बघता बघता वर्ष संपत आलं. तुमच्याशी साधलेला संवाद सुरू होऊन अकरा महिने झालेसुद्धा! कितीही आपण बोललो तरी अजून खूप बोलायचं आहे असं वाटत राहतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया दिल्या / शंका विचारल्या. तुमच्या मनातील शंका दूर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. डिसेंबर महिन्यात काही महत्त्वाच्या विषयांची पुन्हा उजळणी करूयाच आपण! तरीही एक विचार बऱ्याच दिवसांपासून मनात होता. माझ्या हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये जे आजी-आजोबा येतात त्यांना आजार कोणताही असू दे, अशक्तपणा / वजन कमी होणं / ताकद कमी असणं हा त्रास असतोच. वयाप्रमाणे ताकद कमी होते हे मान्य आहे, पण अशक्तपणा कमी करता येईल. अर्थात त्यासाठी आहार परिपूर्ण हवा. आज थोडं त्याविषयीच.

वयानुसार कुपोषण होण्याची दोन मुख्य कारणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक बदल. जिभेची ‘चव’ आणि अन्नाचा वास घेण्याची शक्ती आणि दात कमजोर झाल्याने किंवा नसण्याने मंद झालेली ‘चर्वण’ प्रक्रिया इत्यादी बदलांमुळे अन्नाचं सेवन आणि पचन कमी होतं. आणि या सर्वामुळे ‘स्वत:ची काळजी स्वत:’ घेता येत नाही. क्वचित वजन जास्त असेल तरी स्नायूपेशींऐवजी चरबीच्या पेशी वाढतात आणि अशक्तपणा कायम राहतो. अशक्तपणा वाढत जाऊन आणि आधीच कोणता आजार असेल तर त्याच्याशी लढण्याची ताकद राहत नाही. काय करता येईल?
१. झालेली जखम लवकर भरून येत नाही किंवा वजन कमी होत चाललंय – अलर्ट व्हा.
२. भूक कमी असेल तर जे काही खाणार ते परीपूर्णच पाहिजे असा आग्रह ठेवा. खारी / पाव खाण्यापेक्षा फळं / सुकामेवा खा.
३. चावण्याचा त्रास असेल तर लहान बाळांना देतात तसं सूप / खिमटी / ज्यूसच्या स्वरूपात खा.
४. प्रमाण कमी-जास्त असेल तरी ठरलेल्या वेळी खाच. जेवण टाळू नका.
५. दूध / दही / ताक / पनीर / चीज / डाळी / उसळी / सोयाबीन / सुकामेवा – म्हणजे प्रथिनयुक्त आहार. प्रत्येक जेवणामध्ये जे तुम्हाला पचतं ते जरूर वापरा. उदा. तुरीची नाही तर मूग डाळ वापरा.
६. रात्रीचं जेवण जरा लवकर घ्या म्हणजे अपचन होणार नाही.
७. प्रवाही पदार्थ उदा. सुप्स / ज्युसेस – दोन जेवणांच्या मध्ये ठेवा. जेवणाच्या थोडा वेळ आधी काहीही खाण्याचं टाळा.
८. नुसतं गव्हाचं पीठ वापरण्यापेक्षा त्यात सोयाबीन / चण्याचं / सातूचं पीठ मिक्स करा.
९. किसलेली का होईना पण कोशिंबीर जरूर खा.
१०. ड्रायफ्रुटची पावडर दुधात मिसळून खा.
आपल्या सोयीप्रमाणे जे जमेल ते आणि जसं जमेल तसं पण आहाराकडे दुर्लक्ष करू नका. चटपटीत पदार्थ चांगले जरी वाटले तरी आरोग्यासाठी निकृष्ट असतात. त्यामुळे खा पण रोजचा आहार परीपूर्णच पाहिजे. आणि तोसुद्धा चटपटीत करता येतो – लिंबू / चिंच / गूळ / कोथिंबीर / ओला नारळ वगैरे पदार्थ वापरून! रोजचं जेवणाचं ताट एखाद्या पक्वान्नाप्रमाणे सजवून खा – वरून थोडीशी कोथिंबीर आणि खवलेला नारळ / किसलेलं गाजर घालून – भूक नक्कीच वाढेल, मग नैवेद्य दाखवून हसतमुखाने आपल्यातील जठराग्नीला अर्पण करा. मानसिक समाधान लाभेल आणि ‘अन्न पूर्णब्रह्म’ या युक्तीप्रमाणे सेवन केल्या अन्नाचे अमृत होईल.
ॐ सर्वे भवन्तु सुखिन:। सर्वे सन्तु निरामया: ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दु:ख भाग्भवेत।
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥