कार्यालय ही जरी कामाची जागा असली तरी इथेही चैत्रपालवी फुटतेच. कुणाबद्दल तरी कामापलीकडे काही वाटायला लागणे, हे कार्यालयीन कामकाजात नवीन नाही. ते किती योग्य की अयोग्य हा पुढचा भाग झाला. पहिल्या नोकरीत मात्र असे कामापलीकडचे विषय शक्यतो टाळलेलेच बरे. अजून काही वर्षे तरी तुमचे ध्येय हे व्यावसायिक कारकीर्द व वैयक्तिक आयुष्यातील स्थैर्य हेच असले पाहिजे. त्यामुळे आजूबाजूला कुणीही असे काहीही करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष एकाग्र करणे आवश्यक आहे.

ऑफिसमधल्या अशा प्रेमप्रकरणांमुळे काय होते ते पाहू-

  • अनेकदा प्रेमप्रकरणात गुंतलेल्या व्यक्ती त्या नात्याबद्दल कितीही गंभीर असतील तरी ऑफिसमधल्या चविष्ट टवाळगप्पांचा विषय होतात. कधी त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल बऱ्याच वावडय़ा उठतात.
  • प्रेमप्रकरणात छुपे किंवा उघड प्रतिस्पर्धी असणारे सहकारी तुमचा द्वेष करतात किंवा तुमच्या कामात हेतुत: अडथळे निर्माण करतात.
  • तुमच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
  • तुम्ही व तुमची प्रिय व्यक्ती एकाच पद्धतीचे काम बरोबर करत असाल, त्यातून तुमच्यामध्ये कनिष्ठ / वरिष्ठ सहकाऱ्याचे नाते असेल तर पक्षपातीपणाचा आरोप येण्याची दाट शक्यता असते.
  • दुर्दैवाने प्रेमप्रकरण फिसकटले तर कामाच्या ठिकाणी एक अवघडलेपण येते, नाचक्की होते. सहकारी एका वेगळ्याच दृष्टीने तुमच्याकडे पाहू लागतात.
  • काहीवेळा तर एकेकाळची तुमची प्रिय व्यक्ती इतरांनी भडकवल्यामुळे ऑफिसच्या शिस्तपालन समितीकडे तक्रार करते किंवा पोलिसांकडे फौजदारी गुन्हासुद्धा दाखल करू शकते.
  • या सगळ्या प्रकरणांत तुमच्या पगारवाढीवर, बढतीवर व कदाचित नोकरीवरसुद्धा परिणाम होऊ शकतो.
  • अर्थात ऑफिसमधील काही यशस्वी प्रेमप्रकरणांच्या कथाही आपल्या पाहण्यात असतात.
  • तरीसुद्धा या संवेदनशील विषयाबद्दल विचार तसेच कृती करताना आपण सावधगिरी बाळगायलाच हवी :
  • नोकरीच्या प्रथम वर्षी केवळ व्यावसायिक कारकीर्दीवर व वैयक्तिक स्थैर्यावर लक्ष केंद्रित करा.
  • तरीसुद्धा मोहाचे क्षण निर्माण झाल्यास प्रिय व्यक्ती विवाहित असेल तर तात्काळ तेथेच थांबा. त्या व्यक्तीशी तसे स्पष्ट बोला.
  • आपण जोडीदाराला अनुरूप आहोत का, याचा विचार करा. कुणा तरी ज्येष्ठाचा खासगीत सल्ला घ्या. घरची परवानगीही महत्त्वाची आहेच. भविष्यात तुमचे कार्यालय नव्हे तर कुटुंबच तुमचा आधारस्तंभ आहे
  • कार्यालयाच्या आवारात आणि कार्यालयीन कामकाजाच्या वेळात प्रेम किंवा भावनांचे प्रदर्शन टाळा. नाही तर तुमच्याविषयी अफवा उठण्यास वेळ लागणार नाही.
  • बऱ्याच कंपन्यांमध्ये जोडप्याला एकत्र काम करण्याची परवानगी नसते. अशा वेळी दोघांपैकी एकाला बदली घ्यावी लागते किंवा दुसरी नोकरी शोधावी लागते. काही कंपन्यांनी हा नियम शिथिलही केलेला आहे. किंबहुना काही ठिकाणी त्याला प्रोत्साहनही दिले जाते. तरीही या गोष्टीचाही जरूर विचार करा.
  • कंपनीच्या परवानगीनंतरच सहकाऱ्यांना याची माहिती द्या. त्यांच्या सकारात्मक/ नकारात्मक प्रतिक्रियांसाठी तयार राहा.
  • दुर्दैवाने तुमचे नाते तग धरू शकले नाही तरी तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य कटाक्षाने वेगळे राखा. तेवढे भान आणि जाण असायलाच हवी.
  • खरे पाहता कार्यालयातील प्रणय हा अत्यंत भावूक पण क्लिष्ट विषय आहे. यावर लिहावे तेवढे कमीच. अनेक कथा-कादंबऱ्यांमध्ये, सिनेमा, नाटय़कलाकृतींमध्ये हे मांडले गेले आहे. तरीही ते प्रत्यक्षात येताना मात्र आपण रंगमंचावर नाही तर खऱ्याखुऱ्या व्यावसायिक वास्तवात आहोत, याचे भान राखलेले बरे. आपली व्यावसायिक कारकीर्द व वैयक्तिक स्थैर्य लक्षात घेऊनच वाटचाल करणे, कधीही उत्तम.

dr.jayant.panse@gmail.com