womanyaअर्धं जग व्यापणारी स्त्री. तिच्या आयुष्यात काही ना काही घडत असणारच. आणि त्याचे कमी-अधिक पडसादही उमटत रहाणारच. कधी व्यक्तिगत तर कधी अगदी जागतिक पातळीवर. अशाच काही घटनांची चुरचुरीत नोंद घेणारं हे सदर दर पंधरा दिवसांनी.
सौदी अरेबियातल्या स्त्रियांच्या ड्रायिव्हगबाबत जे काही तिथं चाललंय ते पाहून अति झालं आणि हसू आलं, याची अगदी खात्रीच पटते. गेले महिनाभर तिथल्या दोघींना अटक करून ठेवली आहे, कारण काय तर त्या ड्रायिव्हग करत होत्या.. जग कुठे चाललंय आणि हे लोक मात्र अजून     तिथेऽऽऽच
 जगातील हा एकमेव देश आहे जिथे स्त्रियांना ड्रायिव्हग करायला परवानगी नाही.. तरी बरं तिथल्या काही स्त्रिया मधून मधून बंडखोरी करतात.. कार चालवतात.. त्याचा  व्हिडियो काढून यू ट्युबवर टाकतात. त्यांना अटकही होतेच. मग काय.. सुरू होतो सिलसिला.. शिक्षा, सुटका यांचा. थोडी थोडकी नव्हे, गेली चोवीस वष्रे ही धरपकड सुरू आहे. अर्थात याचं समर्थन करणारे तिथे अनेक स्कॉलर आहेतच. बीबीसीला मुलाखत देताना     डॉ. अहमद इब्न सफुद्दीन यांनी सांगितलं की, आम्ही स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात अजिबात नाही. पण काय आहे ना, स्त्रियांनी ड्रायिव्हग करायचं म्हणजे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोझा नाही का  पडणार. सफुद्दीनमिया आपल्या घराबाहेर पडा की जरा..
अर्थात त्याच्या या ढोंगीपणाचा बुरखा फाडण्याचं काम तिथलेच लोक करताहेत. वेळोवेळी स्त्रियांची होणारी आंदोलनं ते सांगतातच, पण उद्योगपती आणि कॉमेडियन असणाऱ्या हिशम फगीह याने तर बॉब माल्रेच्या No women no cry या गाण्याचं विडंबन करत no women no drive असा व्हिडियोच यू टय़ूबवर टाकलाय. स्त्रीने गाडी चालवली तर तिच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेचा जो काही ‘जावई’शोध इथल्या लोकांनी लावलाय त्याची यात जाम खिल्लीच उडवलीय. हा व्हिडियो थोडय़ाथोडक्या नाही तर जगभरातून १ कोटी २० लाख वेळा पाहिला गेलाय.
पण थोडी आशा दिसायला लागली आहे. सौदीचा राजा अब्दुला याला ही बंदी थोडी शिथिल व्हावी असं वाटतं.त्यानं आपल्या शुरा कॉन्सीलला तशा सूचनाच दिल्यात, अटींसह अर्थात (त्याचं खंडन स्थानिक वृत्तपत्राने केलंच लगेच. आणि मग विरोध, निषेधही सुरू झाला.) पण एपीच्या (असोसिएट प्रेस) वृत्तानुसार अटींसह स्त्रीनं कार चालवायला हरकत नसावी, असं राजाला वाटतं. पण त्यानं घातलेल्या अटी सुद्धा एकदम कडक आहेत बरं! एक तर तिचं वय तीसच्या वर हवं, तिनं सकाळी सात ते रात्री आठ दरम्यानच गाडी चालवावी, यासाठी घरातल्या प्रमुख पुरुषाची परवानगी सक्तीची, शहरात ती एकटी कार चालवू शकते, पण शहराबाहेर पुरुष बरोबर हवाच. आणि हो, तिनं पारंपरिक ड्रेसच घालायचा. म्हणजे आपला बुरखा हो.. पडदानशीन! आणि मेकअप करायचा नाही. आता सरेपाँव काळ्या कपडय़ात असलेल्या तिनं मेकअप लावला काय नि न लावला काय कोणाला दिसणार आहे? पण नाही. अट म्हणजे अट.. पण हेही नसे थोडके. अर्थात सरकार या सूचना किती गंभीरतेनं घेतंय हा प्रश्नच आहे. त्या तशा घेतल्या तर.. आणि तरच तिला ड्राईिव्हग सीटवर खुलेआम बसता येईल. आणि कुणी सांगावं हीच तिच्या ड्रायिव्हगच्या स्वातंत्र्याची नांदी ठरेल.
 गेली २४ वष्रे अनेकींना घेऊन ‘वूमन बिहाइण्ड द व्हील’ ही चळवळ चालवणारी, मदेहा अल् अजरश म्हणते तसं.. ती गाडी चालवणार आहेच. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, पण कधी हाच प्रश्न आहे..

वूमनॉमिक्स
ch11जपानमध्ये आता रंगणार आहे, ‘अ‍ॅबेनॉमिक्स’ की ‘वूमनॉमिक्स’ची खेळी! जपानला आíथक गत्रेतून बाहेर काढण्याचा पंतप्रधान िशझो अ‍ॅबे यांनी ‘अ‍ॅबे’न्डन्स  प्रयत्न केले, म्हणूनच की काय जपानच्या मतदारांनी त्यांना दुसऱ्यांदा कसंबसं निवडून दिलंय खरं, पण वाढतच चाललेल्या आíथक मंदीतून बाहेर पडण्यासाठी आणि स्वत:चे पाय भक्कम करण्यासाठी त्यांनी हाक दिली आहे ती तिथल्या स्त्रीवर्गाला. याला म्हणतात, पश्चात बुद्धी!
जपान हा उच्चशिक्षितांचा देश. इथल्या स्त्रियाही नुसत्या शिकलेल्याच नाहीत तर मोठमोठय़ा पदांवर कार्यरत. पण गेल्या काही वर्षांत अशी वेळ येऊन ठेपलीय की ७० टक्के नोकरदार स्त्रियांना आपल्या पहिल्या बाळानंतर नोकरी सोडण्याशिवाय पर्यायच उरला नाही. (हवाला- गोल्डमन सॅचेस) यात नासातील इंजिनीयरही आहे आणि आयटीमध्ये उच्चपदावर असणाऱ्या अनेक जणीही. कामं करणारी माणसं अशी घरी बसायला लागली तर कसं होणार?
  मग काय, अ‍ॅबेनी अर्थव्यवस्थेलाच कामाला लावायचं ठरवलं आहे. त्यांनी समोर लक्ष्यच ठेवलंय, की पुढच्या दहा वर्षांत जपानमधल्या ३० टक्के कंपन्यांच्या व्यवस्थापकपदी स्त्रिया असायलाच पाहिजेत. इतकंच नव्हे तर ज्या कंपन्या आई झाल्यामुळे नोकरी सोडलेल्यांना पुन्हा कामावर घेतील, त्यांना भरघोस टॅक्स इन्स्टेन्टीव्हज् दिले जातील.  
आई झाल्यावर तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो म्हणून तिची पदावनती करा किंवा बदली करा. ती नाही स्वीकारली तर २० टक्के पगार कापा, अशी मानसिकता झालेल्या कंपन्या निदान आपल्या आíथक फायद्यासाठी तरी याचा नक्कीच विचार करतील आणि तिच्या बुद्धिमत्तेचा पुरेपूर आदर करतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. राहता राहिला प्रश्न अनियमित वेळांचा आणि ग्लास सिल्िंागचा. हो ना तिथेही आहेच ही पुरुष-स्त्री यांच्या पगारातली असमानता. थोडी थोडकी नाही, २६.५ टक्के. (ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट २०१२ च्या अहवालानुसार) मग काय इथल्या करिअरिस्ट स्त्रीने एक वेगळाच पर्याय स्वीकारला, लग्नच न करण्याचा किंवा मूल होऊ न देण्याचा. पण हेही घातकच की हो. ‘ओईसीडी’नुसार ही स्थिती अशीच राहिली तर पुढच्या चाळीस वर्षांत जपानची लोकसंख्या ३० टक्क्यांनी कमी होणार. याचा अर्थ जपानमधलं वìकग पॉप्युलेशन म्हणजेच कामगारांची संख्या आणखीनच घटणार. याचं भान आलं म्हणा वा पश्चात बुद्धी म्हणा अ‍ॅबे यांनी वूमनॉमिक्सचं गाजर दाखवलंय खरं. इथल्या कंपन्यांनी ते गंभीरतेने घ्यायला हवं, बघू या, देशाचं माहीत नाही
अ‍ॅबेना वाचवण्यासाठी तरी वूमनॉमिक्स कामी येतंय का ते?

फ्रीझींग एग्स
मूल झालं की ऐन तारुण्यात करिअर पणाला लागतं म्हणून मूलच नको म्हणणाऱ्या किंवा नोकरी सोडणाऱ्या किंवा बढती नाकारणाऱ्या स्त्रिया फक्त जपानमध्येच नाहीत, तर अगदी जगभरात आहेत. अगदी अमेरिकाही त्यात मागे नाही बरं! पण जास्तीत जास्त तरुणींना आपल्या कंपनीकडे वळवावं यासाठी एक ऑफर ठेवली गेलीय, २० हजार डॉलर्सची! आणि तीही छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांनी नाही तर फेसबुक आणि अ‍ॅपल या दिग्गज कंपन्यांनी!
ही ऑफर आहे, बिजांडं गोठवण्याच्या प्रक्रियेसाठीची. बायांनो, फ्रिझ करा तुमची बीजांडं. जी देतील तुम्हाला तुमच्या वयाच्या कोणत्याही टप्प्यात मातृत्व.  तुम्हाला तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आता मूल नको आहे. मग कशाला घाई करताय? आम्ही करतो ना तुम्हाला या महागडय़ा प्रकियेसाठी मदत. अ‍ॅपलची ही ऑफर याच महिन्यापासून, जानेवारीपासून लागू होणार आहे. या प्रकियेसाठी तिला किमान २० बीजांडं गोठवावी लागणार असून त्यासाठी दोन महिन्यांच्या सायकल्सचा वापर केला जाईल. एकदा का ही बीजांडं फ्रिज झाली की ती आपल्या करिअरमध्ये लक्ष केंद्रित करायला मोकळी.
ऑफर तर मोहात पाडणारी आहे. पण आपल्या आजी- पणजीनींच नव्हे तर स्रीरोगतज्ज्ञांनीही सांगितलेलं, वेळेत मूल होऊ द्या गं, या सल्ल्याला इथे हरताळ फासला जाणार ना. त्यांचा सल्ला मानायचा तर करिअरकडे दुर्लक्ष करायला लागणार. कारण मूल जन्माला घालणं, त्याला वाढवणं ही जबाबदारी प्रामुख्यानं (आणि अनेकदा तिचीच) पुढे जाऊन तिच्या कुंटुंबाची. प्रत्येक मूल हे कुटुंबाच्या पलीकडे समाजाचं असतं, मुलाचा सर्वागीण विकास हा समाजाच्या भल्यासाठीही गरजेचा आहे. हा विचार समाजात फारसा रुजलेलाच नाही, कोणत्याच देशाच्या. तेव्हा बाई गं, निर्णय तुला घ्यायचाय, मोहात पाडणारे पर्कस् की गोड गोजिरं मूल.
अर्थात ही ऑफर असली तरी हा प्रयोग तरी खात्रीचा आहे का, तर नाही! ताज्या बीजांडांप्रमाणेच या गोठवलेल्या बीजांडांनी मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण वाढत असल्याचं अनेक डॉक्टरांनी सांगितलंय खरं, पण त्याचीही शंभर टक्के खात्री नाहीच. कॅलिफोíनयाच्या रिप्रॉडक्टिव्ह एन्डोक्रमॉनॉलॉग अ‍ॅण्ड इन्फर्टिलिंटीच्या संचालक डॉ.मास्रेले सीडिर्स म्हणते, मी माझ्याकडे येणाऱ्या तरुणीला कधीही खोटी आशा दाखवत नाही, मी सांगते, ‘फ्रीझरमध्ये तुझं मूल नाही, तिथे मूल होण्याची फक्त शक्यता आहे.’ म्हणजे हाही खोटा आशावादच की. पस्तीशी-चाळिशीनंतर मूल जन्माला घालण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तिला वाटाण्याच्या अक्षता मिळण्याचीच शक्यता जास्त.
आणि हो सर्वात महत्त्वाचं.. संसाराचं स्वप्न बाजूला ठेऊन ही नोकरी स्वीकारणाऱ्या तिला पुढे  पगार वाढताना मात्र ग्लास सीलिंगला तोंड द्यावं लागणार आहेच, ते ती कसं टाळणार आहे? पुरुष आणि स्त्रियांच्या पगारातली जगभरात असलेली तफावत दूर करण्यासाठी ती मग कुणाचा मेंदू गोठवणार?
आरती कदम -arati.kadam@expressindia.com