१३ ऑक्टोबर अंकातील शुभा परांजपेंचा ‘गरज बौद्धिक सबलीकरणाची’ लेख वाचला. ग्रामीण भागातील स्त्रिया धडाडीने, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत पुढे येत आहेत, ही निश्चित स्वागतार्ह गोष्ट आहे. पण त्यामुळे भारावून जाऊन शहरी स्त्रियांचा अधिक्षेप करण्याचे कारण नाही. स्त्रीची दुय्यमता आपल्या जीवनाच्या सर्व अंगोपांगात, व्यवहाराच्या सर्व बारीकसारीक तपशिलांतही इतकी दृढमूल झालेली आहे की, ती नाहीशी करण्यासाठी सर्व बाजूंनी सातत्याने अथकपणे प्रयत्न केले पाहिजेत.
ग्रामीण-शहरी असा भेद करण्यापेक्षा प्रत्येक थरातल्या समाजाचे काही प्रश्न सामायिक असले तरी काही वेगळे असतात. काही प्राथमिक पातळीवरचे, काही तरल, तर काही ज्वलंत.
खेडय़ातला दारूडा नवरा लपून व्यसन करीत नाही. त्यामुळे त्या स्त्रीलाही आजूबाजूच्यांचा पाठिंबा मिळतो. इतर गृहच्छिद्रे, झाकण्याचा प्रयत्न ग्रामीण भागातूनही होतो. त्या वेळेस त्या स्त्रीचाही कोंडमारा होतोच, त्याउलट नको असणारे, त्रासदायक झालेले विवाहबंधन झुगारणारी; स्त्रीत्वाचा उपमर्द करणारे रीतीरिवाज-परंपरा झुगारणारी स्त्री शहरातच असते.
नोकरीव्यतिरिक्त घराबाहेरच्या जगातली अनंत क्षेत्रे अशी असतात की, ज्यात स्त्रीने सक्षम व्हायला हवे. यंत्रज्ञान-तंत्रज्ञान- आर्थिक व्यवहार कायद्याच्या बाबी- इ. पण यात सक्षम होण्यासाठी तिला घरातल्या आत्यंतिक जबाबदाऱ्यांतून जरा मोकळीक द्या, तसं वातावरण निर्माण करा. पुरुषांचा घरकामातला सहभाग वाढवा. (कुकर लावता न येणाऱ्या पुरुषाचे आपण कौतुक का करतो?)
सासूबद्दल परांजपेंनी नोंदवलेले निरीक्षण अजब वाटते. जे अटळच आहे ते ‘आम्हाला हवं आहे’ असं म्हणण्याचा हा धोरणीपणा असावा. व्यक्तिस्वातंत्र्याचे विवेकवादी मूल्य स्वीकारून आजची स्त्री जगू इच्छिते.
– प्रभा वझे, पुणे

एकजुटीने प्रश्न सुटेल
२९ सप्टेंबरच्या अंकातील डॉ. मंगला आठलेकर यांचा ‘हा व्यवसाय कसा?’ हा लेख वाचला व मन सुन्न झाले. लेख मेंदूला झिणझिण्या आणणारा तर आहेच, पण आपल्या देशाच्या सीमा किती असुरक्षित आहेत व अलीकडचे आणि पलीकडचे सीमेवरचे रखवालदार किती भ्रष्ट आहेत, कसे विधिनिषेध शून्य आहेत हेही समजले.
माझ्या मते या लेखाचे इंग्रजी किंवा हिंदी भाषांतर करून परराष्ट्र खात्याचे मंत्री, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री (जे सुदैवाने मराठी आहेत- भाषांतरांची गरज नाही) व राष्ट्रपतींकडे पाठवले पाहिजे. संसदेचे अधिवेशन बंद पाडण्यात धन्यता मानणारे या प्रश्नी काय करणार आहेत, तेही विचारले पाहिजे.
काही झाले तरी जनतेनेच उठाव करून स्त्रियांचा हा बाजार- त्यांची विक्री थांबवलीच पाहिजे. आज अनेक प्रशासकीय उच्च पदांवर स्त्रिया काम करीत आहेत. या सर्व स्त्रियांनी, देशातील सर्व आमदार व खासदार स्त्रियांनी निदान या गंभीर प्रश्नावर तरी एकजूट दाखवली पाहिजे. असे न झाल्यास देशातील एकही स्त्री सुरक्षित राहणार नाही, हे भयावह वास्तव आहे.
– निळकंठ नामजोशी, पालघर

मन प्रसन्न करणारा अनुभव
६ ऑक्टोबरच्या अंकातील इंदुमती सिनकर यांचा ‘‘माझी पहाडासारखी लेक’’ हा लेख फार आवडला. लेखिकेने जे लिहिले आहे ते वास्तव आहे. नातेवाईक आपल्याला जन्माबरोबरच मिळतात, पण मित्र व इतर माणसे आपल्याला भाग्याने मिळतात. अशा काही घटनांनी आपले जीवन सुकर होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावर किंवा पोशाखावर आपण माणसाचे अंतरंग ओळखू शकत नाही. कारण त्याच्या सहवासाने त्यांचे अंतर्मन बाहेर येते. आपला स्नेह त्या प्रति दिवसेंदिवस वाढतच जातो व सामान्यांमधील असामानत्व आपल्याला अनुभवायला मिळते.
समाजातील काही सामान्य माणसे आपल्याकडून कसलीच अपेक्षा करीत नाहीत ते त्यांच्या प्रामाणिकपणाला बांधलेले असतात. सध्याच्या या युगामध्ये अशी माणसे केवळ आपल्या चांगुलपणामुळे भेटतात. जेव्हा इंदुमती ताईने सरिताची ओटी भरली त्या वेळी तिला आकाश ठेंगणे झाल्याचा भास झाला असेल. कारण असा जिव्हाळा पाषाणालादेखील पाझर फोडायला लावील. सरिताची स्वामी समर्थावरील श्रद्धा व ‘पापी विचारापासून मला दूर ठेव’ हा सद्विचार फार काही सांगून जातो.
सामान्य माणसामधील असामान्यत्वाला आपणास सलाम करावाच लागतो. दु:ख वाटल्याने कमी होते व सुख वाटल्याने वाढते. शेवटी खरोखरच कोणीही आई तिला असेच वाटेल की तिलासुद्धा अशीच पहाडासारखी लेक मिळावी. या लेखामुळे मन प्रसन् न होते.
– किशोर नारायण श्रीवर्धनकर, वाशी

सुसंस्काराची कास धरावी
६ ऑक्टोबरच्या अंकातील ‘संयमाचा कडेलोट’ हा लेख अतिशय मुद्देसूद व वास्तववादी असल्याने फार आवडला.
आजकाल धावपळीच्या-स्पर्धेच्या युगात माणूस बऱ्याच गोष्टींना तोंड देत आपली वाटचाल करतोय. या धावपळीत त्यांचे मन हे एखाद्या काटय़ाप्रमाणे उजवी-डावी वळणे घेत जाते. समोरचा काय सांगतोय, कुठल्या भाषेत सांगतोय याचे भान राहत नसते. लेखिकेने जी उदाहरणे दिलीत ती सत्यच आहेत, असे समाजात घडते आहे. माता-पिता आपल्या मुलांकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत. परिणामी अपयश येते. माता-पिता काही वेळा टोक गाठतात, पोटातील बाळ गतप्राण होऊन जाते, मग भान येते.
माणूस वागताना एवढे टोक कसे गाठतो याचे विश्लेषण अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी केले आहे. याचे कारण आज समाजाची घडी पूर्णपणे कोसळली आहे. अनेक ठिकाणी अनेकांना चाकोरीबाहेर जाऊन काम करावे लागते. मात्र, संयमाचा कडेलोट होऊ न देता सुसंस्काराची कास धरणे गरजेचे आहे. शांत व संयमी आयुष्य ही काळाची गरज आहे.
– शरच्चंद्र जोशी, पुणे</strong>