मांडत मेट्रो रेल्वे प्रकल्पांसह मुंबईच्या विकासाच्या संकल्पना फडणवीस यांनी मुंबईकरांना साद घातली. फडणवीस यांनी ‘हा माझा शब्द आहे,’ अशी प्रचार मोहीम शेवटच्या टप्प्यात राबवून  मुंबईच्या विकासाच्या संकल्पना साकारण्याची हमी दिली. फडणवीस यांच्या शब्दावर मुंबईकर किती विश्वास ठेवतील हा प्रश्न होता. पण लोकसभा-विधानसभेत ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्या नावे मते मागण्यात आली. त्याच पद्धतीने भाजपने फडणवीस हे नागपूरकर असले तरी त्यांचा चेहरा मुंबईकरांसमोर ठेवून मते मागण्याची केलेली राजकीय खेळी यशस्वी ठरली.