‘जिंकलो रे जिंकलो’च्या आरोळ्या सध्या मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईच्या महाविद्यालयांमधून ऐकू येत आहेत. प्रचंड मेहनत, जिंकण्याची ईर्षां, प्रतिस्पर्धी स्पर्धकांचे तगडे आव्हान अशा वातावरणात मुंबई विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सवी युवा महोत्सव मुंबईत पार पडत आहे. चर्चगेटमधील विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनात शाहीर अमर शेख सभागृहात युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली आहे. यानिमित्त प्राथमिक फेरीचे अग्निदिव्य पार करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या महाविद्यालयांच्या तालमींनी जोर पकडला आहे. रात्रंदिवस सध्या तयारी सुरू आहे. युवा महोत्सवाचे यंदाचे ५० सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यंदा शिवाजी नाटय़ मंदिर, दीनानाथ नाटय़गृहाच्या रंगमंचावर कला सादर केली जाणार आहे. ६ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या अंतिम फेरीच्या लढाईत कोणत्या महाविद्यालयाच्या पारडय़ात अधिक पदके पडतील, याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ही मेनका

जोशी-बेडेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकत असलेल्या निधी प्रभू हिने कथ्थक नृत्य सादर केले. शास्त्रीय नृत्य स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘मेनका’ स्मृतिचिन्हावर गतवर्षी नाव कोरले. गुरुवारी पार पडलेल्या बक्षीस समारंभात सन्मानपूर्वक हे स्मृतिचिन्ह निधीला प्रदान करण्यात आले. गुरू मंजिरी देव व प. मुकुंदराज देव यांच्याकडून निधी कथ्थक नृत्याचे शिक्षण घेत आहे. मुंबईमधील मानाच्या समजल्या जाणाऱ्या प. विष्णुशास्त्री पलुस्कर पुरस्कार तसेच स्वरसाधना पुरस्कार तिला मिळाले असून यंदाच्या वर्षी भारत सरकारची सांस्कृतिक शिष्यवृत्तीची निधी मानकरी ठरली आहे. आई-वडिलांचा पाठिंबा आणि गुरूंचे मिळालेले उत्तम मार्गदर्शन यामुळेच ‘मेनका’ मिळवण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे निधी सांगते. यापुढेही नृत्यामध्ये करिअर करण्याचा तिचा मानस आहे.

सवरेत्कृष्ट अभिनेता

गतवर्षीच्या युवा महोत्सवाच्या नाटय़ विभागातील सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पारितोषिक विजेता विशाल चव्हाण याचाही सन्मान गुरुवारी करण्यात आला. विशाल जोशी-बेडेकर महाविद्यालयात शिकत असून गेल्या वर्षी त्याने महाविद्यालयाच्या ‘कडमिंचे’ या एकांकिकेत काम केले होते. शालेय जीवनात विशालला नाटक पाहण्याची आवड होती, पण प्रत्यक्ष नाटक अनुभवण्याची आणि त्यामध्ये काम करण्याची संधी त्याला महाविद्यलयात प्रवेश केल्यानंतरच मिळाली. या संधीचे सोने करीत त्याने गेल्या वर्षी सर्वोकृष्ट अभिनयाचे सुवर्णपदक आपल्या नावे केले. याच ईर्षेने यंदाही विशाल युवा महोत्सवात सहभागी झाला आहे. नाटकात काम करून आपण इतर सामान्य माणसांपेक्षा वेगळे आहोत याची जाणीव होते, असे विशाल सांगतो.

सन्मान

मुंबई विद्यपीठातर्फे सुवर्णमहोत्सवी युवा महोत्सवाच्या महाअंतिम फेरीचे गुरुवारी जल्लोषात उद्घाटन सोहळा मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभ सभागृहात पार पडला. तसेच गतवर्षीच्या म्हणजेच ४९व्या युवा महोत्सवाचा बक्षीस समारंभदेखील पार पडला. या सोहळ्याला पद्मभूषण कनक रेळे, गायक शंकर महादेवन, अभिनेते मनोज जोशी, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे इत्यादी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. नृत्य, नाटय़, वाङ्मय, ललितकला आणि संगीत या पाच वर्गवारीतील एकूण ४२ स्पर्धा या प्राथमिक फेरीच्या स्वरूपात ११ विभागांतून आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धामध्ये २६८ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यावर्षीचे वैशिष्टय़े म्हणजे ज्येष्ठ चित्रकार दत्ता पाडेकर यांनी तयार केलेल्या युवा महोत्सवातील पाच बोधचिन्हांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यंदाच्या ५०व्या युवा महोत्सवामध्ये मागील वर्षांतील पारितोषिक विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. धीरेन पटेल, शैक्षणिक नियोजन विभागाचे संचालक डॉ. अनिल पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा जल्लोषात साजरा झाला. या वेळी परितोषिकांवर नाव कोरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया.

विशेष पुरस्कार

पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या नावाने विशेष यंदापासून शास्त्रीय नृत्य स्पर्धेत विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. डॉ. कनक रेळे या मोहिनीअट्टम नृत्यशैलीच्या ज्येष्ठ गुरू आणि विद्वान पंडिता आहेत. शास्त्रीय नृत्यशैलीच्या अभ्यासक्रम उभारणीत त्याचे विशेष योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.

अंतिम फेरीतील महत्त्वाच्या स्पर्धाचे वेळापत्रक

  • शास्त्रीय नृत्य : १६ सप्टेंबर विद्यापीठ विद्यार्थी भवन.
  • लोकनृत्य : २२ आणि २३ सप्टेंबर
  • शास्त्रीय गायन व वादन : १५ सप्टेंबर
  • नाटय़संगीत : १६ सप्टेंबर
  • वादविवाद : १८ सप्टेंबर