किशोरवयीन मुलींबाबत विविध प्रश्न, समस्या हाताळणे आणि माँ बेटी मेळावा, किशोर-किशोरी मेळावा हे या सेंटरच्या स्थापनेमागचे हेतू आहेत. या केंद्रामार्फत पुढील उपक्रम राबवले जातात.

माँ बेटी मेळावा

मुलींना प्राथमिक शिक्षणाचा स्तर पूर्ण करेपर्यंत मुली आणि त्यांच्या मातांमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि पौष्टिक आहार सेवनाबाबत जागरूकता निर्माण करणे, ही ‘माँ-बेटी’ मेळाव्यामधील संकल्पना आहे.

पोषक आहार

महाराष्ट्रात १० ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींची संख्या सुमारे ९.९६ दशलक्ष इतकी आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार या वयोगटातील ५२ टक्के मुली अ‍ॅनिमियाने ग्रस्त आहेत, तर मुलांमध्ये हे प्रमाण २४ टक्के इतके आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील या वयोगटातील निम्म्यापेक्षा जास्त मुली कुपोषित आहेत.

मासिक पाळीच्या दिवसांमधील स्वच्छता

वयाच्या साधारण १२व्या वर्षांपासून कुमारवयीन मुलींना मासिक पाळी सुरू होते. शरीराच्या या अवस्थेबद्दलच्या पुरेशा शास्त्रीय माहितीअभावी स्वच्छतेबाबत योग्य ती काळजी घेतली जात नाही. या दिवसांमध्ये घेतली जाणारी स्वच्छता आणि सॅनिटरी नॅपकीन यासंदर्भात महाराष्ट्रातील आठ जिल्ह्य़ांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार ६० ते ७० टक्के मुली या दिवसांमध्ये शाळेत जात नाहीत. मासिक पाळीच्या दिवसातील स्वच्छतेचे व्यवस्थापन, या दुर्लक्षित बाबीकडे अधिक जबाबदारीने पाहणे गरजेचे आहे.

व्यावसायिक शिक्षण

याअंतर्गत दरवर्षी स्थानिक उपलब्ध कुशल व्यक्तीमार्फत शिवण, रांगोळी, मेहंदी, संगणक असे विविध प्रशिक्षण वर्ग राबवले जातात. राष्ट्रीय कौशल्य विकास धोरणाअंतर्गत केंद्र सरकारने बहुपर्यायी रोजगाराभिमुख कौशल्यांवर आधारित, लघुमुदतीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिटय़ूशन फॉर ओपन स्कूलिंगतर्फेही व्यावसायिक अभ्यासक्रम राबवले जातात. विविध शासकीय संस्थांमध्ये रोजगाराच्या दृष्टीने उपयुक्त असे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी http://mpsp.maharashtra.gov.in/SITE/Information/NPEGEL.aspx?ID=11