आज क्लिनिकमध्ये एक २९ वर्षांचा तरुण आला होता. ‘‘गेल्या महिन्यात त्याला डेंग्यू झाला होता. आता रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण पित्ताचा आणि अपचनाचा खूप त्रास होतोय – १ महिन्याचा कोर्स दिलाय डॉक्टरांनी!’’ तो सांगत होता. एकंदरीत सर्व हिस्टरी ऐकल्यावर लक्षात आलं की आतडय़ातील ‘चांगले’ जिवाणू कमी झाले आहेत आणि म्हणून पचन व्यवस्थित होत नाहीये. प्रिय वाचकांनो, आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांशी नेहमीच बोलतो. कधी तरी स्वगतही असतंच. पण आपलं शरीर आपल्याशी जे बोलतं ते ऐकायला आपल्याला सवड असते का किंवा ते ऐकण्यासाठी आपले कान तयार आहेत का? जर आपण आपल्या शरीराशी संवाद साधला तर बरीच अनारोग्याची कोडी सुटतील. जीवनसत्त्वविरहित अन्न, चुकीच्या पदार्थाचा आहारामध्ये समावेश आणि चुकीच्या खाण्याच्या/झोपण्याच्या वेळा, त्यामुळे आवश्यक पोषकमूल्यांचा अभाव! त्यामुळे ही कमतरता तुम्हाला सांगण्याचा तुमचं शरीर प्रयत्न करतं. मग ‘ब’ जीवनसत्त्व कमी असेल तर ‘तोंड येतं’ आणि ‘कॅल्शियम- जीवनसत्त्व ‘ड’ कमी असेल तर हाडं कुरबुरतात. काही अशीच उदाहरणं बघूया. त्यासाठी काय आहार घेता येईल याचाही विचार करू या.
ओठांच्या कोपऱ्यात तडा / भेग होणे – जीवनसत्त्व ‘ब’ २, ३ आणि झिंकचा अभाव – विविध धान्ये, शेंगदाणे, पालेभाजी अनिवार्य.
केस गळणे (अकाली)-बायोटिन जीवनसत्त्वाचा अभाव – शेंगदाणे, सोयाबीन, केळी उत्तम.
हाता-पायांना मुंग्या येणे – जीवनसत्त्व ब १२, ९  चा अभाव – दूध आणि पालेभाज्या, उसळी, शेंगाभाजी, बीट यांचा आहारात समावेश करावा.
पोटऱ्यांमध्ये गोळा येणे – मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियमचा अभाव – केळ, बदाम, सफरचंद, हिरव्या पालेभाज्या, नारळ पाणी, दूध घेणे आवश्यक.
काहीही गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे – रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी-जास्त होतेय. फायबरयुक्त आहार घ्यावा आणि मैदा – साखरेचे पदार्थ टाळावेत.
 दम लागणे, थकवा जाणवणे, त्वचा पांढरी पडणे – लोह कमतरता – अंकुरित उसळी – लिंबू पिळून, खजूर-खारीक-अंजीर-मनुका खाव्यात, शिवाय अळीव खाणे उत्तम.
आपल्या शरीरात एकंदरीत १४ विविध व्यवस्था कार्यरत असतात.    उदा. श्वसनप्रणाली, पाचकप्रणाली, रक्ताभिसरण, संप्रेरकप्रणाली, स्नायू – रोगप्रतिकारप्रणाली वगैरे.. प्रत्येक कामासाठी काही वैशिष्टय़ं असलेली जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने लागतातच. त्याप्रमाणे त्याचा आहारात समावेश करावा.
जे शरीराच्या आरोग्यासाठी हवंय ते योग्य प्रमाणात पुरवणे – योग्य आणि संतुलित आहारामधून. काही गडबड झालीच तर शरीराचा संवाद आहेच!
अर्थात ही लक्षणं काही आजारांचीसुद्धा असू शकतात. त्यामुळे तुमच्या आणि शरीराच्या संवाद प्रक्रियेमध्ये डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ असणे जरुरीचे आहे.
अळीवाची खीर  
साहित्य :
१ कप दूध, १ ते दीड टेस्पून अळीव, ३ ते ४ बदाम, १ खारीक, साखर चवीनुसार, चिमूटभर वेलचीपूड
कृती :
एका वाटीत अळीव, बदाम आणि खारीक दुधात भिजत घालावेत. ४ ते ५ तासांनी अळीव चांगले फुलून येतील. तसेच खारीक, बदामही चांगले भिजलेले असतील. बदामाची सालं काढून पातळ काप करावेत. खारकेची बी काढून खारकेचे बारीक तुकडे करावेत. दूध गरम करावं. त्यात भिजवलेले अळीव घालावेत. साखर, खारीक आणि बदाम घालून मध्यम आचेवर ३-४ मिनिटं शिजवावेत. वेलचीपूड घालून ढवळावं आणि गरम गरम प्यावं.