मी जव्हारच्या गोखले एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून बीए करत आहे. सध्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायची आहे. त्यासाठी कोणती पुस्तके आवश्यक ठरतील? कैलास राजे

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी सर्वसाधारणत: बारावीपर्यंतच्या राज्य शिक्षण मंडळ आणि एनसीईआरटी (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँण्ड ट्रेनिंग) च्या पुस्तकांमधील संकल्पना समजून घे. त्या नीट समजल्या की बऱ्याच विषयांचा पाया पक्का होण्यास मदत होते. याशिवाय इंग्रजी आणि मराठीचे व्याकरण, शब्दसंपत्ती वाढवण्यास उपयुक्त ठरणारी पुस्तके वाचायला हवीत. कार्यकारणभाव, संख्यात्मक कल चाचणी, काळ-काम-वेग, टक्केवारी यावरील काही प्रश्न विचारले जात असल्याने अंकगणिताच्या संकल्पना स्वंयस्पष्ट होतील अशी पुस्तके अभ्यासावीत. इंडिया इअर बूक (भारत सरकारचे प्रकाशन विभाग), कुरुक्षेत्र, महाराष्ट्र वार्षिक आणि लोकराज्य (माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन) व लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेससारख्या दर्जेदार वृत्तपत्राचे वाचन केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ  शकतो.

मी बी.एस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आता एमपीएससीसाठी तयारी करत आहे. मी एमपीएससी देऊ  शकतो का? मार्गदर्शन करा. – अमोल देवाधे

वित्त व लेखा सेवा, उद्योग अधिकारी, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ही काही पदे वगळल्यास इतर सर्व पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील पदवी प्राप्त केलेले उमेदवार एमपीएससी परीक्षा देऊ  शकतात. तूसुद्धा ही परीक्षा देण्यात पात्र आहेस.

मी सध्या नागपूरच्या नॅशनल फायर सव्‍‌र्हिस कॉलेज येथील सब ऑफिसर कोर्सची परीक्षा देण्यासाठी तयारी करत आहे. पण या क्षेत्रातील किंवा सब ऑफिसर कोर्स पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या कोणत्या संधी आहेत? याची मुला कुठेच माहिती मिळत नाहीये. मी याच क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला आहे. पुढे नक्की कोणत्या संधी उपलब्ध आहेत? राजेश घुगे

हा प्रश्न चांगला आहे आणि वेगळा आहे. नॅशनल फायर सव्‍‌र्हिस कॉलेज हे भारत सरकारच्या अखत्यारितील अत्यंत महत्त्वाची शिक्षण संस्था आहे. या संस्थेतील सब ऑफिसर आणि इतर अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना १००टक्के प्लेसमेंट मिळाले आहे. शहरे वाढत आहेत, त्यातील लोकसंख्या आणि इमारतीही वाढत आहेत. त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव आगी आणि इतर आपत्तीपासून बचाव करण्याची यंत्रणा अधिकाधिक कार्यक्षम करण्याचे बंधनकारक केले जात आहे. त्यामुळे मागणी अधिक आणि चांगल्या फायर ऑफिसर्सची उपलब्धता अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे या धाडसी क्षेत्रात तुला करिअरच्या विविध संधी मिळतील. विविध कारखाने, सैन्यदल, रुग्णालये, मोठी गृहसंकुले, वेगवेगळ्या महानगरपालिका आणि परदेशातही नोकरी मिळू शकते.