‘साहेब, समोरचा उमेदवार तगडा आहे.. आपणही जोरात आहोत, पण पैशाला कमी पडतो.. थोडं काम झालं तर विजय नक्की आहे!’.. ‘ठीक आहे, मी बोलतो, खासदार कोकणातच आहेत, ते वेलची पाठवून देतील!’ ..कडक आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी थेट ‘व्हिटॅमिन एम’ म्हणजे पैशाच्या व्यवहाराला वेगवेगळ्या नावांनी ‘चलनात’ आणायला सुरुवात केली आहे.. वेलची, खजूर, काजू, लाडू, झेंडा, बिल्ले अशी वेगवेगळी रूपके वापरून ‘लक्ष्मीदर्शना’चे व्यवहार सुरू झाल्याने, ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडेनासाच झाला आहे..  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केल्यामुळे अनेक राजकीय पक्षांची गोची झाली आहे. केवळ भाजपकडेच आता पैसा असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. बँकांमधून हा पैसा फिरवला जात असल्याचा आरोपही भाजपवर राजकीय नेते करत असून भाजपच्या उमेदवारांकडे मोठय़ा प्रमाणात पैसा असल्याची टीका होत आहे. असे असले तरीही सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीत  पैसे खर्च करावेच लागतात. कार्यकर्त्यांच्या खानपान सेवेपासून झोपडपट्टय़ांमध्ये व मंडळांना लक्ष्मीदर्शन घडवावे लागत आहे. मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीत भाडय़ाच्या कार्यकर्त्यांची चलती आहे. अनेक ठिकाणी गुंडांच्या माध्यमातून झोपडपट्टय़ांमधून भाडय़ाने प्रचारासाठी, गर्दी दाखविण्यासाठी माणसे आणली जात आहेत. कोणे एके काळी वडापाव खाऊन आणि चटईवर झोपून कार्यकर्ते प्रचारात झोकून द्यायचे.. आता रात्रीची ‘झोकल्या’शिवाय कार्यकर्ते मिळणे मुश्कील असल्याचा अनुभव बहुतेक पक्षांचे उमेदवार घेत आहेत. निवडणुकीचे दिवस सुगीचे आहेत, कार्यकर्ते ‘झोकून देऊन’ काम करतील असे पाहा, असा संदेशही स्थानिक नेत्यांना दिला गेला आहे. जे काय करायचे ते आत्ताच निवडणुकीनंतर, नंतर आपल्याला कुणीच विचारणार नाही, याची कल्पना असल्यामुळे ‘कार्यकर्त्यांचे’ भाव वधारले आहेत. परंतु पैसा आणायचा कोठून हा खरा प्रश्न उमेदवार तसेच पक्षांपुढे पडला आहे.

बहुतेकांनी तर उधारीवर आपापल्या परिसरातील हॉटेलवाल्यांकडे कार्यकर्त्यांच्या ‘रात्री’च्या ‘दवापाण्या’ची व्यवस्था केली आहे. वाइन शॉपमध्येही उधारीवर कार्यकर्त्यांना दारू उपलब्ध करून दिली जाते. त्यातही कार्यकर्त्यांच्या दर्जाप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या रंगांची कार्डे दिली जातात. ज्या रंगाचे कार्ड असेल त्या किमतीची दारू कार्यकर्त्यांला दुकानदाराकडून दिली जाते. अर्थात उमेदवार विजयी झाला नाही तर आपल्या पैशाचे काय होणार ही चिंता या दुकानदारांना सतावताना दिसते. एका उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडील कार्डावर ‘काजू’ लिहिले होते. याचा अर्थ त्याला चांगल्या दर्जाची दारू मिळणार होती. चणे, फुटाणे, शेंगदाणे अशा नावांनीही वाइन शॉपमध्ये कार्यकर्त्यांची व्यवस्था फोनवरून केली जाताना दिसते. ज्या उमेदवाराकडे बक्कळ पैसा आहे तो थेट बारमध्येच निवडक कार्यकर्त्यांची व्यवस्था करतो, परंतु कार्यकर्त्यांना ‘सोमरसा’चे पान करविल्याशिवाय कोणत्याच पक्षाच्या उमेदवारांची सुटका होताना दिसत नाही.

पक्षाकडून निवडून येणाऱ्या उमेदवारांना निधीवाटप या वेळी काळजीपूर्वक केले जात आहे. यासाठी वेलची पाठवली.. झेंडे पाठवत आहे.. त्या दुकानातून एक किलो खजूर घेऊन जा.. दोन किलो ओले काजू हवेत.. अशा प्रकारच्या निरोपांची देवाणघेवाण जोरात सुरू आहे.

 

दाम, दारू, दुकानदारी!

राज्यातील १० महापालिका, जिल्हा परिषदा, तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने चित्तचक्षुचमत्कारी अशा दृश्यांचा, जबरदस्त संवादांचा, आगळ्याच पाश्र्वसंगीताचा समावेश असलेली दाम.. दारू.. दुकानदारी ही मालिका महाराष्ट्रभर पसरलेल्या ७० एमएम पडद्यावर विलक्षण गाजत असून, येत्या २१ तारखेपर्यंत या मालिकेचे भाग दिवसरात्र बघण्याची संधी राजकीय कलावंतांनी मतदारांना उपलब्ध करून दिली आहे. नोटाबंदीच्या सेन्सॉरनंतरही विविध ठिकाणी, वेलची, खजूर अशा आकर्षक, मात्र सांकेतिक शब्दांची पखरण असलेले दाम करी काम वेडय़ा, हे गाणे या मालिकेतील विशेष आकर्षण ठरते आहे. तर, मतदानाच्या सुमारास असलेल्या तीन दिवसांच्या ड्राय डेमुळे आपले नुकसान होत असल्याची तक्रार करीत बारमालकांनी न्यायालयात धाव घेतल्याने या मालिकेला कोर्टड्राम्याची फोडणी मिळाली आहे. त्याचवेळी, आपल्या पिताश्रींनी निभावलेली भूमिका पिढीजात वारशाने आपल्याला मिळाल्याचे सांगत, ही नव्हे दुनियादारी.. ही तर दुकानदारी, हा या मालिकेतील आकाश राज पुरोहित यांचा नाटय़पूर्ण संवाद चर्चेचा विषय झाला आहे. मात्र, या पाश्र्वभूमीवर, बेकायदा राजकीय फलकबाजीवर तातडीने कारवाई करा, असे आदेश न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्तांना बजावल्याने आपल्या इतर मालिकांची जाहिरात कशी होणार, अशी चिंता राजकीय कलावंतांना लागली आहे.