मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय भाजपसाठी फायदेशीर ठरला आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असलेल्या नऊपैकी आठ महापालिकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे.

मुंबईत एक सदस्यीय प्रभाग पद्धती होती, पण अन्य नऊ महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत होती. चार प्रभाग रचनेनुसार प्रभागांचा आकार वाढला. परिणामी एका प्रभागात वर्चस्व असलेल्या राजकीय पक्षांना त्याचा फटका बसला. २००२ मध्ये विलासराव देशमुख सरकारने, तर २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने महापालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. फडणवीस सरकारने चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली. काँग्रेस सरकारच्या काळातील द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीचा काँग्रेस व राष्ट्रवादीला फायदा झाला होता. यंदा भाजपला त्याचा फायदा झाला. शहरी भागांमध्ये मोठे प्रभाग झाल्याने त्याचा फायदा भाजपने उठविला. शहरी, सुशिक्षित तसेच पांढरपेशांचे वर्चस्व असलेल्या प्रभागांमध्ये भाजपने एकहाती यश मिळविले आहे.

पुण्यात टिळकनगर अथवा ठाण्यातील नौपाडा ही त्याची उदाहरणे आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातही बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळेच भाजपला यश मिळाले. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना भाजपने आयात केले. मग गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांनाही भाजपने प्राधान्य दिले. यावरून भाजपवर बरीच टीकाही झाली; पण शेवटी निवडणुकीच्या राजकारणात भाजपला त्याचा फायदा झाला आहे.