गेल्या काही लेखांमधून आपण यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील सीसॅट या घटकासंबंधातील विविध पलू पाहिले. या सर्व घटकांचा सुटासुटा अभ्यास जरी चांगला झाला असला, तरी दिलेल्या दोन तासांच्या वेळेचे भान ठेवत, एकंदर परीक्षेच्या ताणाचा विचार करता चांगली कामगिरी करण्यासाठी योग्य व्यूहनीती असणे आवश्यक आहे. आजच्या लेखात आपण ही व्यूहनीती कशी असावी, वेळेचे नियोजन कसे करावे याविषयीची महत्त्वाची चर्चा करणार आहोत.

मागील दोन वर्षांपासून सीसॅटच्या पेपरचे स्वरूप केवळ पात्रता परीक्षा (qualifying exam) असे झाले आहे. खूप गुण मिळवण्याची दमछाक जरी नसली तरीदेखील दिलेल्या वेळामध्ये पेपरचे समजून घेऊन वाचन करणे, प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसा वेळ देणे, एकंदर परीक्षेच्या ताणाचे नियोजन करणे या आणि अशा अनेक बाबींचा अजूनही विचार होणे आवश्यक ठरते. या संदर्भातील एकेक मुद्दय़ावर आपण सविस्तर माहिती पाहूयात.

कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी दोन घटकांची तयारी असणे अत्यावश्यक असते. एक म्हणजे परीक्षेसाठी अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या विषयांची आणि अपेक्षित ज्ञानाची पुरेशी तयारी आणि सराव असणे. याचबरोबर परीक्षातंत्राचा नेमका अभ्यास असणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. विशेषता ज्या स्पर्धा परीक्षांसाठी नकारात्मक गुण (negative marking) धरले जातात, अशा परीक्षांमध्ये तर परीक्षातंत्र हा खूपच कळीचा मुद्दा बनतो. यूपीएससी सीसॅटच्या अभ्यासक्रमामध्ये अपेक्षित असलेल्या सर्व घटकांचे तीन मुख्य विषयांमध्ये वर्गीकरण करता येते. ते पुढीलप्रमाणे –

१) उताऱ्याचे आकलन व त्यावरील प्रश्न (reading comprehension)

२) मूलभूत संख्याज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी (basic numeracy and mental ability)

३) विश्लेषणात्मक आणि अनुमानात्मक कौशल्ये (logical reasoning and analytical ability).

उमेदवारांनी या तीनही घटकांची बेतास बात तयारी केल्यास त्यातून फारसे काही हाती लागत नाही. म्हणूनच वरील तीनपकी कोणतेही दोन घटक पक्के असले पाहिजेत आणि तिसऱ्या घटकाविषयी किमान माहिती आणि थोडा सराव असणे आवश्यक आहे. एकंदर गेल्या काही वर्षांच्या पेपरचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की, उताऱ्याच्या आकलनावरील प्रश्नांची संख्या बरीच असते आणि या घटकावर कायमच पुरेसे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा घटक पूर्णपणे डावलून चालत नाही. म्हणूनच आपल्या सोईचे घटक निवडत असताना उताऱ्याच्या आकलनावरील प्रश्नांच्या सरावासाठी पुरेसा अवधी असावाच लागतो.

अनेक उमेदवारांना गणित आणि त्याच्याशी संलग्न विषयांबद्दल मनात अढी असते. हे निश्चितच समजून घेण्यासारखे आहे. मात्र त्याही उमेदवारांनी सरासरी, टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण यांसारख्या मूलभूत घटकांची तोंडओळख करून घेणे, किंबहुना या आणि अशा घटकांचा चांगला सराव करणे मदतीचे ठरते. दुसऱ्या बाजूला ज्या उमेदवारांना गणिताशी संबंधित प्रश्नांबद्दल खूप सारा आत्मविश्वास वाटतो, त्यांनी देखील इतर घटकांकडे दुर्लक्ष करू नये. दिलेल्या अभ्यासक्रमातील कोणत्या घटकाला किती प्राधान्य (weightage) द्यावे याबद्दल यूपीएससीवर कोणताही बांधीलकी नाही. मागील पेपरच्या विश्लेषणातून असे दिसून येते की, एका वर्षी जेव्हा गणितावर आधारित २०-२२ प्रश्न विचारले गेले, तेव्हा दुसऱ्याच वर्षी गणितावर आधारित केवळ २ प्रश्न विचारले गेले. अशाप्रकारचे अनपेक्षित चढउतार जरी मागील २-३ वर्षांत झाले नसले, तरी तसे ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच वर उल्लेख केल्याप्रमाणे उमेदवारांची शैक्षणिक पाश्र्वभूमी कोणतीही असेल, तरीदेखील सर्व घटकांकडे विचारपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे.

उमेदवारांनी परीक्षेला जाऊन बसल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे, याचा नेमका विचार करावा. उदाहरणार्थ, सामान्य अध्ययनाच्या कामगिरीचा सीसॅटचा पेपर सोडत असताना ताण न येऊ देणे, वेळेचे नियोजन, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेवर (OMR sheet) मांडणे, वाचनाच्या दृष्टीने वेळखाऊ घटकांचे काटेकोर नियोजन, मर्यादित परंतु अचूक प्रश्न सोडवणे, त्याकरता पेपर सोडवत असताना किती प्रश्न सोडवून झाले आहेत याचा अंदाज ठेवणे या आणि अशा अनेक आव्हानांचा सामना परीक्षेच्या दिवशी करावा लागतो. परीक्षा आणि त्यातून येणाऱ्या दबावाचा विचार करता, परीक्षा देणे अधिक सुलभ होण्यासाठी वरील बाबींपकी ज्या गोष्टींचा सराव आधीच करता येणे शक्य आहे, तो जरूर करावा. उदा. २ तासांच्या वेळेमध्ये प्रश्नांची उत्तरे आपण उत्तरपत्रिकेवरती कधी मांडणार आहोत? याचा विचार आणि त्याप्रमाणे सराव झालेला असल्यास परीक्षेला गेल्यानंतर गडबडायला होत नाही, तसेच परीक्षातंत्राची ओळख असल्याचा स्वाभाविक फायदा कामगिरीत दिसून येतो. अशा प्रकारच्या नकारात्मक गुणपद्धती असणाऱ्या परीक्षांसाठी सरावातून आलेली सहजता, योग्य व्यूहनीती आणि वेळेचे काटेकोर नियोजन या बाबींवर लक्ष दिल्याचे पुष्कळ फायदे चांगल्या निकालामध्ये बघायला मिळतात. येत्या लेखांमध्ये आपण हीच चर्चा पुढे नेणार आहोत.

अपर्णा दीक्षित