कामतांकडून मोहन प्रकाश, निरुपम यांच्यावर टीका

मुंबई काँग्रेसमधील गटबाजी कमालीची टोकाला गेल्याने निवडणुकीच्या तोंडावर ती आटोक्यात येणे कठीण असून, उमेदवारीवरून आणखी वाद वाढण्याची चिन्हे आहेत. पक्षाने नेमलेले निरीक्षक भूपिंदरसिंग हुड्डा यांनी उद्या सर्व नेत्यांची बैठक बोलाविली असतानाच गुरुदास कामत यांनी मंगळवारी पुन्हा राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर तोफ डागली.

संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आतापर्यंत चार जणांनी पक्ष सोडला आहे. आणखी किती जण पक्ष सोडणार, असा सवाल अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस गुरुदास कामत यांनी केला. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यावर निशाणा साधताना कामत यांनी, राजस्थानचा प्रभारी म्हणून उदयपूरला आंदोलनासाठी जात आहे, तेथे मूळचे राजस्थानचे असलेल्या मोहन प्रकाश यांनाही निमंत्रित केले आहे. राजस्थान आणि मुंबईत मोहन प्रकाश यांना बघितलेलेच नाही, असा सूरही कामत यांनी लावला. मोहन प्रकाश आणि निरुपम यांना लक्ष्य करण्याची संधी कामत अजिबात सोडत नाहीत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाने हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांची नेमणूक केली आहे. कामत आणि निरुपम यांच्यात समेट घडवून आणण्याची जबाबदारी हुड्डा यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

हुड्डा यांच्यावर जबाबदारी

स्वत: हुड्डा यांनी हरयाणामध्ये प्रदेशाध्यक्षाला हटविण्याकरिता आघाडीच उघडली आहे. तसेच अध्यक्षाला मारहाण करण्यामागे हुड्डा यांचाच हात होता. असे हे हुड्डा उद्या सर्व गटांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. कामत यांचा एकूणच सूर लक्षात घेता ते माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत हे स्पष्ट आहे. तसेच उमेदवारांची नावे जाहीर झाल्यावर आणखी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कामत गट विरोधात भूमिका घेणार हे गृहीत धरून निरुपम यांनीही व्यूहरचना केली आहे.

कामत आणि निरुपम यांच्यातील वादाबद्दल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. मतभेद असल्यास ते चार भिंतीत राहावेत, असा सल्ला चव्हाण यांनी दोन्ही नेत्यांना दिला आहे.

बैठकीला नेते गैरहजर

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लातूर, नांदेड, हिंगोली, वर्धा, गडचिरोली या जिल्हय़ांमधील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीस अनेक नेत्यांनी दांडी मारली.